दोन दिवस पाऊस पडून वातावरणात स्वच्छता होती. पोर्णिमेच्या दिवशी लख्ख चांदण पडावं तसा दिवसा डोळ्यांना सुखावणारा सुर्यप्रकाश पडला होता. प्रत्येक गोष्ट नजरेत टिपता येईल अशा प्रकाशाची घनता होती. गंगापूर रस्त्याने घरी जात होतो. रस्ता बर्यापैकी मोकळा होता त्यामुळे स्कुटीनेही वेग पकडला होता. गंगापूर रोड वरील जेथे झाडे आहेत तेथे पडलेली सावली व झाड नाहीत तेथे पडलेले ऊन जणू उन सावलीच्या खेळातून आपण जात आहोत असे वाटत होते. सोमेश्वर जवळ होतो. नजरेच्या पुढील दहा मिटर टप्प्यात डांबरी रस्त्यावर काहीतरी तळहाताएवढे फडफडतांना दिसत होते. काही क्षणात विचारांची गती वाढली. काय असेन, एकादा पक्षी? , चिमणी?, वाळलेलं पान? काय फडफडत असावं? म्हणून त्याच्याजवळ गाडी पोहचली  सुध्दा. स्कटी वेगातच होती. त्याला थोडा वळसा दिला नि स्कूटी वेगात पुढे गेली पण. तेवढ्या काही क्षणात नजरेने टिपले की ते फुलपाखरू होते. सुंदर आकर्षक रंगाचे. बस हा विचार करत नाही तोपर्यंत फार पुढे आलो होता. मनात विचार येत होते. अरे काय् काय झालं असणार त्याला, काय करावं, थांबाव कि जावं, दुसरीकडे उचलून ठेवावं का? येणार्या जाणार्या गाडीखाली गेलं तर… पण स्कूटी पुढे जात होती. मागे अचानक गाड्यांचा लोढां वाढला.  

त्या क्षणी मला मागे वळून पहावसं वाटलं नाही. कारण ते फुलपाखरू चिरडलेले पाहण्याची हिंमत नव्हती. ते चाकाखाली चिरडलं गेलं असणार.. पण दुसरा विचार मनात आला. त्याने  मनाची घालमेल झाली. मागे येणार्या गाडीखाली त्या क्षणाला ते फुलपाखरू चिरडलं नसेल तर. आपण एकदा तरी पहायला हवं होते. नसेल उडता येत पण उचलून दुसरीकडे तरी ठेवता आले असता. आपण का थांबलो नाही. का उचलून त्याला बाजूला ठेवलं नाही. एक ना अनेक प्रश्न मनात आले. आजही मला ते फुलपाखरू आठवतं. का तो क्षण माझ्या हातून सुटला… याचं वाईट वाटत, आपल्या हातून असं कसं घडलं. एवलासा जिव वाचला असता कदाचित….

काय करता येईल. त्याच्यासाठी… काय करू शकतो आपण… विचारांच चक्र घटना घडल्या  दिवासापासून सुरू आहे…. त्यातलं एक काम तर करतोय ज्या काही शहरात अर्बन स्पेसेस आहेत तेथे ऑरगॅनिक भाज्या तर उगवून देत आहोत. कुठेही फुलांच्या, फळांच्या, भाजीपाल्याच्या बागेत रसायनं वापरत नाही. त्याने जैवविविधता तर जपली जात आहेच. पण फुलपाखरांच जिवनही फुलत आहे. हे तर झालं.. अजून काही करता येईल का… मी काय करू शकतो, इतर मंडळी त्यात सहभागी होतील असं काय करता येईल…  थोडक्यात आपण सर्वच जण काय करू शकतो… मन फुलपाखरूमय झालंय.. कदाचित हा स्ट्रोक नव्या कामांचा असावा, गच्चीवरीची बाग काम उभं करतांना असाच स्ट्रोक आला होता वर्षभर चालू होता… सेम तिच प्रोसेस डोक्यात चालू आहे.. काही तरी जबरदस्त, लोकांना आवडेल, सहभागी होतील. असेच काहीतरी उभं करायचं फुलपाखरासाठी…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग,  नाशिक. 9850569644