दीड दोन महिने सातत्याने पावसाची रिप रिप सुरू असली की बागेतल्या छोट्या मोठ्या झाडांवर रोग यायला सुरूवात होते. त्यातला सर्वात महत्वाचा जो रोग असतो तो बुरशीजन्य रोग होय. यात पानांवर सफेद थर, काळा थर तयार होतो. या बुरशीची सुरूवात असेल तर ती सफेद दिसते. त्यानंतर ति काळ्या रंगात रूपांतर होते. यास पावडर मिल्यू ड्यू असे म्हणतात.
पावडर मिल्यू ड्यू हा पावसाळ्यात केळीचे पानं, नारळांच्या फांद्या, हिवाळ्यात तुळस, अरेका पाम अशा झाडावंर प्रामुख्याने आढळून येतो. याची कारणे काय आहेत ते आपण पहाणार आहोत.
- ऊनाचा अभाव…
पावसाळा व हिवाळा या दिवसात ऊन कमी झालेले असते. अशा वेळेस कुंद वातावरण हे अशा रोगाला पोषक असते. कडक ऊन हे नेहमी अशा रोगाना म्हणजे सुक्ष्म जिवांना प्रतिकुलता तयार करते असते. त्याचाच अभाव असेन तर हा रोग जोर धरतो.
- तळाशी पाणी साठणे…
जमीनीत ही झाडे असतील व विशेषतः शहरी भागातील बंगला, अपार्टमेंट भोवताली जी झाडे असतात त्यात हा रोग प्रकर्षाने जाणवतो. कारण बंगल्याचं बांधकाम पूर्ण करतांना भर म्हणून सिमेंटचे डेब्रिज टाकले जाते. सिमेंटच्या गोण्या, चुना, सायगोल, प्लास्टिकपण त्यात असतात. व वरून मुरूम किंवा माती भरली जाते. कालातंराने त्यावर झाडे लागवड केली जाते. पण पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साठते. थोडक्यात योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होत नाही. अशा वेळेस ते सडलेले, साठलेले पाणी झाडांना रोग उत्पन्न करतात. व अधिक पाण्यामुळे बुरशीजन्य रोग निर्माण होतात.
- काही कुंडयातील झाडांमधेही हा रोग होतो. त्याला कारण ही वरील प्रमाणेच असतात. उन्हाचा अभाव, पुरेसे ऊन नसणे, तळाशी पाणी साठणे.
यावर उपाय काय…
- ताक फवारणी…
- मिल्यू ड्यू आल्यास त्यावर तीन सायंकाळ ताक पाणी फवारावे. ताकातील सुक्ष्म जिवाणू हे त्या मिल्यू ड्यूला संपवतात. पण पानांवर काळे डाग तसेच राहतात. कारण ते पानांच्या रंध्रामधे साचलेले असतात.
- निमार्कची फवारणी…
निमार्क वापरावे, निमार्क व निमतेलात फरक आहे. निमतेलात लोणी सारखा गाळ असतो जो पंपात अडकतो. तेलकट असल्यामुळे पानांवर त्याचा थर तयार होतो व पानांची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बंद होते. तर निमार्क हे पानांवर पडले व त्यावर पाणी पडले तरी विरघळते किंवा धुतले जाते. त्यामुळे निमार्क पाणी फवारावे.
- घरातील कुंड्यात झाडे असल्यास त्यास दोन तीन दिवसातील हाताने पाणी स्प्रे करा. त्यावर बसणारी धुळ ( डस्ट) धुतली जाते. कारण पानांवर सुक्ष्म धुळ साचली की ती इतर कीडीना आमंत्रित तर करतेच. पण साचलेली धुळ ही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बंद करते. व अशक्तपणामुळे झाड रोगांना बळी पडते.
- घरात आपण काही शोभेच्या झाडांच्या कुंड्या ठेवतो. जागेच्या कमतरते मुळे एक किंवा जोडी ठेवतो. सहा महिने झाड चांगले असते व नंतर अचानक किंवा हळू हळू मरायला लागते. कारण उन्हाची कमतरता.
झाड नर्सरीत अथवा उन्हात असेन तर ते खोडामधे अन्न साठवून ठेवते. जसे आपेल शरीर साठवते तसे. पण झाडं सावलीत किंवा प्रकाशात ठेवले तर त्याचे रोजचे अन्न तयार होत नाही. व खोडात साठवलेले अन्न वापरावे लागते. ते अन्न संपले की झाड हळू हळू मरायला लागते. अशा वेळेस आपल्याकडे त्याची अतिरिक्त कुंड्या असाव्यात ज्या उन्हात असतील. तर या दोन्ही जागेवरील कुंड्याची पंधरा दिवसातून एकदा आदला बदल करावी. म्हणजे सावलीत (व्हरांडा, पॅसेज, घरात) कुंड्या पंधरा दिवसांनी उन्हात म्हणजे गॅलरीतील, गच्चीवर जातील. व उन्हातील तिच झाडे घरात येतील. याने कुंड्यातील झाडांना योग्य अन्न तयार करता येते.
नियमीत फवारणी करा…
आपण तहान लागली की विहीर खोदतो. पण आजाराला आमंत्रण द्यायचेच कशाला. झाडांना आजार असो किंवा नसो त्यावर दर पंधरा दिवसांनी गोईत्र पाणी, दशपर्णी-पाणी, निमार्क पाणी, ताकपाणी यांची आलटून पालटून फवारणी करावी.
टीपः सदर संकेतस्थळ आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला वार्षिक पंचवीस हजार खर्च येतो. आपल्याला या संकेतस्थळासाठी काही आर्थिक मदत करू शकता.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
You must be logged in to post a comment.