साधारण तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट असावी. गच्चीवरची बाग या समाजोपयोगी उद्योग नेटाने पुढे नेणायचा विचार पक्का केला होता. त्यावेळेस सारं बिर्हाड हे टू व्हीलरवर असायच. बिर्हांड म्हणजे वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेले लेख, बातम्या याचा अल्बम तयार केला होता. (आज अल्बम सोबत लॅपटॅप ही असतो) इच्छुकांनी पे कंन्सलटंसीसाठी बोलावलं की पाठीवर बॅग घेवून टू व्हीलवरवर जायचं. (आजच्या सारखा मल्टीपल युजेसाठी वापरला जाणारा छोटा हत्ती नव्हता, मल्टीपल युजेस म्हणजे बहुपयोगी गाडी, ही गाडी कधी अवेरनेस व्हॅन तर कधी स्टॅलवर साहित्य विक्री तर कधी बागेसाठी नवीन सेटअप तयार करण्यासाठी साहित्य वाहून नेण्यासाठी तर कधी कुटुंबासाठी फोर व्हीलर म्हणून वापर केला जातो)
तर छोटा हत्तीमुळे काम सोप्प झालयं पण खर्च वाढलाय … असो.. तर मुद्दा टू व्हीलरवरच हा सारा उद्योग सुरू झाला तेव्हांची गोष्ट, दिव्य मराठी या वर्तमान पत्राने सुरवातीला गच्चीवरची बाग संकल्पना नाशिक मधे रूजवण्यासाठी खूप मदत केली होती. नंतर त्यांच्या policys बदलल्या नि एका क्षणात पाच वर्ष एकमेंकासाठी पर्यावरणावर नाशिककरांसाठी काम करण्याचे स्वप्न भंगले. अर्थात दिव्य मराठीमुळेच गच्चीवरची बाग या कामाचा नाशिक मध्ये पाया रचला गेला. प्रिसिध्दी होत होती तो पर्यंत लोकांचे बोलावणे येत होते. पण नंतर अपेक्षीत प्रतिसाद कमी होता. या कामाची जाहिरात करण्याची ऐपत नव्हती (आजही नाही आहे, कमाई पेक्षा खर्चच जास्त आहे म्हणा) मग जाहिरात करायची कशी हा विचार डोक्यात होताच…
मी या संकल्पनेला लोकांपर्यत पोहचवण्यासाठी खूप भूकेला होतो. (आजही ही आहे) पण मार्ग सापडत नव्हते. ( आज अनेक मार्ग आहेत) तर भूकेपणीच स्वप्न खूप पडतात. तर या भूकेपायी आपले भविष्यातील कार्यलयात नेमप्लेट कशी असेल याचा विचार करत होतो. नेमप्लेट तयार करून आपल्या कार्यालयात (अजूनही कल्पनाच आहे म्हणा) नाहीतर घराच्या ( ते पण सध्या बॅकेचेच आहे अजून) दरवाज्यावर लावता तर येईल, म्हणून एक नेमप्लेट तयार केली. नेमप्लेट तयार करून आणली.. नेमप्लेट मधे गच्चीवरची बाग असे नाव आहे. यातला र हा इंडीयन रूपीजचा आहे. हे नेमप्लेट बनवणार्या व्यक्तिला निट समजून सांगतीले. नेमप्लेट तयार झाली. घराच्या दारावर लावायचे ठरवले खरे…पण डोक्यात विचार आला.. अरे ही पाहणार कोण… कारण दिव्यमराठीत बातमी येणे बंद झाल्यापासून घरच्या गच्चीवरची बाग बघायला कुणीच येत नव्हते. लोकांना समजावे व अनायसे जाहीरात व्हावी म्हणून ही नेमप्लेट पाठीवरच्या बॅगेलाच चिटकवली.. मग काय….