जागा झाला आठवणींचा गाव…

जागा झाला आठवणींचा गाव…

DNP 12Th 1996/1997

लेखक मिलिंद बोकील यांची शाळा नावाची कांदबरी दहा वर्षापूर्वी वाचली होती. अनुभव त्यांचे असले तरी त्यांनी मला वाचक म्हणून नव्हे तर एक शाळकरी विद्यार्थाच्या आठवणी जागा केल्या होत्या. कांदबरी इतकी सुंदर होती की मी माझे शालेय जीवन पुन्हा पुन्हा अनुभवले होते.कांदबरी वाचल्या नंतर तर एकटाच जून्या शाळेच्या वर्ग खोल्यांना भेट देवून आलो. किती छोटे वर्ग वाटत होते. पण त्यांनी आठवणींचा गाव जागा झाला होता. मला माझ्या शाळेची, विशेषतः मित्रांच्या, मैत्रीणींच्या, वर्ग खोल्यांच्या, वर्ग व विषय शिक्षकांच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. आमच्या वर्ग खोल्या, शाळा म्हणजे देवाराम नारायण पाटील विद्यालय ही नवीन इमारत होण्याआधी गंगापूर गावाच्या नदी किनार्यावरील मंदीरात भरायची. त्यामुळे दर वेळेस पुढच्या इयत्तेत गेलो की नवी वर्ग, नवे आकाश, त्यांचा आकार, उंची सारे सारे काही वेगळे असायचे. त्यातील छोट्या छोट्या आठवणी स्मृतीच्या खोल तळाशी निवांत होत्या. पण काल परवाच्या आमच्या वर्ग मित्रांच्या स्नेह संमेलनाने ते ढवळून निघाले. गहीवरून आले. ते फक्त आपण पुन्हा भेटू या आशेने…तर काल परवाच आमचा सर्वांचा वर्ग मित्र फोटोग्राफर सुनिल लोणारे यांने संपर्कातील मित्र- मैत्रणींना दिवाळी निमित्त एकत्र जमायचे बोलवणे पाठवले. तातडीचे आंमत्रण होते. म्हणून जाता आले नाही. पण काही जण आलेत. कोण कोण आलेत त्यांचे फोटोच पहायला मिळाले. मलाही काही कारणास्तव जाता आले नाही. ज्यांना जमले नाही त्यांनी माफीनामा सादर केला… त्यांना फोटोमधे पाहून डोळे पाणावले. खरचं किती मोठं अंतर आपण पार करून आलो आहोत. प्रत्येकजण इतके लहान लहान असतांना शाळेत होतो. आता प्रत्येक जण चाळीशीच्या आसपास आहे. डोक्याचे केसं पांढरी झालीत. खांदा, कमरेचा घेर बदलला. सांसरीक जबाबदार्या पार पाडत, सुखांची फुलं ओंजळीत वेचत इतपर्यंत पोहचलोत. पण मनाचा, हदयाचा एक कोपरा मित्रांसाठी तसाच तहानलेला आहे. काही कोणाला कोणाला कशाचीच अपेक्षा नाही. कुणाचा कुणाला रोज फोन नसतो. पण आठवण तर प्रत्येकाचीच येते. प्रत्येकजण त्या बालपणाच्या, किशोर वयाच्या आठवणीत रमतो आहे. आम्ही मुलं मुलं तरी कधीतरी भेटतो. भेट झालेली आहे. पण मुली तर कुठे गेल्या. काय करताय.. काहीच माहीत नव्हते. प्रत्येकाला भेटीची, सध्या तो किंवा ती काय करते अशी निरपेक्ष विचारपूस करावीशी वाटते. मला किती जण ओळखतील शंकाच आहे. कारण मी तर अंगकाठीने आता चार पट झालोय. खूप लाजाळू, स्वभावाने हळवा मुलगा होतो. वर्गात हुशारांमधे कघी गणती झाली नाही. पण शाळा सुटल्या नंतर खूपच उदयोग केलेत. असो..आज मागे वळून पाहतांना वाटते की किती भरभरून दान या मैत्री च्या नात्याने पदरात दिले आहे. कदाचीत आणखी वय वाढत गेले की त्यांच गोडी, त्याचे महत्व वाढतच जाणार. ही निर्वाज्य मैत्रीनेच तर आयुष्य फुलवलेलं आहे. वर्गातील काही मित्रांची जवळची मैत्री असते. काही विस्मृतीत जातात. स्नेह संमेलनाने या सार्यांना पुन्हा एका धाग्यात ओवण्याचा प्रयत्न केलाय.दोन महिण्यापूवी एका दुकानात भेळ घेत होतो. तेथे टू व्हीलर पार्क केली. लगेच मागावून चारचाकी पार्क झाली. इतका राग आला कोण मुर्ख हा आता आपली गाडी बाहेर काढायची कशी. त्यातील चालक भेळ घेण्यात वेळ घालवत होता. मी चारचाकी मग माझ्या दुचाकी कडे पाहिले तर गाडीत बसलेल्या, एक दाढी वाढलेला नाजूक तब्बेतीच्या माणसाने विचारले… तुम्हाला गाडी काढायची का….