हिवाळ्यात बागेची विशेष तर्हेन काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे कीडिचे प्रमाण वाढते. यात मुख्यतः रसशोषक कीडिचे प्रमाण वाढते. काळा मावा, चिकटा, तेलाचा थर साचणे इत्यादींचे प्रमाण वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे बागेला दिले जाणारे पाणी. या काळात बागेला पाण्याचा ताण देणे फार गरजेचे असते. मुळात वरील प्रकारची कीड ही अधिकच्या पाणी देण्यामुळे होते. झाडांच्या मुळांशी पाण्याचे प्रमाण वाढले की पानांमधे नत्राचे प्रमाण वाढते. पानांमधील नत्र अधिक वाढल्यामुळे पाने ही आखडली जातात. अधिकच्या नत्रामुळे (रक्तवाहीनीत अडथळे येतात त्याप्रमाणे) पाने आखडली की त्यातून वनस्पतींना आवश्यक रस हा पोहचत नाही. हा रस पोहचावा म्हणून निसर्ग रसशोषक कीड पाठवत असतो. एका अर्थाने ही कीड झाडांना बरे करण्यासाठी येतात. पण त्यांचा प्रादुर्भाव जास्त वाढला की तेच झाडांचा जिवही घेतात.
यात दोन प्रकार आहेत. एकतर झाडांना त्यांच्याशी झगडू द्यावे. म्हणजे मानवी हस्तक्षेप करू नये. त्यातून झाडांची प्रतिकार शक्ती वाढते. नि दुसरा प्रकार म्हणजे मानवी हस्तक्षेप करून त्यास नियंत्रीत करणे. मानवी हस्तक्षेप करून मावा, मुरडा, चिकटा नियंत्रीत करण्याचे पर्याय खालील प्रमाणे..
पाणीः ऑक्टोबर हिट असल्यामुळे बागेला दोन वेळेस पाणी देणे गरजेचे होते. पण आता हिवाळा चालू झालाय. त्यामुळे पाणी हे शक्यतो एका वेळेस व तेही सकाळीच देणे. म्हणजे बागेला पाण्याचा ताण पडून मुळाशी हवा खेळती राहिल व कीड नियंत्रण करता येईल.
पाण्याचा उपवास घडवणेः हिवाळ्यात बागेला पाण्याची गरज कमी असली तरी देत असलेले पाणीही जास्त होण्याची शक्यता असतो. कारण वाढत्या थंडीमुळे पाण्याचा योग्य प्रमाणात वाफसा तयार न झाल्यामुळेही पाणी जास्त होते. अशा वेळेस थंडीचा अंदाज घेवून बागेला सलग २-३ दिवस पाण्याचा उपवास घडवू शकता. पण हे त्या त्या गच्चीवरील बागेत किती हवा खेळते याचा अदांज घेवून पाण्याचा ताण वाढवणे गरजेचे असते.
मुळांशी हवा खेळती ठेवा… अधिकचे पाणी होतेय म्हणून पाण्याची मात्रा एक वेळ देवूनही कीड कायम असेन तसेच पाण्याचा उपवास घडवूनही जर कीडिचे प्रमाण तसेच असेन तर बागेतील माती खोलवर उकरून घ्या.. वाळू द्या म्हणजे मातीतील अधिकचे पाण्याची वाफ हवेत विरून जाईन व मुळांना योग्य तो वाफसा मिळेल.
कीड नियंत्रण फवारणेः मावा नियंत्रणासाठी सलग तीन दिवस त्यावर राख फोकरणे अथवा सलग तीन दिवस गोमुत्र पाणी फवारणे. एकास दहा प्रमाणे घ्यावे. (गोमुत्र पाणी फवारूनही कीड नियत्रीत होत नसल्यास विशिष्ट झाडांवर गोमुत्रातील पाण्याचे प्रमाण ( एकास पाच) कमी करून फवारणे) अधिक माहितीसाठी वाचा (Garden Care Basket)
झाडांवर राख फवारल्याने राखेतील भस्म हे कीडिच्या नाकातोंडात जाते. त्यांची पचनक्रिया बिघडते. व त्यांची संख्या नियत्रीत होते.
चुना पाण्याची फवारणी.. वाढत्या थंडीमुळे टोमॅटो, मिरची या सारख्या झुडपाना मुरडा ( पाने चुरगळ्यासारखी होणे) रोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा विशिष्ट झाडांना १ रू. किमतीची पानटपरीवर मिळणारी चुना पुडी आणावी. त्याचे तीन लिटर पाणी तयार करावे. व त्याची सायंकाळी फवारणी करावी. दिवसा याची फवारणी करू नये. चुना पाण्याची फवारणी केली तर पानांचा मुरडा होणे नियंत्रीत होते. आहे ती पाने सरळ होत नाहीत. पण उत्पादन वाढते.
बागेत तुळस, मोहरी, गवतीचहा, झेडूं , मका यांची लागवड करा. म्हणजे उग्रवासाने कीड निय़ंत्रीत होते. शक्य असल्यास पानांच्या मागे वाढणारी रसशोषक कीडिंचे अंडी दात घासण्याच्या ब्रशने खरडून काढावीत.
बागेत हवा खेळती ठेवा… बागेत हवा खेळती ठेवणे हा सुध्दा एक नैसर्गिक उपाय आहे. त्यासाठी झपाट्याने पिवळी होणारी जूनी पाने ही कुंडीतून, वाफ्यातून वेगळी करावीत. अथवा त्यांचे काप करून त्याच जागेवर खत होण्यासाठी मातीत गाडावीत. बरेचदा वाळेलेली पाने. काड्या ही हवा अडवतात. पर्यायाने कीडिला पोषका वातावरण मिळते. पिवळी पाने काढून टाकण्याचे काम हे कदाचीत रोज करावे लागेल. पण त्यामुळे बर्यात प्रमाणात कीड नियंत्रणात येते.
संदीप चव्हाण. गच्चीवरची बाग, नाशिक.