fbpx

Gacchivarchi Baug : Grow Organic

Grow Organic Consulting & Green Bussiness Coaching (Gardening Course)

life Stories

life story: बागेची- पानभर गोष्ट…

0 (10)

#Waste, कचरा ही आजच्या आधुनिक जीवनशैलीची देण आहे. भलेही कचर्याला काही भंगारात मुल्य असेलही. पण कुजणार्या कचर्याला खत बनविण्याव्यतिरिक्त काय किंमत ? अशा कचर्यावर आधी स्वतः विविध प्रयोग करणे, त्यात नाविन्यता, विज्ञान ओळखणे त्यातून प्रबोधन घडवून सृजनशीलपणे लोकांना त्याचा वापर करावयास लावणे, त्यातून प्रोडक्टीव शोधणे व यात सक्रियपणे लोकांचा सहभाग घेवून खर्या अर्थाने लोकसहभाग घेणे. त्यात पूर्णवेळ रोजगार शोधणे व त्यातूनही एक ग्रीन इंटरप्रिनअर्सचा प्रवास घडवत एक पर्यावरणीय चळवळीच्या व्यापक जगात स्वतःची ओळख निर्माण करणे हे खरोखरच अदभूद्तच म्हणावे असा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

नाशिकच्या तंत्र, य़ंत्र व मंत्र भूमीत, नाशिकला विविधतेने ओळख असलेल्या ओळखीत आणखी एक ओळख तयार करणार्या गच्चीवरची बाग-नाशिक, संदीप चव्हाण यांची ही खारीच्या वाटेची कतृत्वकथा… पर्यावरणीय योगदानातील गच्चीवरची बाग प्रबोधन, व्यवसाय व व्यवसायापुढील आव्हानं व आवाहानांचा हा प्रवास स्वबोधच्या अदभूत वाचकांसाठी…

गुगुलवर गच्चीवरची बाग हा शब्द टाकला की विविध समाज माध्यमांतील त्याची उपस्थिती, माहिती समोर येते. विविध भाज्यांचे फोटो, पर्यावरणीय माहितीची अगदी थोड्या शब्दात केलेली मांडणी लोकांना आकर्षित करत आहे. ढासळते पर्यावरण, त्याची झळ ही ‘’ग्लोबली” असली तरी त्याची सकारात्मक सुरवात ही “लोकली” व “पर्सनली” करता येते. त्याच्याच हा संपन्न अनुभव…

संदीप चव्हाण, वय वर्ष ३८, नाशिक मधे असतात. २०१३ या वर्षी एका माध्यमस्थित संस्थेतील प्रकल्प प्रमुख पदावरील नोकरी अपमानास्पद वागणूकीमुळे तडकाफडकी सोडली. नोकरीच्या ठिकाणी आपल्या हिंमतीच्या बळावर निर्माण केलेले स्थान, प्रकल्प संकल्पना, मांडणी, आखणी व अंमलबजावणीचे अनुभव ते साकारतांना त्यामागील कष्ट, कल्पकता हीच काय ती पुंजी बरोबर होती.

नोकरी सोडल्यानंतर संसाराचा गाडा, घराचे कर्ज, मुलांचे शिक्षण, घरातल्या खाणार्या तोंडाची जबाबदारी पार पडणे हे कर्तव्य… पैसे तर मिळवले पाहिजेतच. त्याशिवाय पर्याय नाही. हा गहण प्रश्न समोर होता. ‘’काय काय करता येईल’’ याची यादी बनवतांना ‘’काय करायाचं नाही” या विषयी ठाम होते. या यादीत पुन्हा कुणाची नोकरी करायाची नाही. याचा ठाम विचार केलेला. काय करायाच नाही याची पहिली यादी केली म्हणजे मार्ग स्पष्ट होतात. ही कोणत्याही मुल्याधारित कामाची, जगण्याची चौकटच कर्तृत्वाला चार चांद लावतात. याची केवळ धारणा, दृष्टीकोन हे आज प्रत्यक्षात अनुभवायास मिळते.

त्यांच्या जुन्या पत्राच्या घरी लहानपणी (आज तेथे वर्कशॉप आहे. जेथे गाय, गाडी, पालापाचोळा स्टोअर केला जातो.) कचरा जाळायचा नाही. कारण त्यापासून धूर होतो, प्रदुषण होते ही विचारधारणा. मग कचर्यावर विविध प्रयोग करायचे. त्यावर झाडें उगवायचे. लहानपणी त्यांच्या शेजारी राहणार्या निवृत्त सेनाधिकारांने बागेत झाडं लावण्याचे ८०च्या दशकता १० रू बक्षीस (आजचे १००रू) दिले होते. फक्त झाडं लावण्याचे १० रू. का दिले ? या चिंतनाने पर्यावरणाची आवड तयार केली. त्याच रूजलेल्या बियाणांने पर्यावरणाची आवड तयार केली व त्याच बीजाचे आज गच्चीवरची बाग म्हणून रोपटं आकार घेतय.