झालं ना भाऊ,,,, आपली कमी पैशात जाहीरात सुरू.. खूपच आनंद झाला. सिग्नल वर थांबलो की लोक बॅगेवरची नेमप्लेट वाचायचे, विचारापुस करायचे.. कधी कधी फोटो सुध्दा काढून घ्यायचे व नेमप्लेटवर दिलेल्या मो. नं. संपर्क साधायचे.. मला माझ्याच डोक्यातून आलेल्या या कल्पनेची मलाच गंमत व कौतुक वाटायचं. आता छोटा हत्तीवर स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट उपक्रम अशी जाहीरात आहे. पण आजही बॅगेवर नेमप्लेट आहे. पाठीवरची बॅग जूनी झाली, पण नेमप्लेट नव्या बॅगेला नेमप्लेट तशीच आहे. (आपली पहिली सुरवात कशी विसरायची) आजही ही नेमप्लेटचे लोकांना कौतुक वाटते. अशी नेमप्लेट लावणारा कदाचित मी पहिलाच असेल. माझा एक पत्रकार मित्र हेमंत भोसले या नेमप्लेटला ताम्रपट असे म्हणतोय. बातम्या काढण्यात, लिहण्यात जसा तरबेज आहे तसाच एकाद्या बातमीला लेखाला, प्रसंगाला समर्पक नाव देण्यात निश्नांत आहे. (हेमंतने दिव्य मराठी मधे प्रकाशीत केलेल्या माझ्या पर्यावरण कामाच्या बातमीचे नाव होते. – ”प्रेम केले ते भाज्यांवर” ,या विषयावर लवकरच लिहील, कारण बातमी लोकांपर्यंत पोहचली खरी.. पण बायकोला कळालं की संदीपच्या आयुष्यात आपण एकटेच नाही आहेत. संदीपला गच्चीवरची बाग नावाची दुसरीच जिवा भावाची, जवळची मैत्रीण आहे. घरात वाद झाला… सात दिवस अबोला..सांगेन कधीतरी)… तर हा ताम्रपट बॅगेवर घेवून मी नाशिकभर फिरायचो.
तर पाठीवरच्या ताम्रपटाने बरीच काम मिळवून दिली खरी.. पण काही प्रसंग असे ओढवले की वर्णन कमी पडेल.
तर असाच एका दुपारी गंगापूर रोडने, भोसला कॅलेजच्या गेट जवळून, आनंदवली गावाच्या दिशेने भर दुपारी टू व्हीलवर घरी येत होतो. आपापले एका बाजूने गाडी चालवत होतो. तर येत असतांना शुक शुक आवाज आला. असे दोन- तीन वेळा झाले, या दरम्यान बरेच अंतर पुढे आलो होतो. मला वाटले असेल कुणी तरी, …गाडीच्या आरश्यात पाहिले माझ्या मागे फक्त त्या बाईच होत्या.. मला कळालं की त्या मलाच शुक शुक करत आहेत. मी चांगलाच घाबरलो. डोक्यात हेल्मेट असूनही अनेक विचार मनात आले… की अरे! आपले कीही चुकले का?, कुणाला धक्का (गाडीचा कट) लागला का?, की.. हेल्मेटमधूनही कुणाकडे पाहण्याचा तिरपा अर्थ काढला गेला की काय..( हेल्मेटमधून हे तिरपे पाहिलेले पण दिसते का?) तर यातल कोणतंच कारण नव्हते. मी गाडीचा वेग वाढवून पळण्याचाच विचार करत होतो. तशा त्या बाई अजूनच जवळ आल्या.. शुक शुक… गाडी बाजूला घ्या… त्यांच बोलणं मला दम दिल्यासारखं वाटलं. एव्हना रस्त्याने येणारी मंडळीनी माझ्याकडे शंकेने पाहिले, माझी खात्री पटली की आता काही खरं नाही.. काही तरी चुक झाली आहे नि या भर रहदारीच्या रस्त्यावर पब्लीक पडी पडणार असं म्हणून घाबरत टू व्हीलर बाजूला घेतली. अहो कधीची शुक शुक करतेय. .. मी डोक्यातला शिरस्त्राण बाजूला करून म्हटलं sorry, ऐकू आलं नाही… काही गडबड नको म्हणून आधीच आपल्याकडून सॉरी म्हणून टाकलं. त्यांनी इट्स ओके! म्हणून बोलण सुरू केलं. ”अहो ही गच्चीवरची बाग नेमप्लेट पाठीवर लावली.. पेपर मधे येते हे तुमचच काम आहे का?”आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला नि ह्दयाचे ठोके जरा कमी झाले. तर हे सारं शुsक शुssक गच्चीवरच्या बागेसाठी होत तर! त्यांनी माझा मो. नंबर घेतला. (पुढे नंतर त्या मो. न.च काय झालं माहित नाही.) त्या बाई आल्या रस्ती परतल्या. मी जरा थांबून उन्हातच दोन घोट पाणी घश्यात उतरवले. अक्षरक्षाः अंगाला घाम आणणारा असा हा प्रसंग मला आजही लख्ख स्मरणात आहे. (आताही लेख लिहीतांना श्वास कमी जास्त होतोय.. हा लेख लिहून जरा शांत बसलो. तेव्हा दुसराच प्रसंग लिहायला घेतला. एवढा भयानक अनुभवातून गेलो होतो याची कल्पना आली असावी तुम्हाला…