क्षणात त्या माणसाचा आवाज माझ्या कानात गेला.. त्याच्याकडे न पाहताच तोंडातून शब्द आलेत.. अरे देवीदास तू… माझा वर्ग मित्र, त्यानेही मला, मी ही त्याला बदलेल्या बाह्य रूपावरून ओळखलं नव्हतं. पण फक्त आवाजाने मला देविदास ओळखू आला… माझा राग कुठेच्या कुठे निघून गेला.. विचारपूस केली. देवीदास ने माझ्या लेकरांला पाहून आपुलकीने चौकशी केली. बालपणीचा मित्र भेटून खरंच खूप बरं वाटलं होतं.मागे आठ वर्षापूर्वी विपश्यना करायला गेलो होतो. तेथेच सांगीतलेच होते. आपल्या गत काळाच्या स्मृती उंचबळून येतील. त्यांना बाहेर येवू द्या.. त्यांना रोखू नका… खरं सांगू दुसर्या दिवशी माझ्या वर्ग मित्रांची, मैत्रणीणींच्या आठवणींची भरती आली होती.. तटस्थ पदधतीने खोल श्वास घेत एकदा तरी त्यांना भेटू असा पण करत त्या आठवणींकडे पाहत राहिलो. अनुभवत राहिलो. ती भरती दिवाळीत झालेल्या स्नेह संमेलनाने पुन्हा आली. मला जाता आले नाही, भेटता आले नाही. पण मित्रांनो मी तुम्हाला सार्यांचीच खरंच आठवण काढतो.मागील महिण्यात मित्र संदीप कोरडे कडे ठाणे येथे गेलो होतो. पहाटेचा प्रवास, दिवसभराची बागेविषयीची कार्यशाळा पार पडली होती. नाशिकला दोन दिवस आधी येवून त्याने घरी येण्याचे त्याने आंमत्रण दिले होते. त्यामुळे वेळ नसला तरी जाणे खूप गरजेचे वाटले. पाच वाजेनंतर तर संदीप कोरडे क्षणाक्षणाला संपर्कात होता. घरी सारिका वहिनेने छान बांसुदीच गोड जेवण केलं होतं. ( आम्हा दोघां मित्रांचा आवडता गोड पदार्थ … हा पण योगायोग होता ) चर्चा वर्तमानावर रंगली खरी पण आम्ही दोघेही शाळेच्या दिवसांतच रमलेलो होतो. त्याचे वाहळाच्या शेजारचे घर, नदीच्या पाण्यातील खडकांवर मधल्या सुटीत जेवणाचा डब्बा खाणे, मला पाण्याची भिती वाटायची म्हणून तो हात धरून घेवून जायचा. जेवता जेवता नदीत असलेल्या छोट्या माश्यांना खावू घालयचो. एकत्रच एका ताटात दुधाचा काला करून खालेला. दर रविवारी त्याच्या कडे महाभारत मालिका पाहयला जायचो. त्याने वाढदिवसाच्या दिवशी वर्गात वाटतेले साखरेच्या रबडीच्या गोळ्या ,,, किती किती आठवणी… संदीप सोनवणे यांच्याशी पण फोनवर गप्पा झाल्या.. निवृत्तीनंतरच आयुष्य नाशिकला संपन्न करू व रसायनमुक्त भाज्यां खावू घालून आयुष्य वाढवण्याची जबाबदारी माझी,,,, असे आमंत्रण देत निरोप घेतला. त्या रात्री संदीप कोरडे कडेच मुक्कामाला होतो. जेवणांनंतर गप्पा झाल्या.. झोपायला एकट्याला वेगळी रूम होती. पण सोबत होत्या बालपणीच्या रम्य आठवणी.. त्यांना उजाळा देत झोप कधी लागली कळालेच नाही. अशा किती किती आठवणी… प्रत्येक मित्रां – मैत्रीणीसोबतच्या… आता त्यांना पुन्हा भेटावं, त्या आठवणींना स्पर्श करावं, तो आपलेपणा, भाबडेपणाची शिदोरी घेत पुन्हा नि पुन्हा समृध्द व्हावं असं वाटतेय.ही मैत्रीची उदाहरणे आहेत.. अशा प्रत्येकाबद्दलच्या आठवणीचा गंध स्मृतींच्या कुपीत दडलेला आहेच. तोच खरं तर सांगावासा वाटतोय.. तशा त्या प्रत्येकाकडेच आहेत.. त्यांनाच उजाळा देवू या… असा आठवणीचा गाव जागा करण्यासाठी खरंच आपण लवकरात लवकर भेटूया…आपल्या आठवणींच्या क्षणांसोबत…दिवाळीत जमलेल्या फोटोतील काही मित्र- मैत्रणी नावासहित लक्षात आल्या… त्यातीलखाली फोटोतील काही मंडळी अनुक्रमे ओळखू आलीत.पहिली रांग..मारूती ढोबळे, २) चिंतामण ढुमणे ३) रमेश माळोदे ४) संजय पाटील. ५) संदीप पाटील, ६) दिपक कटारे, ७) सचिन माळोदे.७) सुनील लोणारे