संदीप चव्हाण यांना शेतीची, निसर्गाची खूप आवड. नोकरी सुरू असतांनाच शेतकर्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. रासायनिक शेती सोडून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे शेतकर्यानी वळावे म्हणून प्रबोधन, प्रशिक्षणाची जबाबदारी होती. त्या निमीत्त आदीवासी बांधवाच्या शेती करण्याच्या , वाड्या फुलवण्याच्या पध्दती, विनोबा भावे यांच्या वा आश्रमातील शेती पध्दत, विदर्भातील विषमुक्त शेतीचे प्रयोग, थायलंड, झिंम्बॉब्वे या देशात जावून अभ्यास केला. काही वर्षानी असे लक्षात आले की शेतकर्यांना रासायनिक शेतीशिवाय पर्याय नाही. कारण तेच त्यांच्या तुंटपुंजे का होईना पण कुटुंब चालवण्याचे साधन होते. शेतकर्यांना हे सारं काही सांगण्यापेक्षा आपणच यात काहीतरी ठोस केले पाहिजे. याची खूणगाठ मनात बांधली गेली. जागतिकीकरणमुळे विदेशी कंपन्यांनी पुरस्कृत केलेल्या रसायनांचा शेतीतील वापर ही शेतकर्याला सधन करण्यापेक्षा कंगाल करणारा आहे. याची जाणीव झाली. एवढच नाही तर जल, जंगल, जंमीन, हवा प्रदुषीत करणारी ही आधुनिक व्यवस्था सर्वंच प्राणीमात्राचा, मानवाचा एक दिवस घास घेणार याची खात्री पटलेली. मग रसायनं नव्हती तेव्हा आपले पुर्वज शेती कशी करायचे ? या एका प्रश्नांने संदीप चव्हाण यांना ग्रासले. अशा कोणत्या पध्दती होत्या की त्या लोकांच भरण पोषण करायचे. चला… स्वतःच शेती करून पाहिली पाहिजे. त्याशिवाय सत्य काय ते कळणार नाही. राहत्या ठिकाणी शेतीचा शोध घेतला. कुणी निमबटाईने शेती द्यायला तयार होईना.. “नोकरी करणारा माणूस शेती काय करणार” ?. एक जण तयार झाला. यंत्र शंक्ती वापरण्यापेक्षा श्रम शक्ती वापरली पाहिजे म्हणून कुंदळ फावडं घेवून शेत कामास सुरवात केली. दोन दिवसांनी जमीन मालकांला प्रश्न पडला अशी काय शेती होणार ? संदीपची सुट्टी करण्यात आली. शेती तर करायची पण शेती नाही म्हणून हातातवर हात ठेवून गप्प बसेल तो संदीप कसला.. मुबंई पुण्याला गच्चीवर शेती करतात म्हणून ऐकले होते. तेव्हा आजच्या सारखी समाज माध्यमं (व्हाट्सअप, फेसबुक चालणारी मोबाईल नव्हती.) हे सारे अकलेचे तारे तोडण्यासारखेच होते. पण मागार नाहीच.

नुकतच लग्न झालेल. लग्नाआधी आणाभाका झाल्या होत्या की जंगलातच राहयला जायचं. पण बायको मुबंईची.. जंगलात नको… मुलांच शिक्षण करू, त्याला एक शहरात एक तरी घर करू… मग राहू जंगलात… पण एवढा वेळ हाताशी नव्हताच.. निसर्गाची ओढ व आवड स्वस्थ बसू देत नव्हती. संदीपने जंगलच घरी आणायचं ठरवलं. भाड्याचं घर (आत्ताच खाली कर असूनही) पण त्याच्या छतावरच कचर्यावर प्रयोग करणं सुरू झालं.

