गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. त्यास विविध नावाने ओळखले जाते. पूर्वी यास परसबाग असे म्हटले जात असे.. त्यावरून किचन गार्डन ही संज्ञा नावारूपाला आली. पण जस जसे शहराभोवती लोकसंख्येची दाटी वाढू लागली. त्याप्रमाणे हीच संकल्पना विविध नावाने ओळखली जावू लागली. ही संकल्पना जागा, वस्तूच्या उपलब्धतेनुसार, तिच्या आकारमानानुसार त्यास विविध बिरूदे लागली…जसे की शहरी शेती, टेरेस गार्डन किंवा टेरेस फार्मिंग, विंडो गार्डन, कुंड्यामधील बाग, बाल्कनी गार्डन, सज्जा पर सब्जी, छत पर खेत.. बॅकयार्ड फार्मिंग…वन स्टेप स्व्केअर फार्मिंग,मल्टी लेअर फार्मिंग, रूफ टऑफ गार्डर्निंग , व्हर्टिकल गार्डिनिनग अशी विविध नावे… विविध रूपं… असो.. महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या कडे उलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत उपलब्ध नैसर्गिक संसाधनात आपल्याला सहज सोपी बाग फुलवता येते. खूप काही करायची मूळात गरजचं नसते. सारं काम करतो तो निसर्ग.. आपण फक्त त्याची फक्त छानसी घडी बसवून दयायची…निमित्त मात्र व्हायचे… या विषयी आपण मागील दोन लेखामध्ये सविस्तर पाहिलेच आहे… तर या लेखात आपण गच्चीवरची बाग ही सर्वस्पर्शी वैश्विक संकल्पना कशी आहे ते समजून घेवू या..
आज पर्यावरण हा बर्निंग इश्यू आहे… ग्लोबल पातळीवर असे अनेक प्रश्न आहेत..पण त्याची पाळमूळ पाहीली तर ती लोकलच आहेत हे विसरून चालणार नाही.. म्हणजेच ग्लोबल प्रश्नाना लोकल उत्तरे शोधली पाहिजेत…गच्चीवरची बाग हे ग्लोबल प्रश्नाला दिलेलं लोकल स्वरूपातलं रामबाण उत्तर आहे असे मला ठामपणे वाटते. यातील तत्वाचा परामर्ष घेतला तरी त्यावरून या संकल्पनेची व्याप्ती सहज लक्षात येईल… कचरा व्यवस्थापन, भूसंवर्धन, विषमुक्त-रसायनमुक्त अन्न निर्मिती, निखळ मंनोरंजन, निसर्गाची साथसंगत.
गारबेज टू गार्डन...हे पहिले तत्व…कचरा नव्हे कांचन ही म्हण आपण पूर्वापार चालू आहे. आज शहरात जैविक कचर्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कचर्याच्या विल्हेवाटीत प्रशासनाचा खूप पैसा खर्च होत आहे. अशा कुजणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा व्यवस्थापन केले तर नक्कीच त्यातून अमुल्य असा फायदा होतो. खत बनवणार्या खर्चिक साधनांना फाटा देत सोपे सोपे उपाय अंमलात आणले तर आपण सहजतेने… शिकत शिकत घरच्या ओल्या, सुक्या कचर्याचे छान खत काय एक प्रकारे उत्पादक मातीच तयार करू शकतो. अशा प्रकारे पैसा वाचला तर त्याचा फायदा नक्कीच शहरातल्या इतर विकास कामांना होईल याची खात्री वाटते.
भूसंवर्धनः आज कुंड्यामध्ये शंभर टक्के माती वापरली जाते. त्यापेक्षा पालापाचोळा, नारळाच्य शेंड्या, वाळलेलं किचन वेस्ट, घरी बनवलेलं खत याचा वापर केला तर माती फक्त पंधरा ते वीसच टक्के वापरावी लागते. तिही पहिल्या प्रयत्नांत… नंतर मातीची गरजच पडत नाही… आज नाशिक शहराचा विचार केला तर जैवविवधतेने नटलेल्या त्र्यंबकश्वेरच्या पर्वत खोदले जातात. शहर सुशोभित केले जातात. काही वर्षानंतर ही माती फेकून दिली जाते. पुन्हा नवी माती ट्रक भरून आणली जाते. यात मातीचा वरचा थर खरवडला जातो. पावसाचे पाणी त्यामुळे साचत नाही. पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून नदया, नाले , धरणे यात येवून साचते… असे अनेक प्रकारे आपण निसर्गाचे नुकसान करत असतो. तेव्हा.. गच्चीवरची बाग साकारण्याचे तंत्र वापरात आणले तर बर्याच प्रमाणात आपण पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो.
स्मोक फ्री सोसायटी, कॅलनी… आज सकाळच्या वेळेत लोक शुध्द हवा घेण्यासाठी सकाळी सकळी रपेट मारतात. पण नेमक्या याच वेळेस म.न.पा. कर्मचारी पालापाचोळा जाळतांना दिसतात व आपण धुर घेवून घरी परततो. अशा पाल्यापाचोळ्याचेही छान खत तयार करता येते. त्यापासून माती तयार करता येते…
रसायमुक्त अन्नः आज बाजारात रसायनयुक्त खते, औषधे मारून भरमसाठ व कमी वेळात भाजीपाला पिकवला जातो. असा हा भाजीपाला आपलं आयुष्य कमी करतो तसेच विविध आजारांना आमंत्रण देतो..किंबहूना यमसदनाच्या न परतणार्या वारीला पाठवायची गुपचूप तयारी करतो. आजच्या अन्नात पहिल्यासारखी चव, कस राहिला नाही हे आपण सारेच मान्य करतो.. असा हा भाजीपाला आपल्या डोळ्यासमोर व नैसर्गीक पध्दतीने पिकवता आला तर… नक्कीच आपण सुदृढ आयुष्य जगू शकतो… आणि असा भाजीपाला पिकवणे शक्य आहे…अशा विविध उपयोग व अर्थ सामावलेली गच्चीवरची बाग ही खर्या अर्थाने सर्वस्पर्शी वैश्विक संकलन्पा आहे असे आवर्जून सांगावसे वाटते.