वयोगट – निसर्गाची सोबत व वर्तन
गच्चीवरची (ऑरगॅनिक भाजीपाल्याची) बाग नाशिक ही पर्यावरणपुरक कार्य करणारी सामाजिक उद्मशीलता आहे. गेल्या दहा वर्षापासून Grow, Guide, Build, Products, Sale N Services या पाच क्षेत्रात काम करत आहे. ही संकल्पना लोकांना फार आवडते आहे. एकाद्या सुंदर कापडाच्या विणी प्रमाणे हा पट वरील पाच क्षेत्र जणू पंच महाभूताप्रमाणे आम्ही लोकांसमोर वेळोवेळी मांडत आलो आहोत. आमच्या नावाची ओळख व पोहच सर्वच वयोगटात पोहचत आहे ही जमेची बाजू आहे. अर्थात यात आपला प्रत्येकाचा, कुटुंबाचाही महत्वाचा वाटा आहे. आम्ही करत असलेले प्रयत्न व आपण देत असलेली साथ या मागे आपल्यातील समान बुध्दीमत्तेचा धागा हा समान आहे. त्या विषयीची माहिती या लेखातून घेत आहोत.
मानवात कोणकोणत्या बुध्दीमत्ता असतात? (Intelligence) या विषयी आजवर अनेक संशोधनं झाली आहेत. होत राहतील. हा बुध्यांक त्या त्या व्यक्तीच्या आवडीतून येतो. आवड ही सरावात रूपांतर झाली की त्या बद्दलचा त्या त्या विषयातील तंत्र, कौशल्य विकसीत होत जातात किंवा त्यांचे अजब रसायन तयार होते. त्यामुळे एकादी व्यक्ती त्या त्या क्षेत्रात अद्भूत व अद्वितीय असे काम करून जाते. त्यातूनच , जिवन जगण्याच्या पध्दती वा करिअरच्या वाटा खुल्या होतात.
कुणीही कोणत्या क्षेत्रात अपघाताने येत नाही. त्यामागे त्या त्या व्यक्तिवर बालपणात काय व कसे संस्कार झालेत. कोणत्या प्रकारचे वातावरण होते यावर हे सारं अवलंबून असते. अर्थात हे समजून घ्यायला तेवढा वेळ आपण सर्वांनीच स्वतःला दिला गेला पाहिजे. असो.
एकून संशोधीत आठ बुद्धीमत्तांमधे पर्यावरणीय बुध्दीमत्ता पण येते. प्रत्येक व्यक्तीत प्रत्येक बुध्दीमत्ता ही कमी अधिक प्रमाणात असते. अर्थात त्याची इतर बुध्दीमत्तांबरोबर मेळ जमून त्या त्या व्यक्तिप्रमाणे एकाच क्षेत्रात प्राविण्य मिळवतात. किंवा एकाच क्षेत्रातले पण वेगवेगळ्या पातळीवरचे कार्य, काम, आवडी निवडी तयार होतात. तसेच त्यास बहुआयाम प्राप्त होतात. त्या बुद्धीमत्ता विकसीत होत जातात. तर तुम्ही हा लेख वाचत आहात यावरूनच कळते की तुमची व आमच्या बुद्धीमत्तेची जातकुळी एकच आहे. थोडक्यात आपल्या प्रत्येकात पर्यावरणीय बुध्दीमत्ता ठासून भरली आहे. म्हणूनच तर तुम्ही हा लेख वाचत वाचत इथपर्यंत आला आहात व शेवट पर्यंत वाचायचे ठरवलेही असणार. छान…
भाषीक, तार्किक, सांगीतिक, शारिरिक, भावनात्मक, अंतर संवाद अशा बुध्दीमत्ता या स्वतंत्र्यपणे आपआपले अस्तित्वच ठळकपणे विकसीत तर होतताच पण त्यांच्या एकमेंकाच्या अणूरेणू प्रमाणे जोड्या, तिकडी, चौकडी, कुटुंब, गट बनवूनही त्या एकाच व्यक्तितही फुलत जातात.