याआधी सफाई कामगारांच जिवन जवळून अनुभवलेलं, डंपीग ग्रांऊंडच्या जखमा अंगावर घेवून वाढत्या शहरीकरणात आपलं जीवन हे खरं जगणं होईल का. मग शहरातल्या कचर्यावर काम करायाचं की शेती करायची असा पॅरालल विचार चालेला होताच. झालं तर प्रयोग करता करता असं लक्षात आलं की शहरातला कचरा व शेती याची सांगड घालता येईल. मग गारबेज टू गार्डन अशा तत्वावर घरीच टेरेसवर बाग फुलवायचं सुरू झालं. येथेही पहिला विचार काय करायचं नाही ही चौकट आलीच. “बाहेरून काहीही विकत आणावयाचे नाही”. असे ठरलेलं. जूनीच दारू नव्या पॅकेजेस् मध्ये विकून शेतकर्यानां कंगाल करणार्या बाजारातील रासायनिक औषधांचा क्षेत्र अभ्यासाचा अनुभव होताच. म्हणून ही चौकट तत्व ठरलं. आपला जैविक कचरा फेकायचा नाही. त्यावरच प्रयोग करायचे नि भाज्या पिकावयच्या. करतो ते खरं आहे आहे का याची सत्यता आधी स्वतः पटवून घ्यायची. मगच लोकासांगे ब्रम्हज्ञान या भानगडीत पडायचं.

अचानक २०१३ या वर्षी नोकरीला लाथ मारली. पूर्णवेळ (नाव स्वतःच पण आजही मालकी बॅंकेची) घरावरच्या गच्चीवर वेळ देवू लागले. कचरा व्यवस्थापनाचा अनुभव, शेतकर्यांच्या सोबत राहून ज्ञानाची मिळालेली शिदोरी घेवून सहा महिन्यात विविध प्रयोग केले, यश मिळत गेले. उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत (गाडग्या, मडक्यात, पिशव्यात) व उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतात. (पालापाचोळ्यात) बाग फूलु लागली. घरीच रसायनमुक्त भाज्या पिकू लागल्या. “नोकरी सोडून हे काय चालवलं” म्हणून शेजारी हसले. “आवडतंय म्हणून कर”! म्हणणार्या बायकोला बाजारातील व घरीच उगवलेल्या भाज्यातील चवीतला फरक लक्षात आला. “पण हे कचरा वैगरे नको… तू कामाला लागला पण आम्हालाही कामाला लावलं” अशी तक्रार बोयकोची होतीच. गच्चीवर भाज्या फूलू लागल्या. यातूनच अनुभवावर आधारित गच्चीवरच बाग पुस्तकाचा जन्म झाला. २००१ साली ओपण करण्यात आलेलं फेसबूकच अंकाऊंट २०१३ पासून नियमीत वापरात येऊ लागलं. पुस्तकाची मागणी दूर दूरदूर वरून येवू लागली. पण नाशिकमधून हवा तसा प्रतिसाद नव्हता. नाशिकचा सहभाग नव्हता. नाशिक हीच आपली कायर्भूमी ठरवायची असेल तर येथे कामाला प्रतिसाद वाढला पाहिजे. या दिशेने विचार सूरू झाले. नाशिकच्या स्थानिक दिव्यमराठी वृत्तपत्रासोबत नाशिकरांसाठी गच्चीवरची बाग स्पर्धा घेण्याचे ठरवले. निशुल्क कार्यशाळा घेण्यात आल्या. दिव्यमराठीने वर्षभर नाशिकच्या कोपर्याकोपर्यात कार्यशाळा घेतल्या. निशुल्क ज्ञान सोबत बांबूची ट्रॉफी व वरून रोख पारितोषीक नाशिककर हरखले.

दरम्यान नाशिकमधील सर्वच वृत्तपत्रांनी, वृत्त वाहिन्यांनी हळूहळू बातम्या देवून विषय उचलून धरला. आता संदीप चव्हाण यांची गच्चीवरची बाग बर्यापैकी घराघरात पोहचली. त्यात लोकसत्ता सारख्या वृत्तपत्राने चंतुरंग पुरवणीत गच्चीवरची बाग सदर लिखाणाची संधी दिली. विषय राज्यपातळीवर पोहचला. मध्यप्रदेशातील एक संस्थेने पाच मिनिटांचा माहितीपट बनवला. त्तो देशभर पोहचला. आजही यू ट्यूबवर रोज नवनवीन २०० नोंदणीकृत दर्शक पाहताहेत.

