Site icon Grow Organic

Experience : प्राचूचं दुसरे बाळंतपण

Advertisements

आम्ही पाळलेल्या पहिल्या गायीच्या म्हणजेच आर्चीच्या पोटी प्राचू जन्माला आली. प्राचूच्या पहिल्या वहिल्या बाळंतपणाची म्हणजे तिच्या पोटी जन्माला आलेल्या बंडू ची गोष्ट आपण वाचलीय. ( आणि बंडू जन्माला आला.) त्याला खूप जणांचा प्रतिसाद मिळालाय. त्याबद्दल आपल्या वाचकांचे मनापासून धन्यवाद…

प्राचू व बंडू

आता प्राचुच्या दुसर्या बाळंतपणाची गोष्ट पहाणार आहोत. प्राचूला दोन बाळंतपणात पुरेसे अंतर रहावे म्हणून आम्ही पुरेपूर प्रयत्न करत होतो. कुत्रीम पध्दतीने रेतन करणे हे मला आजही पटत नाही. म्हणून योग्य वेळेला ती माजावर आल्यानंतर तिला रात्रीच्या वेळी मोकळ्या पंटागंणात बांधून ठेवलीय. त्या रात्री  वळूंचे (काही पोक्त, काही नवजात) युध्द झाल्यांनतर एकादाचे स्वयंवर पार पडले. अंधारात त्यांचा कार्यक्रम झाला. प्राचू शांत झाली.

नि प्राचू गर्भार राहिल याचा आम्ही अंदाज बांधला. प्राचूची गर्भधारणेची तारिख लिहून ठेवली. तिचे लाड करू लागलो खरे. तीन चार महिण्यात ती गोंडस दिसू लागली. डोळ्यातून प्रेम दिसू लागले. एकदाचे तिच नैसर्गिक गर्भधारणा झाली म्हणून मी बिनधासत झालो होतो. नऊ महिने उलटले तरी प्राचू काही बाळंतपणाचे नाव घेईना. दहावा महिणांही वाट पाहण्यात गेला. नि ति अखेर अकराव्या महिण्यात व्याली. या वेळेसही ती वेणा देत चारही पाय सोडून जमिनीवर पडलेली होती. कास मध्यम आकाराने सुजलेली होती. गायीच्या भोवती कुबट वास येण्यास सुरवात झाली. तिच्या पहिल्या बाळंतपणाचा अनुभव असल्यामुळे आम्ही जय्यत तयारीत होतो. तिचा जार हा कुत्र्यांच्या तोंडी लागू नये म्हणून दोन महिने आधिच खड्डा तयार करून ठेवला होता. काही कापडं हाताला लवकर सापडावीत म्हणून घेवून ठेवली होती. काही पोती बरोबर होती. कुंबट मासं जळाल्यासारखा दुर्गंध अधिकच वाढू लागला. वेळ रात्री साडेदहाची होती. आईने तर मला दोनदा जेवता जेवता बोलावून घेतले होते. पण आज ती व्याणार होती हे निश्चित होते. रात्रीचे साडेदहा वाजले होते. पिल्लाचे तोडं बाहेर येवू लागले. पिल्लू बाहेर आले खरे पण गर्भपिशवी भवती असलेले सफेद रंगाचे सेल्यूलोज हे काळपट होते. पिल्लू अकरा महिण्यांनी जन्माला आले. (अकरा महिण्यांनी जन्माला येणार्याला अकरमाशा, अकरमाशी संबोधले जाते, अकरा मासात जन्माला आलेले स्वभावाने आगावू असतात.) ठरलेल्या वेळेपेक्षा २ महिने जास्त घेतल्यामुळे गर्भपिशवी मधील पाणी हे जवळपास संपलेले होते. नि त्याचाच कुबुट गंध येत होता. मागील वेळेपेक्षा यावेळी खूप कमी कपडे लागले. बाळांतपणही लवकर आटोपले. गायीला खूप अशक्तपणा आला होतो.  पिल्लाला मीच पुसले, लांबसडक होते. सेम टू सेम दुसरी प्राचूच होती. अंगावरील ठिपके व त्याचा रंग सुध्दा सारखाच होता. प्राचूने या वेळेच्या गर्भधारणेच्या वेळेस स्वतःवर प्रेम केले होते याची साक्ष पटली. जन्माला आलेले पिल्लू हे कालवड होती.  तिला दुधाच्या सडाची ओळख व्हावी पिल्लू कसबंस तिच्या सडाजवळ नेत होतो पण पिल्लू काही त्याला तोंड लावत नव्हंत. ते इतकं अशक्त होत की ते पायावर उभ राहयाला त्याने दोन तास घेतले. ते धडपडून माझ्याच जवळ यायचं. माझ्याच हाताची बोट तोंडात धरू लागलं. प्राचूला उभ राहण्याची हिमंत नव्हती. सरते शेवटी प्राचू उभी राहिली, तेही उभ राहिल, धडपडत दुधाचा सडा शोधून दूध पिऊ लागलं.

