जिवामृत म्हणजे काय…
झाडांना द्यावयाचे हे द्रव्य स्वरूपातील संपूर्णतः नैसिर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेले द्रावण आहे. यात असंख्य सुक्ष्म जिवाणू असतात. बागेला, झाडांना, कुंड्याना संजीवक म्हणून त्याचा वापर करता येतो.
जिवामृत वापरावयाचे फायदे…
जिवामृत वापरामुळे झाडांना चांगली फूट फूटते, फूल गळती होत असल्यास ति थांबणे, फळांची संख्या व आकार वाढतो. बरेचदा फळ येत नसल्यास ते येवू लागतात. जिवामृत हे मुळांशी देता येते तसेच त्याची फवारणी करता येते. जिवामृताच्या वापरामुळे मातीचा पोत सुधारतो. माती मऊसूत होते. रंग बदलतो. विशेषतः उत्पादनशील बनते.
जिवामृत वापरावयाचे अनूभवः एक..
लग्नाची आठवण म्हणून एका दांपत्याने पारिजातकाचे झाडं लावले होते. ते झाडं फुलले. अंगणात पारिजातकाचा सडा पडत होता. पण काही कालांतराने ते झाडं वाळू लागले. फूट फूटेना. त्या झाडांत भावना गुंतल्यामुळे ते तोडून टाकावेसे वाटेना. त्याची छाटणी झाली. खत देवून झाले. पण झाड रूसलेलेच. असे दोन वर्ष झाली. पण झाड काही बहरत नव्हतेच. शेवटी झाडांलाही वय असते. त्याला काढून टाकावे. असा निर्णय झाला. पण कुठून तरी गच्चीवरची बागेचा सल्ला घ्या असे सुचवले. झाडं पाहिले. झाडांच्या तळाशी खडक आहे असे निदान झाले. जमीनीतले आवश्यक पोषण संपले होते किंवा जिवाणूंचा अभाव होता. जिवामृताचा डोस देण्याचे सुचवले. दर महिण्याला पाच लिटर प्रमाणे सहा महिने जिवामृत पाण्यात पातळ करून देवू लागलो. झाड तिसर्या महिण्याला अगदी हिरवे गार झाले. नंतर जिवामृताची गरज पडली नाही. आजही ते झाडं व ते दांपत्य आभार मानतात.
अनुभव दोन…
घरी कारली व दूधी भोपळयाची वेल लावली होती. चार महिण्यात तो चांगला फोफावला. पण फळ काही धरत नव्हती. अर्थात ते बेणं संकरीत होतं. रसायनाच्या वापराशिवाय ते थोडीच रिर्टन गिफ्ट देणार होत. पण मी रसायनांच्या कट्टर विरोधात. फळ नाही आलं तरी चालेल पण रसायनं वापरवायाची नाही, मातीचा नाश करून घ्यावयाचा नाही असं ठरवलेलं. त्याचे लाड म्हणून शेणखत, जिवामृत पाण्यात डायल्यूट करून देत होतो. पण फळ काही धरेणात. वेल काढून टाकावीत या निर्णयावर आलो. पण एक विचार डोक्यात चमकला. जिवामृत पाण्यात देण्यापेक्षा डायरेक्ट दिले तर काय होईल. घरचच जिवामृत होतं पण वेलाला गरम पडेल म्हणून मीच ते देत नव्हतो. पण वेल काढायचाच आहे. असाही जिवामृत दिल्याने वेल वाळला तर वाळला नाही तर कारली, भोपळे तर मिळतील. पंधरा दिवसाच्या अतंराने दोन वेळा १-१ लिटर जिवामृत दिले. काय आश्चर्य भोपळ्याच्या वेलान ५-६ संख्येन हातभर लांब असे भोपळे दिले. तर कारल्याने ३-४ किलो कारली दिलीत. २० प्रमाणे चार लिटर जिवामृत वापराचा खर्च फक्त ८० रू. तेही संपूर्णतः नैसर्गिक फळ.
हाच प्रयोग आम्ही बाग फूलवतांना, गार्डन मेन्टनंन्स करताना इतरांकडे केला. तेथेही चांगला परिणाम येवू लागला. आता आवश्यक असेल तेथेच आहे तसे जिवामृत देतो. बेबी पमकीन, वाल छान येताहेत.
आंब्याची झाडं, नारळाची झाडं, अंजीर यांना याचा उपयोग केला आहे. व त्याचा परिणाम उत्तम येताहेत. तसेच पोषणाअभावी झाडांची फळे किडतात. आतल्या आत सडतात. यावर यांची फवारणी, व मुळाशी देणे गरजेचे आहे.
जिवामृताची फवारणी… विस लिटर पाण्यात ठराविक अतंराने जिवामृत फवारणी केल्यास काळा मावा, तुडतुडे, मिलीबग हे येत नाही. बाग निरोगी राहते.