7 (12)

“पुस्तक वाचले, कार्यशाळा अंटेड केल्या हो… पण एकदा आमच्याकडे येवून आमची गच्ची, पाहून मार्गदर्शन करा”. “मला आवड आहे पण घरातल्यानां नाही त्यांना येवून सांगा.” झालं.. सुरवातीला निशुल्क भेटी देवून मार्गदर्शन करता करता पे कंन्सलटंसी सुरू झाल्या. “बर आता कंल्सटंसी झाल्यात तुम्हीच भाजीपाल्याचा सेटअप लावून द्या. मेन्टनंस घ्या… आम्ही काळजी घेवू”… पण दुचाकीवर साहित्य गोळा करायचे म्हणजे सोपे नव्हते. इच्छुकांना नारळाच्या शेंड्या पालापाचोळा गोळा करून ठेवा… मी सेटअप लावून देतो असे म्हटले की… मागणीच रद्द व्हायची. तसेच इतरांची गाडी घेवून हे सारं वेळेत पोहचतं करण शक्य नव्हत व खर्चीकही होतं. शिवाय वेळ खाणारी काम… त्यातच माध्यमांनी गारबेज टू गार्डन –गच्चीवरची बाग विषय लोकांपर्यंत पोहचवणं बंद केलं. कारण विषय मांडून झाला होता. अर्थात प्रत्येक प्रसार व प्रचार माध्यमांनी खूप प्रसिध्दी दिली होती. किती अपेक्षा करणार. स्वतःची जाहिरात करावी तर एवढे पैसे नाहित. स्वतःच चारचाकी वाहन घेण्याचं ठरवलं. त्यावर विचारपूर्वक जाहिरात करण्यात आली. त्याही आधी जाहिरात म्हणून पाठीवरच्या बॅगेवरच “गच्चीवरची बाग- टेरेस गार्डन विषयी सर्व काही” अशी पाटी लावलेली. त्यामुळे स्गिनलवर उभं राहिल की लोक फोटो काढायचे, विचारपूस करायचे. सारीच माहिती फोनवर देणे शक्य होत नव्हंत. संकेतस्थळ तयार करण्याची गरज होती. पण पैसे आणायचे कुठून, मुळात त्यावर खर्च कशाला करायचा.. या विचारातून घरीच स्वतः अभ्यास करून संकेतस्थळ तयार करण्याचे ठरवले. माहितीसाठी मित्रांना विचारून विचारून डोमेन नेम, होस्टींग प्लेस विकत घेवून टेम्पलेट्सची मदत घेत घरीच संकेतस्थळ तयार झाले. “संकेतस्थळ छान बनवा हो” अशा प्रतिक्रीया येतात पैसे तेव्हांही नव्हतेच. (आजही नाहीत) पण वाचकांना एकाच जागेवर सर्वी माहिती मिळू लागली. संकेतस्थळही नैसर्गिक वाटावी अशी तयार झाली..

बाहेरून जाहिरात व आतून सामान वाहण्यासाठी चार चाकी गाडीची गरज होती .बायकोचं सोनं तारण ठेवून थोड्या डाऊन पेंमेंटवर गाडी विकत घेतली. “चार चाकी गाडी आणली खरी.. पण रात्रभर झोप नाही. कारण गाडी चालवायची कुणी. गाडीच चालवता येत नाही. क्लास झाला होता पण सरावाअभावी सारंच विसरायला झालं होतं. हिंमत केली. यू ट्यूबवर फिल्मस पाहिल्या. मित्रांने गाडी शिकवली. प्रसंगी पैस देवून गाडी रस्तायवर धावू लागली. माहिती एकटवली. वेळ मिळेल तेव्हाच गाडी चालवण्याचा मनातच सराव केला. एक दिवस भर पावसात गाडी बाहेर काढली. अपेक्षे प्रमाणे धोधो पावसात रस्ता रिकामाच होता. २५ किलोमिटर गाडी चालवून घरी सुखरूप परत आणली. विश्वास वाढला थोडक्यात गाडी शिकलो” !

20180613_110943

तर गाडीवर सत्यमेव जयते ऐवजी स्वच्छमेव जयते असे लिहून गच्चीवरची बागेची जाहिरात नव्हे लोकांमधे जागृती केलीय. ही गाडी खरं तर खूप नाविन्य आहे. “झाडू मारंण का होईना पण ते इतरांपेक्षा त्यात नाविण्य असलं पाहिजे” असं तत्व असलेला संदीपची कतल्पकता गाडीवरील जाहिरातीत लिहलेल्या वाक्यावरून दिसून येते. खरं तर जगात अशी एकमेव गाडी आहे असं म्हटलं तर अतिशोयक्ती होणार नाही.

भाजीपल्याची बाग फुलवता फुलवता रसायनमुक्त पध्दतीनेही बागबगीचा तयार करणे त्याची रखरखाव करण्याचंही काम केलं जातं. या दरम्यान घर मालकांना नको असलेला नैसर्गिक कचरा कुठेतरी फेकून विल्हेवाट लावण्यारपेक्षा त्याचे व्यवस्थापन करणे सोपे आहे. याचा विचार करत तो घरीच आणला जावू लागला. कचर्याने भरलेल्या गोण्यांचा ढिग होऊ लागला. त्याचे तुकडे, चुरा करण्यासाठी श्रेडर मशीनची गरज होती. पण पैसे आणणार कुठून.. टाटा कॅपीटलने सलाम लोन अंतर्गत एक लाख रूपये नियमीत परफेड देण्याच्या बोलीवर देण्यात आले. आज हे श्रेडर मशील खरोखरच उपयोगी ठरत आहे.