उदा : पर्यावरणीय बुध्दीमत्ता असलेली व्यक्तीत पर्यावरणीय व भाषीक अशी बुद्धीमत्ता असेल तर त्याचे वर्तन हे पर्यावरण संबधीत लिखाण करणे, भाषण करणे असे होते.
तर पर्यावरणीय सांगितिक बुध्दीमत्ता असल्यास त्यांच्यात ते विशेषकरून बागकाम करतांना संगीत ऐकणे वा गुणगुणत असतात. किंवा पुढे जावून त्यावर गित लेखन व संगीत देणे वा गायणे हे सुध्दा साकारले जाते.
तसेच शारिरिक व पर्यावरणीय बुध्दीमत्ता असल्यास ति व्यक्ती बागकामात स्वतःच पुढाकार घेते. कुंड्या हलवणे, कुंड्या भरणे, खोदकाम करणे, फांद्याचे छाटणे असे एक ना अनेक. श्रमाची कामे त्यांना आवडतात.
खरं तर अशा प्रत्येक बुध्दीमत्तेचा एकमेंकाशी जोडण्याचे किंबहुना प्रामुख्याने गुफंण्याचे काम पर्यावरणीय बुद्धीमत्ता ही ठळकपणे करत असते. थोडक्यात पर्यावरणीय बुध्दीमत्तेत सर्वच बुध्दीमत्तां प्रतिबिंब दिसून येते. त्यामुळे पर्यावरणीय बुध्दीमत्ता ही सर्वच बुध्दीमत्तेची जननी आहे. असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण माणूस हा प्राणी पर्यावरणातूनच जन्माला आला आहे. त्यामुळे ही बुध्दीमत्ता ग्राह धरावी का असाही एक वाद संशोधकामधे आहे. असो पण ही बुद्धीमत्ता फुलवण्यासाठी गच्चीवरची बाग ही संकल्पना मदतगार ठरत आहे. हे लक्षात येते.
येथे मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे या समाजातील विविध वयोगटातील व्यक्तिसाठी गच्चीवरची बाग कशा रितीने महत्वाची आहे. किंबहुना तिची भविष्यातील गरज ही ठळकपणे अधोरेखीत करण्याचा प्रयत्न या लेखातून करत आहोत. समाजातील व्यक्तिचे खालील प्रमाणे वयोगट केल्यास त्यातून पर्यावरण विषयक आवडी निवडी, त्यातून येणारे वर्तन आपल्याला जाणवू लागते.
६ ते १२, १३ ते १७, १८ ते २४, २५ ते ३४, ३५ ते ४४, ४५ ते ५४, ५५ ते ६४, ६५ ते पुढे
तर आपण कोणत्या वयोगात मोडता, त्यांच्यात पर्यावरणीय बुध्दीमत्तेची कोणती लक्षणे अथवा वर्तन दिसते आहे का? दिसत असेल तर त्यांना या गच्चीवरची बाग या संकल्पनेची किती गरज आहे व त्यांच्या कोटुंबिक जबाबदारी नुसार ते आता कसा सहभाग देत आहेत व या पुढे त्यांनी नेमंकं काय केले पाहिजे थोडक्यात त्याची व्याप्ती कशी वाढवावी हे आपण पाहूया…
निसर्गाने प्रत्येकात सर्वच बुध्दीमत्ता दिलेल्या असतात. पण त्याविषयी त्या व्यक्तिला एक्सपोझर मिळाले नाही तर ते तेथेच खुरटून जातात. त्यामुळे पालकत्व (लहानांचे वा वयस्करांचे) म्हणून पालकत्व जपतांना हा पर्यावरणीय बुद्यांक वाढविण्यासाठी आपण प्रत्येकानेच प्रत्येकाला कोणत्याही वयोगटात संधी दिली पाहिजे, किंवा त्या संधी आवर्जून निर्माण केल्या पाहिजेत. तर पाहूया वयोगटाप्रमाणे या बुध्दीमत्ता असलेल्या व्यक्तिचे निसर्गपुरक वर्तवणूक.
