कोव्हीड १९ आता संपलेला आहे. रोजचे दैंनदिन व्यवहार सुरू झाले आहे. लॉकडाऊन नंतरचा हा पहिला पावसाळा, बागप्रेमी मधे प्रचंड उत्साह संचारला आहे. ग्रीन कॉलर्स ( म्हणजे पर्यावरण पुरक व्यवसायकांची) संख्या वाढते आहे. वाढलीच पाहिजे. अनेक ग्रीन कॉलर्स कडून आता विविध बागेच्या स्पर्धांचे आयोजन होणार आहे. होत आहे. या स्पर्धा जिंकायच्या कशा त्यातील बारकावे काय आहेत. हे या लेखातून समजून घेणार आहोत. कारण गच्चीवरची बाग नाशिकची सुरवात ही भाजीपाला बाग व होम कंपोस्टींगच्या स्पर्धा आयोजनातून झाली होती. त्यामुळे काहीसा अनूभव गाठीशी आहेच.
बाग संदर्भात खालील विषयावर स्पर्धाचे आयोजन होत असते.
- होम कंपोस्टींग
- भाजीपाला बाग
- फुलांची बाग
- गुलाबांची बाग
- ऑर्चिडची बाग
असे काही नमुनेदार स्पर्धा आयोजन केले जाते. यातील काही कॉमन फॅक्टर काय असतात. ते आपण लेखातून समजून घेवू.
- सुंदरताः सुंदरता हा बागेचा आत्मा आहे. ही सुंदरता अनेक गोष्टीतून प्रतीत होत असते. जसे की बागेची रचना, जागेचा केलेला कल्पक वापर, कमी जागेत जास्त झाडे. बागेतील झाडांची विविधता. बागेत असेलेला टापटिपपणा, झाडाची केलेली निवड, त्याची वाढ अशा अनेक गोष्टीतून सुंदरता प्रकट होत असते.
- स्वच्छताः स्वच्छता हा सुंदरतेचा पाया आहे. बागेत स्वच्छता असेल तर ५० टक्के बाग सुंदर दिसू लागते. ही स्वच्छता अनेक गोष्टीतून प्रकट होत असते. जसे की बागेत कुठेही माती पडलेली नसावी. झाडांवरची पिवळी पाने काढलेली असावी. वाळलेल्या फांद्या नसाव्यात. झाडांची बेढब वाढ नसावी. नको त्या फांद्या काढून टाकणे. झाडांचे सरळमिसळ नसावी. नाहीतर ते गचाळ अक्षरासारखे दिसते.
- हिरवळः बागेत एक वेळ फुल नसेल तर चालेल. पण बाग हिरवीगार असावी. कारण हिरवेपणा हे बागेचे वस्त्र आहे. बागच हिरवीगार नसेल तर विवस्त्र माणसासारखी बाग दिसेल. डोळ्यांना सुखावणारा रंग हा हिरवा आहे. तसेच मानसिक समाधान त्यातून मिळते. तसेच हा हिरवेपणा म्हणजे बाग निस्तेज न दिसता ति टवटवीतपण दिसली पाहिजे.
- टाकाऊ वस्तूंचा वापरः बरेचदा स्पर्धेत सहभागी व्हायचे म्हणजे चांगल्या रंगी बेरंगी कुंड्या आणल्या जातात. त्यावर अमाप खर्च होतो. खरं तर कशात झाडं लावता या पेक्षा त्यात ते झाडं कसं उगतं. वाढतं, बहरतं यावर लक्ष दिले पाहिजे. या टाकाऊ वस्तूंना अंत नाही. फक्त कल्पकता अंगी असावी. तसेच स्पर्धा ही चांगल्या कुंड्या म्हणजे मटेरिअलिस्टीक स्पर्धा नसते. स्पर्धा असेते झाडांची, ते कसं बहरलं आहे. ते कसं वाढलं आहे. ते किती आनंदीत आहे. यावरच ना. तेव्हा झाडं कशात लावली आहे या पेक्षा त्याच्या आत मधे काय भरलं आहे. याला फार महत्व आहे. त्यासाठी चांगल्या BISHCOM या पॉटींग मिक्सचा वापर करा.
- आपले त्यातील ज्ञानः केवळ चांगली झाडे आणून त्याला आपल्या बागेत जागा देवून स्पर्धा जिंकता येत नाही. त्याची जाग कोणती, त्याचा फळण्या फुलण्याचा सिझन कोणता, त्याची ऊन, पाणी, तापमान याच्या सवयी काय आहेत. याचाही अभ्यास पाहिजे.
- ऑरगॅनिक फॅक्टरः बरेचदा स्पर्धेत जिंकण्यासाठी रसायनांचा आधार घेतला जातो. रसायनं केवळ सजीवांना नव्हे तर वनस्पतींना सुध्दा घातक असतात. त्याचे परिणाम येतात पण ते तात्कालीन असतात. आणि यातला अभ्यास फार बारिक करावा लागतो. पण ऑरगॅनिक तत्वांचा वापर करत असाल तर हा अभ्यास फारसा लागत नाही. मोजक्या खतांमधे त्यांचे भागते. पण ते शाश्वत असते. सारं काही चांगले पुरवत राहिले तर निसर्ग फुलणारच. अर्थात त्यासोबत ऊन, सावली,पाणी, तापमान याचा अभ्यास करणे गरजेचे असते.
- होम कंपोस्टींगः घरच्या कचर्याचे कंपोस्टींग करणे हे स्पर्धेतील महत्वाचे गुण आणू शकतात. कारण त्यात स्वांवलंबन असते. सारीच खत विकत आणून झाडे पोसता येत नाही. त्यांनी घरच्या खतांची गरज असते. कारण त्यात आपल्याच बागेतील मातीमधून वापरलेले घटक हे होम कंपोस्टींग करून पुन्हा वापरता येतात.