रसायनांच्या एवजी गायीचे शेण, गोमुत्र याचा वापर केला जातो. “ज्यांनी आपले पूर्वाआयुष्य म्हशींच्या शेणा मूतात काढले अशा शेजार्यांना एका गायीचा दूरवरून वास येवू लागले. बरे गायीचे शेण काही उघड्यावर टाकत नव्हते. त्याचे सुयोग्य, वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन होत होते. तरी वास येत होता व आजही फक्त त्यांनाच दुरवरूनही गायीच्या शेणामुताचा वास येतो. असो. विषय गहन आहे”.

शहरात गाय पाळणे तसे जिकरीचे आहे.. तिचा चारा पाणी, महिण्याला डॉक्टर, औषध असा खर्च आहेच. पण तिच्यापासून मिळणार्या दूधापेक्षा गायीचे शेण व गोमूत्र हे पर्यावरण सुधारण्यास, हवा शुध्द करण्यात, बागबगीच्या फुलवण्यास मदत होत आहे. गायीच्या शेणाचे व्यवस्थापन हे सावलीत पोत्यात केले जाते. मिळणारा जैविक कचर्यासोबत त्याचे कंपोस्टिगं केले जाते. त्यामुळे त्यापासून कोणताही दुर्गंध येत नाही.

अशी ही गच्चीवरच बाग व्यवसायाच्या अंगाने व नैसर्गिक गतीने विकसीत होत आहे. दुरध्वनीवर आजही निशुल्क मार्गदर्शन केले जाते. ते व्यवसायाचे मुल्य म्हणून कायमस्वरूपी जपण्याचे ठरवले आहे. दरवर्षी गणपती विसर्जन व नंतरच्या दिवशी नारळाच्या शेंड्या व उन्हाळ्यात पालापाचोळ्याच्या गोण्या भरून साठवल्या जातात. जवळपास ८० टक्के जैविक कचरा व २० टक्के मातीचा वापर करत फुलवण्यात येणारी भाजीपाल्याची बाग पर्यावरणाला खूप मोठा हातभार लावत आहे. घरातल्या मंडळीचा हातभार तर लागतोच पण सोबत दोन व्यक्तिंना सन्मानाने रोजगार दिला गेलाय.

भाजीपाला फुलवायचा म्हणजे वेळ द्यावा लागतो. गार्डेनिंग व पॅरेन्टींग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. वर्षभरात माती तयार झाल्यानंतरच्या बागेत वेळेच्या गुतवंणूकीत भाज्याचे प्रमाण वाढते हे लक्षात आले. घरच्या बागेला वेळ देता येत नाही म्हणून गेल्या दोन वर्षापासून टेरेसवर फक्त हळदीचे पिक घेतातहेत. मागील वर्षी ३६ (नर्सरी बॅगेत) चौरस फूटात ५० किलो ओली हळद उत्पादीत करण्यात आली. या वर्षी ते २०० किलो हळद पिकण्याचा अंदाज आहे.

सब जिंचो का फायदेमंद ईस्तेमाल (सफाई) यास यथार्थ असलेले काम आज गच्चीवरची बागेतून साकार होतांना दिसत आहे. चला तर पाहूया… गच्चीवरची बाग म्हणजे काय…

गच्चीवरची बाग म्हणजे काय…

घर असो, दार असो, अंगण असो, टेरेस असो, बाल्कनी असो अगदी विंडो ग्रील असो अशा कोणत्याही उपलब्ध जागेत आपल्याला बाग फुलवता येते. अर्थात इच्छा तेथे मार्ग असातातच. आमच्याकडे जागाच नाही हो…असे म्हणणे म्हणजे पळवाट शोधणे अशी मांडणी संदीप नेहमी करतात.