जिवामृत कसे बनवतात…
जिवामृत हे द्रावण देशी गायीचे शेण, देशी गायीचे गौमुत्र, चना डाळीचे पीठ, गुळ व बागेतील माती यांच्या पासून तयार केलेले असते. हे द्रावण बनविण्यास दोन दिवस लागतात. व जास्तीत जास्त सात दिवसात हे गरजेचे असते. त्यानंतरही वापर केल्यास झाडांना अपाय होत नाही. फक्त त्याचा परिणाम हा ताज्या द्रावणापेक्षा कमी येतो.
जिवामृताचे रंग रूप व स्वभाव…
जिवामृताचा रंग हा सोनेरी असतो. त्याला गुळाचा गोड, गोमुत्र शेणाचा व डाळीच्या पिठाचा असा संमिश्त्र गंध येतो. जिवामृत भरलेली बाटली ही सावलीत ठेवावी. उन्हात ठेवल्यास त्यात जिवाणू निर्मीतीची गती वाढते. व बाटली ब्लास्ट होण्याची शक्यता असते. शक्यतो ती उघडी ठेवावी. लांबच्या प्रवासात न्यावयाचे असल्यास अधनं मधनं त्याचे झाकण उघडून आतील वायू काढून टाकावा.
जिवामृत कुठे मिळेल..
जिवामृत हे द्रावण आमच्याकडे १ लिटर पॅकींगमधे २१ रूपयात उपलब्ध आहे. नाशिक शहरात ५० डिलेव्हरी चार्जेस प्रमाणे घरपोच पोहचवतो. On Road असल्यास डिलेव्हरी चार्जेस घेत नाही. (तसेच वेळो वेळी त्या त्या भागात आल्यास व्हाट्स अप वर कळवले जाते. संपर्कात रहा)
ध्रुवनगर बस स्टाप, सातपूर गंगापूर लिंक रोड, (चुल्हीवरची मिसळ) नाशिक येथील कार्यस्थळावर जिवामृत मिळेल त्यासाठी फोन करून येणे. कसे पोहचावे.
मुबंई पुणे येथे एक लिटर जिवामृत हे ६० ते ८० रूपये लिटर विकले जाते. अगदी उत्तम व आकर्षक पॅकिंग मधे २०० रू. लिटर नेसुध्दा विक्री होत आहे. आम्ही नाशिक मधे शक्य तेथे घरपोच २० रु. लिटर ने देत आहोत. जिवामृत भरण्यासाठी टाकावू पाण्याचा बाटल्यांचा आवर्जून वापर करतो. कारण त्याचा पूर्नवापर होणं गरजेचे आहे. त्यामुळे आमची किंमत कमी आहे. आपल्याला जिवामृत कसे बनवावे याचेही निशुल्क मार्गदर्शन करतो.
कसे वापरावे…
एक लिटर जिवामृत हे आहे तसे किंवा पाच ते पंधरा लिटर पाण्यात डायल्यूट करू शकतो. एक चौरस फूट कुंडीसाठी डायल्यूट केलेले मगभर जिवामृत टाकू शकता.
जिवामृत बनवण्यासाठी आम्ही घरी देशी गाय पाळली आहे. आठवड्याला एक किंवा दोन वेळेस २००-२०० लिटर द्रावण तयार केले जाते. आम्ही Garden Maintenance ची काम करतांना त्याचा सढळ हाताने वापर करतो.
दक्षताः जिवामृत पाणी हे फक्त फवारणीसाठी वापरावे. सरसकट सर्वच झाडांना जमीनीवर देवू नये. गांडूळांची संख्या कमी होते. जेथे गरज असेल तेथेच Concentrate द्यावे. तसेच सातत्याने वापर करू नये. त्यात थोडा खंड पाडावा. कारण जमीन उत्पादनशील व्हावयास इतरही घटकांची, जिवाणूची गरज असते. शहरी परसबाग व शेतात याचे परिणाम, वापर, प्रमाण यात विविधता आढळून येते. कृपया अनुभवी तज्ञांच्या मार्गदर्शनानेच त्याचा वापर करावा.जिवामृत वापरल्या नंतर निमपेंडीचा वापर जरूर करावा.
सोशल मिडीयावर निशुल्क मार्गदर्शनासाठी गच्चीवरची बाग, नाशिक. संदीप चव्हाण, 9850569644
जमीन उत्पादनशील व्हावयास इतरही घटकांची, जिवाणूची माहिती पुढील लेखात..
जिवामृताचा बाग व शेती व्यतिरिक्त कुठे कुठे वापरता येते… माहिती पुढील लेखात.
[…] होते. इतर वेळेस द्रव्य खत म्हणून जिवामृताचा वापर करावा. दरमहिण्यास ३ ते ५ लिटर […]