तिच नामकरंण आईने सोनी ठेवलं. सोनी रात्री जन्माला आल्यामुळे रात्रीच्या बाळंपणात व कुत्र्यापासून संरक्षण मिळावे म्हणून सुरू असलेला उजेडाचा बल्ब मात्र तिचे डोळे तिरपे करून गेला. ती टेहरी म्हणजे डोळ्याने चकणी झाली. तीला आवाज दिला की ती दुसरीकडेच पाहते याचा भास व्हायचा. पण कालांतराने तिची ही नजर सुधारली. ति जन्मताच अशक्त असल्यामुळे प्राचूचं सारं दूध तिला पाजलं. दोन महिण्यात टनाटन उड्या मारू लागली. तिची तब्बेत सुधारलीय. प्राचूला एकट वाटू नये म्हणून बंडू, सोनीच्या जन्मापर्यंत बरोबर होता.  आता प्राचू बंडू नि सोनी बरोबर राहणार होती. त्यामुळे प्राचू आनंदात होती. पण जागेच्या अभावी व तिघांना सांभाळणे अवघड म्हणून बंडूला शेतावर पाठवायचे ठरवले. बोलणी झाली. गोठ्यातून प्राचू व सोनीला सोडून मागील जागेवर चरण्यास सोडण्यात आले. बंडू गोठ्यातूनच गाडीमधे खालीमान घालून चुपचाप चालून  गेला. त्याला बहुतेक कळालं गंतव्याचे कारण कळाले असावे. त्याला नविन जागा नविन मालक देणं गरजेचं होते.

पण झालं असं की रोज आपल्या मागे येणांरा बंडू मागे आला नाही म्हणून प्राचू गडबडली. तिच्या दुधाचा पान्हा आटला. बंडू नाही याचं आम्हाला दुखः होतं पण तिच्यासाठी धक्का होता. प्राचूचं दुध आटलं.  दुध इतक आटलं की सोनीला पुरेस दुध मिळेल की नाही यांची चिंता भेडसावू लागली. पण सोनीच्या सानिध्यात दुख विसरली. दोघं आंनदाने राहू लागलीय. त्यांच्या एकत्र उड्या मारणे, सोनीच्या गायीच्या पोटात झोपणं. एकत्रच खाणं वाढू लागलं. आता सोनी मोठी होऊ लागली. प्राचूला नव्या स्वयंवराची ओढ लागू लागली. सोनीला काही दिल की तिच आधी स्वतःजवळ ओढून खावू लागली. आता सोनी वर्षभराची झालीय. अकरमाशी असल्यामुळे कोणतही वळण तिला लागल नाही. तिला आईच्या आधिच कुठेही पळायची घाई असायची. छोट्या जागेमुळे अपघात होण्याची शकयता होती. सोनीला दत्तक देण्यासाठी दुसरीकडे पाठवण्याची बोलणी झाली. या दरम्यान स्वंयवर शोधासाठी प्राचूची मोहीम असफल ठरली. ति बाहेर पडली खरी. पण घरी लवकरच परतली होती. तिची गर्भधारणा झाली असावी म्हणून आम्ही अंदाज घेतला. पण तो चूकीचा ठरला.

प्राचू व सोनी

सोनी मोठी झाली होती. तिला एका कुटुंबात पाठवले गेलं. चारा, औषध पाण्याची सोय होऊन जाते. पण जागेअभावी त्यांचे संगोपन करणे खरेच अवघड होते. अचानक गायब झालेली सोनीची वाट पाहत आजही प्राचू विट्यांच्या धक्यावर ( उंच ओट्यावरून) उभी राहून दूरवर पहात असते. की तिची सोनी परत येईन. कधी कधी एकटीच आसंव गाळतें. पण नाईलाज आहे. तिचे अश्रू पुसणे एवढेच हाती आहे.  आता ति एकटीच आहे. खरोखर एकटीच आहे. काळजी घेण्यासाठी, व्यस्त राहण्यासाठी तिच्या पोटात बाळपण नाही. महिना पंधरा दिवसात माजावर आली असतांना बाहेर बांधतो खरे पण वळूही फिरकत नाही. शहरातील गोपालान हे खरंच आव्हानात्म असते.  तिचे दोनही वंश सांभाळण्याची फार इच्छा होती. पण जागेअभावी ते साध्य होत नाही.  जागा मिळालीच तर कोणत्याही किमतीला बंडूला व सोनूला परत आणीन.

प्राचू  विट्यांच्या धक्यावर उभी राहून सोनीची वाट पहातेय नि मी गच्चीवरची बागे पर्यावरणीय कामाच्या माचीवरून गोवंश पालनासाठी नाशिकमधे कुणी जागा देतय का जागा अशा दैवताची वाट पाहतोय…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Exit mobile version