एकदा जागेचा शोध पूर्ण झाला की उपलब्ध वस्तूत बाग फुलवता येते. नव्याने कुंड्या आणायचा म्हणजे खर्च असतोच. पण कशाला खर्च करायचा. अगदी दुधाची पिशवी, शितपेयाची बाटली. लेडीज पर्स, पुरूषांचे जीर्ण बूट यापासून अनेक गोष्टी आपण भंगारात, कचर्यात फेकून देतो. शेवटी काय ज्यात माती, पालापाचोळा धरून ठेवता येईल अशी कोणत्याही आकाराची कोणतीही वस्तू, त्याचा वापर कल्पकतेने आपल्याला बाग फुलवण्यासाठी करता येतो. अर्थात यात खूप मोठे पर्यावरण मुल्य, संरक्षण व जबाबदारी सामावलेली आहे. रिसायकलला जाणारा कचरा प्रंचड प्रमाणात प्रदूषण करतात. त्यापासून आपल्यला काही काळ का होईन ते रोखता येते. थोडक्यात प्लास्टिक रिसायकलचा पाळणा लांबवला पाहिजे.

जागेचा शोध व वस्तूंची जमवाजमव झाली की त्यात भरण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे. आमच्याकडे मातीच नाही हो… अशी तक्रार करत आपण निसर्गापासून पळ काढतो आहोत असेच म्हटले पाहिजे. घऱातला ग्रीन किचन वेस्ट (प्री कुक्कड वेस्ट) या अगदी बारिक करून वाळवून घेतला. त्याला कुंडीत भरला, पाणी शिपंडले तरी त्याची हळूहळू माती तयार होऊ लागते. बाळ जन्माला आले की झाले मोठे असे नसते ना…तसेच बागेचे असते. ती ही हळू हळू वाढत जाते.

तर नैसर्गिक स्त्रोतांत नारळाच्या शेंड्या, सुकलेले किचनवेस्ट, पालापाचोळा व २ इंच (२० टक्के) माती यावरच आपल्याला बाग फुलवता येते. हजारो वर्षापासून तयार झालेल्या मातीवर मागील २५०० वर्ष माणूस वस्ती करून आपली उपजीविका भागवतोय. मग फक्त ३६५ दिवसात माती तयार करायाला का वेळ देवू नये. बरे यात वर्षभरही आपल्याला भाज्या घेता येणारच आहे. एकदा माती सुंगधीत झाली की त्यात लावलेल्या बिज, रोपं आपल्याला चवदार उत्पादन देतात.

किचन वेस्ट व्यवस्थापन…घऱातला कचरा वेगळा करून द्या असा वटहूकूम आला आहे. किंबहूना त्याचा कायदाच तयार झाला आहे. काही दिवसात ओला कचरा स्विकारला जाणार नाही, नागरिकांनी त्याचे घरीच व्यवस्थापन करावे असा कायदा येईल. अर्थात घोडा मैदान दूर नाही… तर घरातल्या कचर्याचे आपल्याला विविधतेने व्यवस्थानपन करता येते. यातील सोपा मार्ग शोधला जातो तो म्हणजे बाजारातील कंपोस्टर विकत घेणे. पण हे तितकेसे मातीसाठी फायद्याचे ठरत नाहीत. कचर्याची माती (व्हॅल्यूम निश्चितच कमी होतो) होते पण ते झाडांच्या व विशेषतः भाजीपाल्याच्या बागेला उपयोगी पडत नाही. असो विषय गहन आहे. ..

तर घरातल्या कचर्याचं आपल्याला विविध तर्हेने व्यवस्थापन करता येते. ग्रीन वेस्ट वाळवून त्याचा कुंड्या भरण्यासाठी वापर करता येतो. पंधरा दिवसातून एकदा ग्रीन वेस्ट मिक्सर मध्ये दळून त्याचे पाणी झाडांना टाकता येते. ग्रीन वेस्ट व खरकटे अन्न, पाणी आंबवून त्यात पाणी मिसळून झाडांना दिल्यास बाग अधिक सुंदर, ताजीतवाणी तर होतेच पण उत्पादनशील होते. ओला कचरा ही घास घास भर कुंड्यामधे भरला तरी त्याचा उपयोग व व्यवस्थापन होते. घरतील प्लास्टिक बादल्या, टफ, जूने माठातही आपल्याल खत तयार करता येते. अर्थात त्यातील विज्ञान प्रथम समजून घेतले पाहिजे. बरेचदा बाजारातील कंपोस्टर मध्ये विज्ञान समजून सांगण्याचा, तंत्राचा व नतरच्या उपयोगीतेच्या अभाव दिसतो.