दुसरी रांग… १) …. २) …३) जयश्री पगारे ४) ज्योती गोधडे ५) संगीता पाटील. ६)… ७) रेखा शिरसाठ…या लेखांअती दहावी व बारावी वर्गातील मित्र- मैत्रणींची यादी अपडेट केली जाणार आहे. त्यांनी कृपया सुनिल लोणारे यांच्याशी संपर्क साधावा व पुढील स्नेह संमेलनासाठी पुन्हा व लवकरच एकत्र जमण्याचे आवाहन करत आहोत. ( फक्त वर्गमित्रांसाठी सुचनाः .ह(आ)… खोरांनो… सुनिलच्या भाषेत.. हं ) हा लेख रात्री तीन वाचता टाईप करतोय… पुन्हा भेटण्यासाठी तेव्हा… अगदी पूर्वनियोजन करत, पुढाकार घेत, संपर्क साधला जाईलच.. किंवा लेख वाचल्या नंतर तुम्ही कुठे असाल तेथून तुम्हीपण संपर्क साधा… पुन्हा भेटण्यासाठी… चाळीशी म्हणजे खूप वय नाही.. अबी तो बचपणा स्टार्ट होगा… शंभरी गाठायची आहेच. पण एकदा हातात काठी की कुणी कुणाच्या घरी भेटायला जायला जमणार नाही म्हणून जमेल तो पर्यंत शाळेच्या निमित्ताने भेटत राहू….काय समजलं ना…

टीप: प्रत्येकाने शाळा कांदबरी वाचून यावी..

संदीप चव्हाण, नाशिक. 8087475242

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.