६ ते १२ : या वयोगटातील मुलं मुली ही उत्साही असतात. एका ठिकाणी बसणं तसं अशक्य असतं. यांना कोणत्यातरी गोष्टी सातत्याने हाताळून पहाव्याशा वाटतात. रंगी बेरंगी फुलं, फुलपाखरं तसेच पाण्याच्या फवार्या सोबत, पाण्यात, मातीत, चिखलात खेळावसं वाटतं. यांना या वयोगगटात जर आपण आपल्या बागकामात सहभागी करून घेतलं तर ते त्याच्याशी फॅमीलिअर होतात. त्यांना आपल्या आजूबाजूला घडणार्या अनेक घटनांबद्दल कुतुहल असतं. बिज कसं रुजत, ते कसं मोठ होते. हे त्यांना करून बघायचं असतं. असं बरच काही .. या आवडीला त्यानां पालकांनी, शिक्षकांनी जपू द्यावं. कदाचीत ते निसर्गाची चित्र सुध्दा काढतील. त्यातील प्राण्याच्या गोष्टी त्यांना आवडतील असं बरच काही या पर्यावरण बुद्याकांत येतं. त्यांना पालक म्हणून संधी द्या. हे विविध वयोगटातील पालक त्यांचे आईबाबा, ताई दादा, शिक्षक, आजी आजोबा कुणीही असू शकतं. त्यांना बागेत काम करतांना सहभागी करून घ्या. पालेभाजी, फळभाज्या, वेलवर्गीय, कंदमुळे, फुलझाडे याच्यांशी त्यांची ओळख करून द्या. मुख्य म्हणजे या वयोगटात त्यांना निसर्गाशी तोंडओळख करून देणे, त्यांच्या ढोबळ संकल्पना समजावून सांगणे अथवा हाताळू देणे गरजेचे आहे.
१३ ते १७ : या वयोगटात मुलं ही मुख्य आवडीपासून भरकटू शकता. पण हे भरकटणं म्हणजे सोडून देणं नसतं. त्या त्या क्षेत्रात ते काय काय नव नविन आहे याचा शोध घेत असतात. कदाचीत ते या विषयीच्या फिल्म पाहतील. त्या त्या विषयांच्या स्पर्धा व सहलीमधे सहभाग पण घेतील. त्यांच्या जाणीवेच्या पातळीवर आवडीचा विषय जरा धुकट होईल व ती फक्त काचेवर साठलेली धुळ अथवा धुक असतं. पालकांना या वयोगटात त्यांना प्रेरीत केले पाहिजे. किंबहूना त्यांना हात पकडून तेथ पर्यंत नेलं पाहिजे. थोडक्यात या वयातील गटातील बुध्दी ही ढोर बुद्धी असते. वळून, चुकारून त्यांना तेथ पर्यंत न्यावं लागतं. त्यांच्यात पर्यावरणीय बुध्दीमत्ता कशी वाढीस लागेल याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. त्यानां निसर्गा विषयीच्या बातम्या आवडतील. त्यांना पर्यावरण संवर्धनाच्या बर्याच गोष्टी माहीती सुध्दा असतील. कदाचीत ते जाणीवपूर्वक त्यांच्या आयुष्यात गुफंण्याचा प्रयत्न करतील. त्यांना आवडीचे झाडं लावावेसे सुध्दा वाटेल. कचरा व्यवस्थापनात, वर्गीकरणात सहभाग घेतील. या वयोगटात पालकांनी पर्यावरण बुध्दीमत्ते विषयीचे परिघावरचा निसर्ग सजमून घेण्यास प्रेरीत केले पाहिजे.
