फुलांची अथवा भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे वेळ देणं आलंच. आपण त्यासाठी अभ्यास, मेहनत व कष्ट नाही घेतले तर येणार्या भाज्यांची, फुलांचे काय सुख…आम्हाला भाजीपाला फुलवायचाय, घरच्या भाज्या खायच्या… अशी बरीच मंडळी भेटतात. हौसेने ते करतातही. पण नंतर मेहनतीची, अभ्यासाची वेळ आली की त्याला मागे सरतात किंवा आहे आमच्याकडे माणूस देईल तो पाणी…
अरे पाणी देवून भाजीपाला आला असता तर मग पाणीच दिलं असतं ना शेतकर्यांनी. शेती कशाला तोट्यात गेली असती. शेती फुलवणं म्हणजे त्यात निसर्गाचा पन्नास टक्के वाटा असतो. आता शेती पध्दत पूर्वी सारखी नाही राहिली. आता वातावरण, तापमान बदलते आहे. रसायंनाच्या भरमसाठ वापरामुळे जमीनीचे आरोग्य बिघडले. आजारी माणसांकडून आपण चांगल्या कामाची, गुवत्तेची अपेक्षा कशी करणार. त्यातल्या त्यात शेती हा विषय आता ज्याला काही येत नाही त्याने शेती करावी हा समज व परिस्थिती बदलली आहे. या उलट ज्याला सर्व काही येते त्याने शेती करावी. कारण शेती करणे ही कला आहे. ज्याला चौसष्ट कलामधील या कलेचा समावेश होतो. त्यामुळे त्यात आता हुशार, अभ्यासू लोक शेतीत शिरताहेत. ही जमेची बाजू आहे. असो..
पण शेती जमीनीवर करणे काय नि गच्चीवर, शहरात करणे काय निसर्ग सारखाच काम करतो. उलट गच्चीवर शेती करतांना आपल्या तेथील फिरत्या हवेचा, तापमानाचा विचार करून शेती करावी लागते. तसेच झाडांची संख्या कमी असेन व आपण विषमुक्त बाग फुलवत असाल तर कीड ही येणारचं कारण त्यांच्या शिवाय हे जैवविविधतेचे चक्र अपूर्ण राहते.
तर अशा शेतीला वेळ देणं आलाच. आपल्याकडे वाहन चालक, मेड संर्व्हेंट अशी काही हक्काची माणसे असतात. पण त्यांच्यावर जबाबदारी सोपवून चालणार नाही. कारण त्यांच्यासाठी हे एक काम असते. पाणी टाकायला सांगीतले ते तेवढेच टाकणार, ते किती टाकायचे, कसं टाकायचे याच्यांशी काही घेणं देणं नसते. पण कशामुळे काय होत याला शेतीची, निसर्गाचीच आवड असणाराच, अभ्यासू माणूस पाहिजे. तुम्ही नोकरी करत आहोत किंवा व्यवसाय. तुम्हाला थोडा वेळ हा बागेसाठी द्यावाच लागणार. हा थोडा वेळ म्हणजे काय.. ते या लेखातून सांगणार आहे.
बागेत खूप सारी कामे असतात, पाणी देणं, साफसफाई करणे, उकरणी (उकरी) करणे, नव्याने बियाणे, रोपे लावणे, फवारणी करणे, झाडांची कंटीग करणे. त्यांच्याशी संवाद साधणे, झाडांच्या आरोग्याकडे पहाणे, तज्ञांशी त्या विषय़ी चर्चा करणे, भाजीपाल्याची बाग असल्यास वेळेवर भाज्या काढणे, वेळेवर जर नाही काढल्यातर गयी भैसं पाणी में असे होते. सर्वच कष्ट वाया जातात.
