परसबागेत बियाणांची लागवड कशी करावी याबद्दल बरेचदा माहिती नसते. ति कशी करावी, किती अंतरावर करावी यासाठी लेखात माहिती दिली आहे.
पालेभाजीः
पालक व आंबट चुकाः पालक ही पालेभाजी आहे. पालेभाजींना चार इंच खोलीची जागा पुरेशी असते.
पालक ही एका चौरस फूटांत पाच ठिकाणी लाव्याव्यात. एका ठिकाणी दोन बिया चिमटीत घेवून पेरभर मातीत पेराव्यात. आंबट चुका ही पालकासारखीच दिसणारी भाजी आहे. याची चव मात्र आंबट असते. शिवाय ही जमीनीलगत पसरट वाढते.
धने व शेफूः धने व शेफू ही पालेभाजी आहे. यासही चार इंच खोलीची जागा पुरेशी आहे. एका चौरस फूटाला चार चार बोटांच्या अतरांवर लागवड करावेत. एका चिमटीत पाच पाच बिया घेवून त्यांची पेरभर मातीत बिया रूजवाव्यात.
लाल माठ व हिरवा माठः लाल माठ हिरवा माठाचे बियाणे हे आकाराने बारिक असते. यांची उंची ही २-३ फूट एवढी वाढत असते. पालेभाजी हवी असल्यास एका चौरस फूटांला चिमटी भर बियाणे घेवून ते मातीवर जेवणावर मिठ टाकल्या सारखे चौफेर विखरून द्यावे. मातीखाली दाबायची गरज नाही.
धान्य वर्गीय बियाणे...
ज्वारी, बाजरी, मकाः मका हे धान्य वर्गीय असते. योग्य पोषण मिळाल्यास त्यास पेरा पेरावर कणीस धरले जातात.
मक्यास चार इंच खोलीची जागाही पुरेशी असते. किंवा गच्चीवरच बाग संशोधीत एरो ब्रिक्स बेड मधेही लागवड करता येते. मक्याचे बि हे एका चौरस फूटाला दोन दोन लागवड कराव्यात. बागेत ज्वारी, बाजरी लागवड करतांना एका चौरस फूटाला चार चार बियाणे पेरावेत.
वेलवर्गीय बियाणेः डांगर, वाल, दोडके, गिलके, दुधी भोपळा, कारले, चवळी, काकडी या प्रकारच्या वेलवर्गीय बियाणे हे चार इंच मातीच्या खोलीत अथवा एरोब्रिक्स बेडमध्ये उत्तम प्रकारे येतात. वेलाची वाढ छान होते. कारण त्यास पसरट जागा लागते. एका जागेवर शक्यतो २-२ बिया पेराव्यात. यांची रोपे तयार करण्याची गरज नसते. तसेच यास नर्सरी बॅग्ज मधे बियाणे लागवड करून रोपे वाढवावीत. अशी रोपे वाढलेली बॅग बेड अथवा जमीनीवर ठेवून दयाव्यात. म्हणजे मूळ ही तळापासून बाहेर येवून खालील मातीत वाढतात. डांगर ही जमीनीवर पसरणारी वेल आहे. फळ जड असल्यामुळे त्यास मांडावर पसरवणे जरा आव्हानात्मक असते. पण मांडवावर चढवल्यास फळास हवेशीर टोपली बांधावी. म्हणजे फळाला आधार मिळून ते चांगले वाढते.
कंदमुळे ः मूळा, बिट या सारखी कंदवर्गीय बियाणे ही चार ते सहा इंचाच्या अंतरावर लागवड करावीत.
एका चौरस फूटालां चार बियाणांची लागवड करावी. यात शक्यतो एक- एक बियाणे टोकावे. म्हणजे कंदमुळांना वाढीस वाव मिळतो.
गाजर हे जमीनीवर विखरून टाकावे. त्यास मातीमधे मिक्स करावे. काही रोपे दाटीवाटीने आल्यास त्यांना विरळ करून घ्यावे. जमल्यास दुसरीकडेही त्याची लागवड करता येते.
बटाटेः छोटे आकारातील बटाट्यांची निवड करावी. शक्यतो ज्यास डोळे आले आहेत असे निवडावेत. अखंड लावावेत. किंवा मोठ्या आकारातील असल्यास त्याचे चार भाग काप करावेत. कापलेला भाग जमिनीत एक इंच खोल गाडावा.
कांदापातः काद्याची पात मिळवण्यासाठी पात आलेले जुनाट कांदे लागवड करू शकता. मध्यम आकाराचे किंवा मूठीत बसेल एवढ्या आकाराचे कांदे हे लागवड करता येतात. शक्यतो छोटे कांदे लावणे टाळावे. कांद्याचे मूळ हे जमीनीकडे असावे. कांद्यावर एक- दोन इंच माती येईल या स्वरूपात तो मातीत लागवड करावा.
लसूणपातः लसणाची पात घरच्या घरी पिकवता येते. अखंड लसणाच्या एक – एक पाकळी मोकळी करावी. त्याचे मूळ हे जमीनीकडे ठेवूनच त्यास मातीत एक इंच टोकावे. शेंडा वरील बाजूस राहील याची काळजी घ्यावी.
झुडूप वर्गीय पालेभाज्याः
करडई, आंबाडी ही २-३ फूटांपर्यंत वाढणारी भाजी आहे. याचे लागवड ही एका चौरस फुटाला चार बियाणेंच लावावेत. शक्य झाल्यास एक – एक बियाणे लावल्यास झाडांची योग्य वाढ होवून त्यातून भरपूर पालेभाजी मिळते.
मोहरीः मोहरी ही पालेभाजी आहे. एका चौरस फूटाला चार ठिकाणी एक एक बियाणे मातीवर टाकावे.. अथवा त्यास परसरून द्यावे.
चाकवतः चाकवत हे बियाणे मोहरी सारखे बारिक असते. यासही एका चौरस फूटाला चिमटीत बसेल एवढेच बियाणे वर वर टाकावे.
फळ व फूल भाज्याः मिरची वांगे, टोमॅटो, फ्लावर, कॅबेजः यांची बियाणे मातीत पेरावीत, रोपे साधारण एक बोटा एवढे उंच झाल्यावर त्यांची दुसर्या जागेवर पुर्नलागवड करावी. यांची लागवड ही एका चौरस फूटाला एक एक रोप मध्यभागी लागवड करावी. व त्याच्या आजूबाजूला पालेभाजींच्या बियाणांची लागवड करता येते.
भेंडी व गवारः हे फळवर्गीय भाज्या आहेत. यांच्या एक एक बियाणे हे एका चोरसफूटाला चार बाजूला चार व मध्यभागी एक अशा पाच बियाणांची लागवड करावी.
बियाणे लागवडी बद्दलची काही सुवर्णसुत्रेः
वेलवर्गीय बियाणे हे जमीनीला समांतर मातीखाली टोकावे. साधारणतः एक इंच आतमधे म्हणजे पेरभर जमीनीत राहिल याची काळजी घ्यावी. बारिक बियाणे असल्यास त्यास मातीवर पसरावे.
कोणतेही बियाणे हे सात ते पंधरा दिवसात उगवून येते. उगवून न आल्यास त्याची दुबार पेरणी करावी.
तण व बियाणांची सुरवातीची वाढ लक्षात नाही आल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. बियाणे उगवून येण्यास वाफस्याची गरज असते. अधिक व संततधार पावसात काही बियाणे रूजवून येत नाही.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.