घराला, बंगल्याला शेताला आपण तारेचे अर्थात जाळीचे कुंपन केलेले असल्यास तुमचे अभिनंदन, कारण जाळीचे कुंपन हे पर्यावरणपुरक आहे. अशा कुंपनाला एक तर आपण प्रायव्हसीसाठी ग्रीन नेट लावू शकता. किंव त्यासाठी वेलवर्गीय वनस्पतीची लागवड करू शकता.
वेलवर्गीय वनस्पती लागवडीचे फायदे पहिल्यांदा पाहूया..
हवा खेळती राहते. कमीत कमी जागा लागते. कुपनांच्या दोनही बाजूला कुंपनाला खेटून बाग फुलवता येते. तसेच नारळ आंब्याची झाडे लागवड करू शकता. तसेच याभोवती बाग फुलवल्यास आपल्याला नैसर्गिक गारवा अर्थात तापमान नियंत्रीत करता येते.
अशा जाळीच्या कुंपनावर नेहमी ऊन येत असल्यास त्या ठिकाणी कोणकोणत्या वेलवर्गीय वनस्पतींची लागवड करता येते. ते पाहूया..
- पॅशन फ्रूट २) गोकर्ण ३) कृष्णकमल ४) मधूमालती ५) तोंडली ६) बदक वेल ७) गारवेल ८) गुळवेल ९) बोगनवेल १०) रातरानी ११) संक्रातवेल १२) जाई जूई १३) मॉर्नींग ग्लोरी १४) मायाळू १५) विड्याचे पान १६) हंगामी वेलः वाल, कारले, दुधी, चवळी, दोडके, गिलके. १७) रानजाई १८) वेली गुलाब १९) मनीप्लॅंट २०) कर्टन क्रीपर
वरील वनस्पतींचे चार प्रकारात वर्गीकरण करता येईल..
- औषधी वनस्पतीः गुळवेल.
- फुलांचे वेलः गोकर्ण, संक्रात वेल, मॉर्निंग ग्लोरी, बदक वेल,
- सुंगधी फुलांचे वेलः गावठी गुलाब, मधूमालती, रानजाई, जाई जुई, रातरानी,
- फळभाज्यांची वेलः सर्व प्रकारची फळभाज्या देणांरी वेल, तोंडली, तसेच मायाळू, विड्याची पाने.
- शोभेचे वेलः गारवेल, कर्टन क्रीपर्स, मनीप्लांट,
बरेचदा मंडळी जाळीचे कुपनांवर वेल लावला तर ते सडून जाईल असा दावा करतात. ते काही अंशी खरेही आहे. पण वाळलेल्या फांद्या, काड्या वेळेवर स्वच्छ केल्या तर तेथे पाणी साचत नाही. त्यामुळे गंजण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच जाळीच्या सडण्यापेक्षा त्यापासून मिळणारा स्वच्छ प्राणवायू, डोळ्यांना सुखवणारी हिरवळ, पक्षांना मिळणारा आसरा तसेच त्यापासून मिळणारे पशू पक्षी व मानवासाठी मिळणारे अन्न हे अधिक सुखदायक आहे.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.
वरील वेलवर्गीयांची अधिक माहिती याच संकेतस्थळावर नावानिशी शोधा..