तर पहिल्यांदा या कामांची विभागणी करा. कोणतं काम तुम्हाला करावे लागणार, कोणते काम इतरांकडून करून घ्यावीत. कोणत्या कामात तुम्हाला लक्ष घालावे लागणार, कोणती कामे तातडीची करणे गरजेची कोणती कामे ठराविक वेळत झाली पाहिजे याचे नियोजन तुमच्या डोक्यात तरी असले पाहिजे. तरच बाग उत्तम प्रकारे फुलवू शकता.
स्वयंपाक घर हे गृहीणीसाठी गुतांगुंतीचे, साखळीबध्द, लयबद्ध असे काम आहे. त्यांतर त्या खालोखाल बागकाम येते. त्यामुळे सर्वीच कामे तुम्ही एकट्याने करावीत हा आग्रह धरू नका. कामाचे विभाजन करा. इतरांना प्रेरीत करा.
तुम्हाला एकट्याला वेळ देण्याची वेळ आली तर मग त्यासाठी खालील गोष्टींचा विचार करा.
बाग किती वाढवायची, त्यात किती लक्ष घालायचं. बागेचा किती पसारा आपल्याला झेपेल याचा शांत बसून विचार करा. काही मंडळी एवढा पसारा वाढवतात की काहीही दिसलं का आणं बागेत. अरे बागेचे काय संग्रालय बनवायचे काय ? की तुम्ही आता सारं वनस्पती विश्व समजून घेण्याचा हट्ट करणार आहे. अशा कामात आपला वेळ जातो खरा. पण तो किती द्यावा यालाही काही मर्यादा असते की नाही. असो.
मुद्दा हा आहे की रोजच सर्व कामे करू नये. रोजच्या रोज पाणी घालावे, फळ, फुलं तोडावीत. त्याची फोटो फेसबूकवर शेअर करावीत. आठवड्यातून एकदा वरचेवर झाडू मारावा, महिण्यातून एका कानाकोपरा स्वच्छ करावा. सर्वच कुंड्या रिपॉटींग साठी आल्या असतील तर त्या एकदम हाती घेवू नका. रोज एक एक कुंडी भरा.
नव्याने झाडं आणली असतील तर टप्प्याटप्प्याने त्याची लागवड करा. त्याचा अभ्यास करा. तीन महिण्यातून नवीन झाडे, बियाणे लावा. कुंड्या भरा. सहा महिण्यातून एकदा माती वाळवून घ्या. कुंड्याना रंगरंगोटी करून घ्या.
ही सारी कामे स्वतः करण्यात अपार आंनद आहे. पण तो आनंद हा जबाबदारीतून येतो. आणि ही जबबादारी निभवायची म्हणजे वेळ देणं आलं. रोज सकाळ संध्याकाळ बागेत फक्त दहा मिनिटे द्या. अर्थात एकदा बागेत शिरलं की वेळ कसा जातो हे कळत नाही. पण तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्या वेळेला बंधन असलचं पाहिजे. जसे कितीही आवडती डिश असली तरी पोटाला तड येई पर्यंत खात नाही ना… मग तसंच बाग कामाचं आहे. झाडं आपल्याला बोलावतातच. जसं वो बुलाती है मगर जाने का नही. वाहून जायचं नाही. नाहीतर नंतर कंटाळा येतो. मग बाग नकोशी वाटते.
आता हे सारं जमेल की नाही.. म्हणून काही लोक लेख वाचूनच म्हणतील नकोच बुवा ही कटकट किंवा हौस, पण असही करू नका. झाडां झुडपाची आवड नसलेली माणसे मानसिक आजाराने ग्रस्त असतात. अर्थात मानशास्त्राच्या कसोटीवर आपण प्रत्येक जण ग्रासितच असतो. त्यांच्यावर निसर्ग हा उत्तम प्रकारे काम करतो. असो…
तर बागेतील कामांचे नियोजन करा. त्याची विभागणी करा, वेळेचे विभाजन करा. कामांचा तपशील ठरवा त्याचे टप्प्यानुसार विभाग करा.. मग फुलबाग हा स्वर्ग वाटतो तर भाजीपाल्याची बाग ही आरोग्याची धन्वतंरी वाटू लागतो.
8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.