रासायनिक शेतीत शत्रू किटक मारून टाकले जातात. त्यासोबत मित्र किटकही मरतात. पण घरच्या बागेत होणारी कीड ही पाहूणे मंडळी असतात. बागेतील झाडांना होणार्या संभावी आजाराची विचारपूस करायवयास येतात. त्यांचे येणे हे सूचक मानून त्यावर उपाय योजना केली (योग्य पाहूणचार) केला ते निघून जातात. कीड मारायची नाही. पण यासाठी आपले निरिक्षण हे ताकदीचे असले पाहिजे. कीड वेचून फेकणे, चिमण्यानां दाणे ठेवण्यापेक्षा फक्त पाण्याची व्यवस्था केली तर हे काम नैसर्गिकरित्याही आपसूकच होते. आपल्या वेळेच्या गुंतवणूकीच्या प्रमाणात भाज्यांचे प्रमाण वाढत जाते. असा आनंदाची प्रवासात गच्चीवरची बाग तुमच्या सोबत सैदव असणार आहेतच. त्यासाठी छोट्या छोट्या प्रश्नासांठी, शंकेसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता.

आव्हान व आवाहन…गच्चीवरची बाग ही आज गुगुल वर प्रसिध्द आहे. पण यामागे अनंत कष्ट व वेळेचा सदउपोयग करण्यात आला आहे. किंबहूना या सर्व प्रयोगासाठी प्रंचड प्रमाणात वेळेची व पैशाची काटेकोर गुंतवणूक झाली. आहे. अर्थात काही लोक विचारातात मग हे सारं कशाला करायचं. याच काही ठोस उत्तर नाही. काही गोष्टी या होण्यामागे, करण्यामागे निश्चतच निसर्गाचाच हेतू असतो. आपण निमित्तमात्र होतो. कचर्यापासून खत तयार करा व ते झाडांना, बागेला वापरा तर कुणीही तयार होत नाही. पण त्यातून विषमुक्त भाजीपाला उगवता येतो हे सांगितले की ते पटते व सध्या बाजारातील अन्न निर्मीतीचा डोलारा व्यवस्था निट डोळसपणे तपासून पाहिली तर त्याला चव नाही. पण ते सेवनाने लोक आजाराने, कर्करोगाने पटापट मरत आहेत. तर या सार्या कामामागे संदीप व त्याचे कुंटुबिय हे निमित्तमात्र आहेत. शेती व निसर्गाची आवड ही रोजगारांची संधीत रूपांतरीत झाली खरी. पण हे सारे उभे करतांना कंपनीसाठी जागा (कंपनी, संस्था नोंदणीकृत नाही) गाय पालन, गाडी व दैनंदिन व्यवहाराची सांगड घातलतांना बरेच काही डोक्यावर कर्ज झाले. आहे. जीवन विम्याच्या पॉलिसी, घरातील दागिने गहान आहेत. हात उसने घेवून जवळपास १० लाखाचे कर्ज आहे. बर यात कुठेही उधळपट्टी नाही. स्वतःवर मौजमजा नाही. “प्रत्येक चित्रपटात एका जीवनाची कहाणी असते. तो कसाही असला तरी पाहिलाच पाहिजे” हे त्याचे मत. पण आवड असूनही (कुटुंबाने एकत्रित जावून) गेल्या पाच वर्षापासून सिनेमागृहात चित्रपट पाहिला नाही. उगाच खर्च नको. घरी टी.व्ही. केबल नाही. हौस नाही. हे त्याचे तत्व… बाबा आमटे, प्रकाश आमटे, तसेच आज देशाच्या सिमेवर लढत असलेल्या सैनिक करत असलेल्या त्यागापुढे आपला त्याग काहीच नाही. हे सारे आपले आदर्श असतील तर त्यांच्या चरणाची धुळ होण्याईतकी तरी आपली लायकी असली पाहिजे. त्यामुळे आपण मोजत असेलेली किंमत ही काहीच नाही.. येणार्या पिढ्यांना आपल्या मुलांबाळांना सारं काही असेल पण शुध्द हवा, पाणी, अन्न नसेल तर ते सारं शुन्य आहे अशी भविष्यकालीन दूरदृष्टी ठेवून काम करत आहे. त्यामुळे हे कशासाठी याला काहीच उत्तर नाही.. ही त्याची विचारधारणा..

लोकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून कमी खर्चाचा स्मार्ट फोन वापरतो. तो बघावासा वाटत नाही तो पर्यंत वापरला जातो. तेथेही गरज भागणे गरजेचे हे त्याचे तत्व. “धर्मदाय आयुक्ताकडे संस्था म्हणून नोंदणी झाली तर पैसे उभे राहितीलही पण प्रत्यक्ष पर्यावरण संवर्धन साधण्यापेक्षा ती कागदावरच राहिल ही त्याची भूमिका आजूबाजूच्या संस्थात्मक विश् तपासून पाहिले तर सत्याची जाणीव करून देते. लोकांना आपल्या कामावर विश्वास असेल तर ते प्रश्न न विचारताही मदत उभी करतील व सार्या प्रश्नाची उत्तरे देवूनही नसेल द्यावयाचे तर ते देतच नाही असा त्याला विश्वास आहे. चांगली कामे ही संस्था नोंदणीच्या पलिकडे जावून उभी करता येतात व ती येणार्या काळाची गरज आहे”. असे त्याचे ठाम मत आहे.