- भावना, संवेदनाः झाडांशी भावना व संवेदना जोडलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येकाची एक गोष्ट असते. आपण फक्त आनंद घेणार असाल तर या गोष्टी फार कमी असतात. पण आपण स्वतः त्याची काळजी घेणारे असालं, त्यासाठी प्रयत्न केलेले असेल तर नक्कीच संस्मरणीय अशा आठवणी जपता येतात. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होताना अशा प्लॅन्ट्स स्टोरीज तुमच्या जवळ असल्या पाहिजेत. कमी असल्या तरी चाललीत पण त्या खर्या खुर्या असाव्यात. रचलेल्या नसाव्यात.
यासाठी काय करावे.
- स्पर्धा समजून घ्या… स्पर्धा नेमकीं काय आहे. कशाची आहे. त्यातील घटक काय आहेत. हे निट समजून घ्या. कारण प्रत्येक स्पर्धेचे अटी नियम वेगवेगळे असतात. त्याचे बारकावे समजून घ्या. तरच तुमचा पहिल्या पाचांमधे नं. येऊ शकतो. नाहीतर हाती धुपाटणे येते. व त्यातून आपण कायमची निवृत्ती घेतो. तसे होऊ देवू नका.
- एक्सपर्ट व्यक्तिचा सल्ला व सेवा घ्याः बागेसाठी नेहमी तज्ञ, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. काही जमत नाही म्हणून जशी शेती केली जाते तसेच शहरी भागात रोजगार नाही म्हणून बागेची देखभाल करणारी मंडळी भेटतात. ते काम म्हणून बागकामाकडे पहातात. तज्ञ लोक त्याकडे प्रक्रिया, निष्कर्ष म्हणून अभ्यास करतात. तेव्हां ऐकायचे कुणाचे व कितपत याचा समतोल ठेवा. तज्ञ व अनुभवी व्यक्तीचा सल्ला हा प्रत्यक्ष भेटीतूनच मिळतो असे नाही. त्यासाठी आता विविध माध्यमे उपलब्ध आहेत. फोनवरही सल्ला देणारी सेवाभावी मंडळी आहेत. त्यांचा शोध घ्या.
- काही खर्च करा. बरेचदा बागेची फार हौस असते पण खर्च करण्याची तयारी नसते. अनुभवी व्यक्तिकडून सेवा सुविधा विकत घ्या. बरेच मंडळीना सर्जरी करायची असेल तर कंपाऊंडरचा सल्ला घेतात. फार महागडा आहे काहो डॉक्टर? नक्की गुण येतो ना? खरं एम.डी.चाच सल्ला घ्यावा. तसेच बरेच जणांना सर्जरी करून हवी असते पण ति कंपाऊंडरला दिलेल्या टीप मधे. असो… काम करायचे तर ते उत्तमच झाले पाहिजे. त्याची सुरवात ही पायाभूत गोष्टीपासून झाली पाहिजे.
- उन्हाळ्यात वापरा ह्युमिक जल.. बरेचदा काही स्पर्धा या उन्हाळ्यात असतात. अशा वेळेस बाग टवटवीत ठेवण्यासाठी ह्युमिकजलाचा वापर करा. बाग तर हिरवी राहतेच शिवाय फळा फुलांनी बहरलेलीसुध्दा असते.
- आपल्या बागेचे वेळोवेळी व्हिडीओ डॉक्यूमेन्टेशन करा. आपल्या बागेतील फुलांचे झाडांचे, संस्मरणीय क्षणाचे चित्रीकरण करून ठेवा. कारण वेळोवळी केलेले चित्रण हे एकादी फिल्म बनवतांना उपयोगात येते. हे कसे करावे याचे उत्तम उदाः तुम्हाला INSTAGRAM वरील @gacchivrchi_baug या अंकाऊंट वर पहायला मिळेल.
- अनुभवी व्यक्तीकडून आपल्या बागेचे चित्रण करून घ्या. कारण ही सुध्दा एक महत्वाची गोष्ट आहे. जि तुम्हाला बागेची स्पर्धा जिंकून देवू शकते.
- युट्यूबचा चौकसपणे सल्ले आमलांत आणा.. सध्या सर्वच प्रकारचे शिक्षण हे युट्यूबवर उपलब्ध आहे. पण बरेचदा लोक आपल्याला त्यातील फार कळते असा आव आणून व फक्त चेहरा दाखवून सल्ले देत असतात. प्रत्यक्षात काम करणार्या व्यक्तिचे व्हिडीओ पहावेत. खरंच ही व्यक्ती त्यातील आहे का? याचा मागोवा घ्या. कारण सुंदर चेहरा व आवजातील मधूरता ऐकून लोक सल्ले आमंलात आणतात. तसेच ही मंडळी सर्वच प्रकारची व्हिडीओ बनवतात. हा मोबाईल चांगला तो वापरा. ईकडे फिरायला गेलो त्याची अनुभव सांगणे. अशा व्यक्तिपासून दूर रहा. कारण आज इंटरनेटच्या काळात बरेच चित्रीकरण विनामुल्य मिळत असते. ईकडून तिकडून हे चित्र गोळा करायचे. चांगले हेडींग द्यायचे व पैसे कमवायचे एवढेच यांचे काम असते. त्यामुळे जेन्यूईन व्यक्तीचा शोध घ्या. त्यांना फॉलो करा. त्यांच्या संपर्कात रहा.
तुम्हाला अशा बागेच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.