किसीने सही कहा है की तुम जिंदगी नही चुनते… तुम्हे जिंदगी चुनती है। मलाही कधी कधी असा विचार येतो की गच्चीवरची बाग या पर्यावरण पुरक कामाची आपण निवड केली की या कामाने आपल्याला निवडले. कारण हे कामातील गुंतागुंत, जवळ असलेल्या सांधनाचा व संसाधनाचा, उपलब्ध मानवी कौशल्यांचा कल्पकतेने केलेला वापर याचा सखोल विचार केला तर वरील प्रश्न मलाच पडतो. किती काळ ( २१ वर्ष) आपण चालत आलो आहोत. त्याची पाळमूळ हे कितीतरी खोल आहेत. म्हणूनच हे काम उभं राहिल. याचं मलाही आश्चर्य वाटते.
या कामासाठी आवश्यक असलेल्या माहिती, ज्ञानाच्या साखळ्या कशा जुळत गेल्या ?. खरयं… कुणी तरी म्हटलचं आहे… तुम जिंदगी नही चुनते… तुम्हे जिंदगी चुनती है। नियतीनं या वैशिष्टय पूर्ण कामासाठी मलाच का निवडावं, किंवा हे काम करणारी अनेक मंडळीअसतीलही पण हे काम वैशिष्टयपूर्ण व्हावं ते ही आपल्या हातून ? आलेल्या अडचणीवर सहजतेने मार्ग कसे मिळत गेले. कसं उभं राहिलं हे काम… खरं तर धन्यवाद … मानले पाहिजे. या नियतीचे … खूप असा समृध्द वारसा तयार करण्यासाठी … पदरी आलेल्या संघर्षासाठी खूप ताकद दिली. कोरोनामुळे तर काम बंद करण्याचा विचार केला. कारण कर्ज परत फेड करणे अशक्य झाले होते. पण काही मित्रांनी बिनव्याजी पण परत करण्याच्या आश्वासनावर आर्थिक मदत केली नी डगमगणारी होडी आता स्थिर होवू पाहतेय. असो…
या कामाची पाळमुलं ही मागील तिसर्या पिढीपर्यंत जातात. आईवडिलांचा वारसा, माझ्या आईच्या व वडिलांकडील नात्यांचा अर्थात आजी आजोबाचा वारसा… नि पणजोबाचा वारसा या सार्या रसायनातून गच्चीवरची बाग तयार झालीय… असं मला प्रकर्षाने जाणवतंय…
माझे पणजोबा शंकर चव्हाण (शिंपी) हे ब्रिटीश काळात ब्रिटीशांनी भारतात आणलेली तंबाखू हे घरोघरी जावून विकत होते. अर्थात तेव्हा याचा प्रचार प्रसार नव्हता.. नविन वस्तू होती. त्यात विशेष नाविण्य होते. धुंदी किंवा नशा म्हणा हवं तर, तर तंबाखू विकतांना पणजोबा हे समोरील व्यक्तिना काय सांगत असावेत. पहिल्यांदा कसं कन्व्हीन्स करत असावेत. चुमूटभर तंबाखूचे गुणगाण सांगत विक्रि करत असावेत. पण तंबाखू ही कर्करोगाला आमंत्रीत करते. त्याच पापक्षालन करण्याची संधी मला मिळाली. कर्करोगाला टाळण्यासाठी सकस आहाराची, भाजीपाल्याची निर्मिती करण्याची संधी दैवाने माझ्या हातून निर्माण केली. काय हा योगायोग म्हणावा…
माझे आजोबा (वडीलांचे वडील) रामभाऊ हे मुबंईला ब्रिटीश सैनिकांचे कपडे शिवत होते. पण ते शहरातील जिवनाला कंटाळले व गावाकडे परत आले. गावाकडचे सारखे जिवन जगण्याची हौस माझ्यात पण आली ती त्या रक्तातून आली असावी असे मला प्रकर्षाने जाणवते.
माझी आजी (वडीलांची आई) भटाबाई हिला शेतीची जाम हौस, तिने लावलेले बि हे हमखास येणारच. गच्चीवरची बागेच्या पुस्तकावर असलेलला सिंलेडर एवढ्या भोपळ्याचे बि तिनेच तिच्या हाताने लावला होतो. त्यांचा फोटो काढतांना मला तेव्हाही माहित नव्हते की आपण हेच काम पुढे जावून करणार आहोत. तिची शेतीची हौस माझ्यात तिच्या रक्तातून आली…
माझी आई जिजाबाई हि कोणतीही गोष्ट चिकाटीने करणे, मेहनत करणे हा तिचा गुण… तिला टाकावू वस्तू कामास येईन, ति जपून ठेवणं. हा तिचा गुण माझ्यातही आला. नि गारबेज टू गार्डन. टाकावू वस्तूंचा पुर्नपयोग हा गुण माझ्यात आला. ( तिचा या गुणांचा आता रागही येतो. कारण विविध वस्तू ति गोळा करते. नि पसारा होतो म्हणून मला त्याचा काहीना काही उपयोग करावा लागतो व विशेष म्हणजे त्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणून राग येतो. पण असो.. तिच्यातील मेहनतीचा गुण माझ्यातही आला. कष्टाची तयारी असते. बारकाईने एकाद्या संसारी बाईने संसार करावा तसा हा उद्योग उभे करतांना जाणवू लागले आहे.