दुसरा प्रसंग असाच होता.. जिवावर बेतण्यासारखा, नाशिकमधील मुंबई नाक्यापासून ते सि.बी.एस पर्यंतचा टू व्हीलरवरच्या प्रवासाचा. (या प्रसंगात वरील प्रसंग सपशेल विसरलेलो.. कारण गाडीवर असलो की लक्ष फक्त समोर, कान व डोळे सतर्क व सारे अवयव बरोबर काम करताहेत ना म्हणजे गाडीवर नियंत्रण करत आहेत ना यावर होते.) गडकरी चौकातला सिग्नल सुटला.. नि एक चांगला धट्टा कट्टा तरूण, टिशर्टच्या बाह्या वर सरकवलेल्या, दंडातल्याच्या बेडक्या टप्पोर्या, व्यायामाने पोसलेल्या, बाऊन्सर असावा तो, गाडी जशी पुढे जात होती. तसा तो बरोबरी करू लागला.. गडकरी चौकातून – सी. बि.एस. पर्यंतच्या चौकापर्यंत तो अगदी गाडीला गाडी खेटवत होता. या दोन चौकादरम्यान तो बरोबरीच करत होता किंबहुना मला थांबवत होता. पण ट्राफिकमुळे त्याच्याकडे लक्ष देणे शक्यच नव्हत. त्याने सी. बी.एस. च्या सिग्नललर गाठलं नि म्हणाला.. गाडी बाजूला घ्या.. मी टरकलोच.. स्वतःला रिकॉल केलं. काही चुकलं का?, भाऊच्या गाडीचा धक्का लागला का?, की भाईला रस्ता दिला नाही ? यातल काहीच नव्हतं. मी जरा घाबरतच गाडी बाजूला घेतली. तो ही बाजूला आला.. आता हा का आपली गच्ची पकडतो असे वाटले. कारण हेल्मेटच्या आत चेहर्यावरचे हाव भाव दिसत नाही ना!. पण तो गच्चीवरची बागेची चौकशी करू लागला. मला हायसं वाटलं.
असे हे प्रसंग जिवावर बेतता बेतला वाचलोय.. ( वाचताय ना तुम्ही)
खरंच… किती क्रेझ, उत्सुकता आहे या नावातच. या ताम्रमपटाने असे दोन अनुभव दिले आहेत. तर याच ताम्रपट जेव्हां पुणे, मुंबईला जातो तेव्हा… ताम्रपट लपवून फिरावे लागते. न जाणे कुणी ओळखीचा मिळेल व वेळ घेतील किंवा उत्सुकता असलेले तेथेच प्रश्न विचारू लागतील. [ कारण सरळ काळाचे भान हरपून लोक प्रश्र्न विचारले आहेत.] एकदा कर तर मी एका रिक्षात बसता बसता कुणा एका रिक्षा चालकाने ताम्रपट वाचला. झालं दोघंही रिक्षा रस्यावर समांतर चालताहेत नि तो माझ्याकडे पाहून प्रश्न विचारतोय नी मी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतोय असं बराच वेळ चालू होते. (नशीब वनवेच होता तो) शेवटी सांगीतल की गुगुलवर गच्चीवरची बाग सर्च करा.. सारी माहिती मिळेल. आता या कामाच्या दोन संकेतस्थळ आहेत. स्वतःच एकाद्या रोपाला थोड थोडं समजून उमजून वाढवाव तशी ही संकेतस्थळे विकसीत करत आहे. (इतरांकडून करून घेण्यात पैसा आहे कुठं… असो)
लेख आवडला तर नक्की लाईक, शेअर करा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, 9850569644
You must be logged in to post a comment.