येत्या काळात शाळांशाळांमधे गच्चीवरची बाग प्रकल्प उभा राहावा म्हणून चांगल्या क्षमतेचा डेक्सटॉप, प्रोजेक्टर, स्क्रिनींग व्हॅन (बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शीत करून लोकांत जाणीव जागृती करण्यासाठी) सांऊड सिस्टीम्स, घरी येणार्या लोकांना चार खुर्चा टाकून बसता येईल व कार्यशाळा घेण्यासाठी राहत्या रो हाऊस वरच हॉल बांधणे गरजेचे आहे. गावरान बियाणांची सीड बॅंक तयार करायची आहे. कंपोस्टिंग प्रकल्पाची प्रदर्शनी, पोस्टर प्रदर्शनी तयार करावयाचे नियोजन आहे.

मागील वर्षापासून या सार्या कामाचे वैयक्तिक पातळीवर लेखा जोगा ठेवतांना जवळपास महिन्याला विस ते पंचवीस हजाराची तूट येते आहे. अर्थात टॉपअप लोन करून खर्च भागवला जातोय. मजूरांचे पैसे वाचावेत म्हणून बाग कामास मदतनीस असले तरी स्वतःही कष्टाचे काम करू लागतात. या सार्यांचा विचार करता सामाजिक दातृत्वाची खूप गरज निकड निर्माण झाली आहे.

DOC-20181222-WA0027.jpg

संदीप चव्हाण यांनाही निश्चितच राजकीय मत आहेत. पण ते जाहीर प्रर्दशीत करण्याचे फेसबूक हे साधन नाही. लोक दुरावतात. फेसबूकवर गेल्या सहा वर्षापासून ते सातत्याने लोकांना फक्त आणि फक्त गच्चीवरची बाग विषयी प्रेरीत करत आहेत. छोटे छोटे वाक्यांचे ५०० कोट्स टाकून लोकांना विचार व कृतीप्रवृत्त करणे हे खरं काम आहे. हे सारे कोट्स काम करता करता सुचतात. व अपडेट्स केले जातात. चांगल्या कामासाठी समाजमाध्यमांचा वापर जाणीव पूर्वक केला जातो. पर्यावरण सांभाळण्याची किंमत काय असते. याचा प्रत्यय त्यांच्या कामातून येतो. घरी येणार्या इच्छुकांना मोफत मार्गदर्शन केले जाते. चार पुस्तकाचे ड्राफ्टिंग हातात आहे पण प्रकाशनाला पैसे नाहीत. दैंनदिनं खर्च भागवतांना तारेवरची कसरत होते आहे. पण त्यामागे मोठा आशावाद आहे. अर्थात “काही लोक मदत करत आहेत. ति आज थोडी असली तरी खूप मोलाची आहे. पैशाची गरज आहेच पण घेणारा व देवू शकणारा यातही ओळखीचा दुवा होण्यार्या व्यक्तीचीही गरज आहे. सारेच कामे पैशाने होत नाहीत. ओळख लागते. हे त्याचं वाक्य जगण्यातील संघर्षाच सार सांगून जातं. निसर्गाला आपण जे देवू ते परत येणारच आहे. या तत्वावर त्यांचा गाढ विश्वास आहे. मातीचे कर्ज फेडण्यासाठी दावावर लावलेलं घर दार हे तर काहीच नाही” अशी त्यांची धारणा आहे. (अशी न संपणारी…पानभर गोष्ट… यथे थांबवते..

शब्द संकलनः वैशाली राऊत, संगमनेर,

साभार:. स्वबोध दिवाळी अंक,2018

आम्ही स्विकारलेली आव्हानं पेलण्यासाठी आपल्या एैच्छिक मदतीचे सर्वोतोपरी स्वागत आहे.

www.gacchivarchibaug.in संपर्कः संदीप चव्हाण. 9850569644

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Dangerous Food In INDIA Importance Of Organic Potato Importance Of Onion In Daily Life Importance of Garlic In Dialy Life Organic Farming & Gardening Coach in India
Dangerous Food In INDIA Importance Of Organic Potato Importance Of Onion In Daily Life Importance of Garlic In Dialy Life Organic Farming & Gardening Coach in India
Dangerous Food In INDIA Importance Of Organic Potato Importance Of Onion In Daily Life