माझी आईचे वडील (नथू) हे मापारी होते. शेतातून आलेले धान्य हे मोजून घेणे हे त्यांचे काम. त्याचा व्यापारी वृत्ती ही रक्तात आली. मापात पाप कधी करू नये अशी असलेली म्हण ही आम्ही प्रत्यक्षात आणतो. जी गोष्ट करायची ती शंभर टक्के बरोबर, बिनचूक करायची. आज गच्चीवरची बाग हे व्यावसायिक पध्दतीने वाढवणे हे त्यातून आले असावे.
माझ्या आईची आई (जमनाबाई) ही फार काटकसर करणारी संसारी बाई. नथू आजोबाच्या निधनानंतर त्यांनी तिन मुली व तीन मुलांचा सांभाळ केला. ति काटकसर पणा, गरजेचे काय आहे त्याला प्राधान्य देणे हे तिच्या रक्तातून आला. एकदा लहानपणी तिच्या सोबत धान्य निवडत होतो. जमिनीवर खाली पडलेले चार दाणे ति बारकाईन वेचून घेत होती. मी म्हटलं आजी.. जावू देना… चार पाचच दाणे आहेत. काय त्याच्यात. तिने छान उत्तर दिले जे आज लक्षात आहे. तिने सांगितले चार दाणे काय नि पोतं भर दाने काय पिकवायला सारखाच वेळ लागतो ना… तिच शिकवण तेच रक्त आज आम्ही चिमूटभरही खत वाया जावू देत नाही.
माझे वडीलांच्या आईचे वडील हे फॉरेस्ट रेंजर होते. त्यांना जंगल आवडत असावं म्हणूनच ते नोकरी स्विकारली असावी. मलाही जंगल आवडतं. आज आम्ही गच्चीवरच्या बागेच्या रूपात गच्चीवर भाजीपाल्याचे जंगल उभे करत आहोत. आपण नाही जायचं आता जंगलात, आहे तेथे जंगल करायचे. घरातच झाडं लावायची… बघूया.. येतय का प्रत्यक्षात, असं स्वप्न रोज पडतय. …बायकोला म्हणालो होतो. जंगलातच राहू… निवांत शहरापासून दूर.. कर्ज नाही. पाणी नाही. हव्यास नाही. जिभेचे चोचले नाही. फक्त झाडं, पशू पक्षी, प्राण्याच्या सोबततीत आयुष्य संपन्न करायचे पण ते राहूनच गेले
पण माझी एक कल्पना आहे ति फार अवघड नाही… काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन हजारो एकर माळरानाची, ओसाड जमीन विकत घ्यायची. त्यात स्पेशल फॉरेस्ट झोन (S.F.Z) तयार करायचा. तेथे फक्त नि फक्त निसर्ग नि मानव अर्थात आपणच. सार्यानि मिळून निसर्ग संपन्न करायचा. नंतर तो आपल्याला समृध्द करेनच. तेथे आधुनिक जिवनशैलीचे काहीही प्रतिकं नसतील. ना इंटरनेट, फोन ना काही सोयी सुविधा.. तेथील सारे राहणीमान निसर्ग पुरक, सुसंगत असेन पण तेथे विचाराने, आचाराने उन्नत मानव संस्कृतीचे दर्शन सुध्दा असेन… मला तर असं वाटतं की असं एक मृत्यूपत्रच तयार करावं… म्हणतात की आपलं मृत्यूपत्र जसे लिहून ठेवलं तसाच मृत्यू होईल. मलाही असं वाटतं. दाट जंगलात एकाद्या वड पिंपळाच्या गर्द गार छायेत… पोर्णमेच्या चांदन प्रकाशात… गाय व वासराच्या सानिध्यात तळाच्या काठी सारे अवयव, स्मृती शाबूत राहून, सर्वाचा निरोप घेवून, सर्व कर्म व कर्तव्य पूर्ण करून, जबाबदार्या वाटून ईच्छा मरण यावे असो…
तर असा वंशाचा फांद्याचा डोलारा जेवढा बाहेर दिसतो तो आपल्या आत मधे कितीतरी खोल रूजलेला असतो. म्हटलच आहे की अधात्म हे सहजा सहजी एकाद्यात रूजत नाही. ते मागील सात पिढ्यापासून रूजत यावे लागते. तेव्हा कुठे आध्यात्मिक होता येते. निसर्गाच्या ज्ञानाच्या मार्गावर चालतांना याची आता हळू हळू प्रचिती येतेय.
संदीप चव्हाण, गच्चीवरची ( रसायनमुक्त भाजीपाल्याची) बाग, नाशिक.
9850569644 / 8087475242
You must be logged in to post a comment.