१८ ते २४ : या वयोगटातील तरूण मुलं त्या त्या बुध्दीमत्ते नुसार करिअरच्या वाटा शोधू लागतील. आता त्यांच्यात कोणती बुध्दीमत्ता ठळक आहे, त्याची दिशा कोणती आहे. हे प्रामुख्याने जाणवू लागेल. पर्यावरण विषयक शिक्षण ते जाणून घेतील. या क्षेत्रात काम करणार्यां लोकांना ते ओळखू लागतील. कदाचीत त्यांच्यातील बुध्दीमत्तेतील आवडीची, निवडीची क्रमवारी ठरवेली असेल. कशाला प्राधान्य द्यायचे व नेमंक काय हाती घ्यायचं याचा ते निर्णय करण्याच्या पायवरीवर असतील. तर या वयोगगटातील तरूण नेमकं काय व कोणते काम ठळकपणे करतात. याला पालाकांनी शोध घ्यावा. त्यात भविष्यात कोणत्या संधी आहेत. याची ओळख पालकांनी आपुलकीने करून द्यावी. पर्यावरणीय बुध्दीमत्ता असल्यास ही मुलं बर्यापैकी पर्यावरण क्षेत्रात नेमकं काय करायचं हे ठरवून टाकतात व त्यांच्या विचारांच्या वारूवर स्वार होवून कृतीचा लगाम हाती घेतलेला असतो. आणि चौफेरित्या उधळू लागतो. किंवा ते नसर्रीत झाडे आणण्यासाठी येतील. छोट्या मोठ्या कामात तात्पुरता हातभारही लावतील. निसर्ग सहलीला जावू लागतील. निसर्गात रमतील. वृक्ष लागवडीच्या समूहात सहभागी होतील. भाषा व संवाद कौशल्य असेल तर वृक्षातोडीवर बंदी आणतील.
२५ ते ३४ या वयोगटातील तरूण कौटुबिंक जबाबदारी घेवू लागतील. ते नोकरी करू लागतील. ते आपला जोडीदार त्या विचारांचा शोधू लागतील, पर्यावरण बुध्दीमत्ता असलेल्या या वयोगटातील व्यक्ति शेवटच्या अर्धा टप्पात ही माणसे (स्त्री व पुरूष) घरी कुंड्या आणणं, त्यांना पाणी देणं त्याची काळजी घेवू लागतील. त्यावर चर्चा करतील. त्यांना शेती करावीशी वाटू शकते. त्याना बाहेच्या जगात पर्यावरण क्षेत्रात काय चाचलंय याची स्पष्ट कल्पना आलेली असते. आपण काय खातो, ते कितपत चांगल आहे याची त्यांना स्पष्टता असते. निसर्गातील छोट्या छोट्या कार्यात ते (घर ते परिसर) सहभाग घेवू लागतात. त्यासाठी मी स्वतः नेमके पणाने काय योगदान देवू शकतो याचा कृती आराखडा तयार असतो. या वयोगटातील व्यक्तिची समाजात पर्यावरण मित्र किंवा या मित्रांचे मित्र म्हणून नाव व्हायला सुरूवात झालेली असते. लोक त्यांना त्यांच्या कामाने ओळखू लागतात. या वयोगटात लहान मुलांचे पाऊलं प्रत्येकाच्या घरात आलेली असते. पालक म्हणून त्यांना आपल्या पाल्यांना पर्यावरण विषयक संवदेनशिलता निर्माण करतात. पर्यावरण विषयक मुद्यावर ते आंदोलन करू शकतात. जनजागृती करण्यात ते पुढे असतात. थोडक्यात पर्यावरण बुध्दीमत्ता ही इतर बुद्धीमत्तांना आता स्थिरस्थावर होत, विण अधिक घट्ट करत असते.
३५ ते ४४ या वयोगटातील माणसांना ही अधिक सक्षमपणे विश्लेषण करू लागतात. त्यांना आपले करिअर, आवडी निवडी कुठे घेवून जात आहेत. याचा सर्वागीन अंदाज आलेला असतो. त्यांचे एक विश्लेषणाची पध्दत असते. ठोकताळे असतात व त्यासाठी व्यापकतेने मी व समाजाने काय केले पाहिजे याची स्पष्ट कल्पना असते. पर्यावरण बुद्धीमत्ता असलेल्या व्यक्ती पर्यावऱण क्षेत्रातील वाटचाल लोकल ते ग्लोबल कुठं जाणार आहे? याची स्पष्टता व त्यासाठी दिशा ठरलेली असते. ते त्या वाटेवरील लक्ष्यावर लक्ष ठेवून असतात. ते कदाचीत लोक सहभागाचे व्यासपिठ तयार करतील. कार्यक्रम घेतील. पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाची इच्छुकता असलेल्या लोकांना मार्गदर्शन अथवा मदत करतात. यांना या वयोगटात निसर्ग समजू लागतो तो कसा काम करतोय, करेन याची स्पष्ट कल्पना असते. व तसे ते मार्गदर्शन करू लागतात. त्यांची काही पुस्तके छापून येतात. वर्तमान पत्रात लेख प्रकाशीत होतात. व्याख्यानं देवू शकतात.
