रताळी (sweet Potato)

6 (10)
रताळी (sweet Potato)  हे भारतीय उपवासातील महत्वाचे सात्विक पदार्थ आहे. उपवासात योग्य ते पोषण मुल्य मिळावे म्हणून यास महत्वाचे स्थान दिले गेले आहे. तंतुयुक्त पदार्थ (Fiber rich) म्हणून त्यास महत्व स्थान तर आहेच. पण इतरही त्याचे महत्वाचे पोषणमुल्य आहेत.  पिळदार, काटक शरीर बनण्यासाठी रताळीचे सेवन गरजेचे आहे.

तसेच ते मेंदूच्या कार्यप्रणालीला गतीशील बनवण्याचे काम करते. आणि महत्वाचे म्हणजे ते प्रतिकार शक्ती वाढवण्यात मद्तगार ठरते. यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्या सेवनाने वजनही कमी करण्यास मदत करते कारण ते सकाळी नाष्टाला कच्चे खाल्ले तरी दिवसभर भूक लागण्याची खूप कमी शक्यता असते.

माझा अनुभव सांगतो. सकाळी नाष्टा करायला वेळ नसतो. तसेच दुपारच्या जेवणाची सोय नसेल तेव्हा कच्चे रताळी सोबत घेवून जायचे. भूक लागली की रताळी खायचो वर पाणी पिले की दिवसभर भूकेची आठवण यायची नाही.  त्याचे पदार्थः यास बटाटे सारखे गोल काप करून विषमुक्त गुळात उकडून खाता येतात. त्याचा गुळ टाकून शिरा करता येतो. किस करता येतो.

रताळी ही दोन प्रकारचे असतात. एकाचे पान हे हाताच्या पंजासारखे दिसतात. पण यात सुध्दा दोन रंगाचे रताळी असतात. एक पांढरट गुलाबी रंगाचे व दुसरे अगदी गडद राणी रंगाचे असते. सलाड म्हणून त्याचा जेवणात समावेश करू शकतात. तसेच त्यास वाफ देवून ही त्याच्या चकल्या खाता येतात.

रताळीच्या पानानुसार दुसरा प्रकार म्हणजे हे पान गोलाकार असते. त्याची रताळी सुध्दा गडद राणी रंगाचे असते.

लागवड कशी करावी…

पध्दत १… आपण बटाटेचे काप करतो तसे गोल आकारात पण चार चार इंचाचे काप केल्यास त्यास मातीखाली ३-४ इंच दाबावे. त्यास अंकूर फूटतात. मातीच्या आच्छादनासाठी Ground Covering  महत्वाचे काम करते.

पध्दत २.. आपल्याकडे रताळीचा वेल असल्यास त्याच्या २-३ पेरांच्या काड्या कापून त्यात मातीत आडव्या दिशेने रूजवाव्यात त्यास अंकूर फूटतात.

रताळी हे चार महिण्याचे पिक आहे. यास कंपोस्टखत, शेणखत दिल्यास त्याची वाढ भरपूर प्रमाणात होते.

कुंडी किंवा वाफा कसा भरावा..

९ इंच कुंडीत, वाफ्याच्या तळाशी ३ इंच नारळाच्या शेंड्या वापराव्यात. ६ इंच पालापाचोळा वापरावा. नारळ शेंड्या नसल्यास ९ इंच पा.पा. वापरला तरी चालेल. त्यात वरून २ इंच माती, खत वापरावे. रताळीला गादीवाफा किंवा वाफसा येणारी भुशभुशीत पोषण माती गरजेची असते.

ही काळजी घ्या… त्यास १०-१२ इंच कुंडीत, ग्रो बॅग्जस (आमच्या कडे उपलब्ध आहेत) मधे लागवड करता येते. पण कुंडी किंवा बॅग गच्चीवरची बागच्या तंत्राप्रमाणे भरलेली असावी. त्यास येथे योग्य त्या पोषणामुळे वाढीस वाव असल्यास त्याचा वेल म्हणूनही पसरवता येतो. पण जमीन असल्यास उत्तम.. कारण त्याच्या नवीन मुळाना रताळी येतात. थोडक्यात त्याचे उत्पादन वाढते.

रताळीच्या पानांचे मुटकुळे व वड्या… कोंथबिरीच्या जशा वड्या करतात. तशा प्रकारे रताळीच्या पानांचे वडया ही चवीला छान लागतात. तसेच त्याच पिठाचे मुटकुळे वाफून घेतल्यास त्याचेही सेवन करता येते.

संदीप चव्हाण., गच्चीवरची बाग, नाशिक.