गच्चीवरील बाग फुलवता फुलवता आम्ही किचन गार्डन व त्या अनुषंगाने शेती संबधीही मार्गदर्शन करत असतो. बरेचदा विषमुक्त शेती कशी करावी या संबधी विचारणा होत असते.
शक्य असल्यास प्रत्यक्ष फार्मवर भेट देवून त्यांना सांगत असतो किंवा त्यांना दूरध्वनीवर मार्गदर्शन करत असतो. यातील नेहमीचा व कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे शेती करायची तर एकादी देशी गाय पाळणे फार गरजेचे आहे. मग ती दुध देणारी नसली तरी चालेल अगदी भाकड गाय असली तरी चालेल. पण लोक नेहमी दावा करतात की आम्ही त्यांना सांभाळू शकलो नाही तर, त्यांना त्रास झाला तर, त्यांची सेवा नाही करता आली तर…
अशा मंडळीना एक सांगायचे आहे की आपण आहे त्या परिस्थितीत आपल्या आईला, वडीलांना सांभाळतोच ना. आपण जे खातो ते पण तेच खातात. आपण जेथे राहतो तेथेच ते पण राहतात. त्यावेळेस आपण म्हणतो का की त्यांची सेवा करता येत नाही म्हणून त्याची वृध्दाश्रमात पाठवणी करतो. नाही ना.. कारण ते आपल्याजवळ अधिक आनंदी व सुखी असणार आहेत.
तसेच गायीचे आहे. तुम्ही आहात तसे आहे त्या परिस्थितीत त्यांना सांभाळा तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा करा. खूप काही खर्चाची गरज नाही. कारण आज त्यांना सांभाळू शकलो नाही तर ती उद्या कत्तल खाण्यात जाणारचं आहे. त्यांना दत्तक घेवून होईल तेवढी सेवा करायची हे योग्य की त्यांना दत्तक न घेताच वार्यावर सोडणे योग्य. ते तुम्हीच ठरवा. अर्थात गो पालन तुम्हाला कोणतेही उत्पन्न नको असेल तरी करू शकता पण शेती असेल तर नक्की करा. मग ति रासायनिक असो की विषमुक्त शेती. कारण गायीचे शेण व गोमुत्र हे जमीनीच्या स्वास्थासाठी फार गरजेचे आहे. तिच्या चारापाण्याचा होणारा खर्च हा सहजतेने तिच्या शेण व गोमुत्रातून निघू शकतो एवढी ती लाभदायी असते. थोडक्यात परवडत असते. मग आणखी काय हवयं.
गायीला काय लागते. दोन वेळेस चारा पाणी, एक डोक्यालर सावली मिळावी म्हणून छप्पर असलेला गोठा व स्वच्छ जागा. शक्य असल्यास गुंठा दोन गुठ्यांची मोकळी जागा. रात्रनिवासासाठी तिचा गोठा हा जागा योग्य उतार देवून सिमेंटचा कोबा केलेला असावा. त्यांना मातीच्या गोठ्यात ठेवू नका. कारण चिखलात तिच्या पायाला इजा होण्याची शक्यता असते. आजही आदीवासी भागात महिना महिना पाऊस चालू असतो तेव्हा त्यांना गोठ्यात बांधून ठेवतात. वरून छप्पर गळके असते. त्यात खाली चिखल शेण, मुत्राचा चिखल असतो. शक्यतो असे टाळा. गोठ्याची जमीन ही हजार बाराशे पेक्षा अधिक खर्च येत नाही. तसेच छप्परसाठीही एवढा खर्च येत नाही. फक्त ईच्छा शक्ती हवी. गायीचा गोठा कसा करायचा या बद्दल तुम्हाला फोनवर मार्गदर्शन करू. शहरात असाल तर गायीसाठी चार्यांचा संग्रह करायची गरज नाही. त्यांच्यासाठी उसाची कुट्टी मिळते. घरचा भाजीपाल्याच्या काड्या मिळतात. नाहीच मिळाल्यातर फळांच्या दुकानावरची फळे, भाजीपाल्याच्या दुकानावरचा भाजीपाला मिळतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांना चौरस आहार कसा मिळेल याचा विचार करा. जे उपलब्ध आहेच तेच भरवू नका. त्यात समतोल असला पाहिजे. गायीसाठी धान्यांचे कुट्ट्यारही मिळते. ज्यात गव्हाचा कोंडा, तुरीचा भूसा, कापसाची पेंड, शेंगदाणा ढेप मिळते. त्यांचाही वापर करा.
आपल्याकडे शेती असेल तर बघायलाच नको. मका, घास, भूईमुग, मूगाचा पाला, उगणारे गवतही त्यांचासाठी खाद्य म्हणून वापरता येते.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.
8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.
You must be logged in to post a comment.