४५ ते ५४ या वयोगटातील व्यक्तीमधील बुध्दीमत्त्तेचे त्या त्या क्षेत्रात व्यवस्थापकीय पायरी गाठलेली असते. ज्याला आपण सिस्टीम लावणे असे म्हणतो. सुसंगतता, त्याची परिणामकारता कशी साधता येईल या विचारात व कौशल्यात ते पारंगत होतात. नव्या नेतृत्वाला ते आकार देत असतात. आपल्यासारखी एकादा वा अनेक तयार व्हावीत यासाठी प्रयत्न करत असतात. पर्यावरणीय बुध्दीमत्ता असलेली मंडळी अनेकांना मार्गदर्शन करू लागतात. पण ते केवळ तांत्रिक नसून त्यातील अध्यात्माची मांडणी करू लागतात. निसर्ग हाच देव आहे इथपर्यंत त्यांच आधात्म पोहचू लागते. त्यांच्या संभाषणात बोलण्यात एक प्रकारचा आपलेपणा जाणवू लागतो. भूतदया तर ही अत्यूच्च पातळीवर पोहचलेली असते. ही मंडळीत पर्यावरण क्षेत्रात असतील तर ते हिरहिरीने पुढाकार घेतात. वय झालयं असं जाणवत नाही. किंवा एकाद्या कामात तंद्री लागली तर त्यात ते रमतात.
५५ ते ६४ ही मंडळी आपापल्या क्षेत्रातील व्यापक पसारा इतरांच्या खांद्यावर सोपवलेला असतो. शारिरिक मर्यादामुळे ते बसून ते काम करू लागतात. किंवा करून घेतात. त्यांच्या निर्णयाची प्रमाण पट्टी ही डार्क किंवा व्हाईट असते. इतरांना जमतच नाही येथ पर्यंत यांची पोहच असते. किंवा अगधी विरोधी भूमिका असू शकते. ते सारं बागकाम एकटे करतील किंवा विषयच सोडून देतील
पण येथेच त्यांची भूमिका फार महत्वाची असते. कारण या वयातच त्यांच्याकडे वेळ असतो. त्यांनी स्वतः निर्णय घेतला तर ते सारं काही हळूवार का होईना करू शकतात. घरातील इतर मंडळी कशाला नको ते उद्योग म्हणून त्यांना दुर ठेवतात. काहीनी नुकतीच रिटायरमेंट घेतेलेली असते. पण तसे करू नका. त्यांना बागकाम कसे सोपे होईल त्याकडे लक्ष द्या. त्यांना उकीडवे बसून बागकाम होत नसेल तर स्टूल द्या. एका उंचीवर कुंड्या ठेवा. एकादा रविवार त्यांच्या सोबत बागेत काम करा. त्यावर चर्चा करा. बघा येथून नवीन आयुष्य सुरू होण्याची शक्यता असते.
६५ ते पुढे येथून पुढे त्यांचे बालपण सुरू होते. रंगी बेरंगी फुले, त्यांचा गंध फार आवडतो. त्यांचे सर्वच प्रकारचे पालकत्व कुटुंबातील इतर व्यक्तीनी स्विकारलेले असते. त्याना आनंद वाटेल अशा गोष्टीत निसर्गही येतो. त्यांच्या सोबत ते वेळ घालवतात. त्यात त्याना करमू लागते. नवं काही करण्यापेक्षा आहे तेवढं पुरे असे असते.
टीपः लेखात दिलेले वयोगटानुसारचे वर्तन हे पुढील अथवा मागील वयोगटासाठी थोड्याफार फरकाने लागू पडू शकते.
तर असा हा वय व निसर्गाची सोबत सांगणारा लेख.. आपल्याला आवडला तर नक्की शेअर करा.
संदीप चव्हाण. गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644 / 8087475242
http://www.gacchivarchibaug.in