
संयुक्त राष्ट्र संघाने या सहस्त्राकात विकसीत व विसनशील देशांनी साध्य करावयाची काही मार्गदर्शक धैये ठरवून दिली होती. ज्याची मुदत २०१५ होती. जी संघाच्या १९३ सदस्य देशांना स्वैच्छिक होती. खर तर त्यांनी १७ ध्यैयांना मान्यता दिली होती. पण यातील एकही ध्यैय एकाही राष्ट्राला काही अंशानेही गाठता आले नाही. त्याची कारणे शोधणे हा वेगळा विषय आहे. पण ही ध्यैय आता २०३० पर्य़ंत गाठण्याची ठरवले आहे. ( तो पर्यंत आपण बरेच काही गमावलेले असू) त्यातील ध्यैये व त्यांच्या अंतर्गत येणारी उदिष्टे जरा आतंरजाळ्यावर (Millennium Development Goal) शोधून पाहिली, त्याचा खोलात जाऊन अभ्यास केला तर त्याचा व आपण गारबेज टू गार्डन असलेली गच्चीवरची बाग या पर्यावरण पुरक संकल्पनेची गरज व महत्व सहज लक्षात येईल. आम्ही विश्वासाने सांगतो की गच्चीवरची बाग हा उपक्रमासारखे जागतिक पातळीवर चालत असलेले उपक्रम हे संयुक्त राष्ट्राने ठरवून दिलेल्या ध्यैये आणि उदिष्ट गाठण्यासाठी बर्याचं अंशी मदत करत आहे.
अर्थात ही सुरवात आहे. बर्याच देशांतील शहरात शहरी शेतीचे उपक्रम सुरू सुध्दा झाले आहेत. संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेली या सहस्त्रकातील ध्यैये ही गच्चीवरची बाग अर्थात शहरीशेतीशी संलग्न आहेत. भूक निर्मुलन, चांगले आरोग्य, शुध्द पाणी आणि आरोग्यदायी स्वच्छता, नुतनी करण्याजोगी स्वस्त ऊर्जा, रोजगार, सर्क्युलर इकोनॉमी, शाश्वत शहरे व समाज, उपलब्ध साधनांचा जबाबदारी पूर्वक वापर, हवामानाचा परिणाम, जमिनाचा शाश्वत उपयोग, सेव्ह सॉईल, बहुविविधता (वनस्पती, कीड) आणि शाश्वत विकासासाठी जनभागीदारी… अशी ही उदिष्टे आहेत. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय भागात विभागली आहेत. आणि गच्चीवरची बाग उपक्रम या गोष्टींना परिघावरच नव्हे तर आतील गर्भापर्यंत स्पर्श करते हे आवर्जून सांगावेसे वाटते. विशेष म्हणजे ही लोक चळवळ होऊ घातली आहे. राव न करी गाव करी ही आपल्याकडील प्रचलित म्हण आहे.
क्यूबा सारख्या देशावर जेव्हा आर्थिक निर्बंध आलीत तेव्हा तेथील लोकांनी आपलं अन्न हे दारं, खिडक्या, अंगणात उगवली होती. तसेच सध्या वॉश (water, sanitation & Health) नावाचा उपक्रम विकसन देशात राबवला जात आहे. त्यात पाणी , स्वच्छता व आरोग्य हे मुद्दे आहेत. वरील दोनही उदाःहरणातील ही सारी मुद्दे एकमेंकाशी संलग्न, एकमेकांवर परस्पर अवलंबून आहेत. ही वरील सारी उदिष्टात आपण प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तरी एका टिटवीने समुद्र आटवला या म्हणी प्रमाणे एका उपक्रमाने जागतिक प्रश्नांना उत्तर ठरेल. हा खारीचा वाटा अर्थातच गारबेज टू गार्डन असा शहरी शेतीचा, गच्चीवरची बाग फुलवून आपण उचलू शकता.
प्रगतशील देशातील निवडक चौकात भाजीपाला लागवड करण्यात आला आहे. जो त्याची कुणीही काळजी घेऊ शकतो व त्यातील भाजीपाला घेवू शकतो. हे होईल का हो आपल्याकडे? रस्त्याच्या दुभाजकात जैविक काडीकचरा सहजतेने जिरवता येऊ शकतो शिवाय त्यावर माती कमी लागेल. परदेशात कचरा हा प्रश्नच नाही आहे. कचरा हा उदयोग आहे. मोठी इंडस्ट्री आहे. पण त्याची सुरवात ही स्वंयशिस्तीने होते. जी व्यवस्था ठरवली जाते त्यात सुधारणा करण्याची नागरिकांत व प्रशासनातही धमक असते. आपल्याकडे सर्वत्र इच्छेचाच अभाव असतो.
गच्चीवरची बाग ही संकल्पना खरं तर शहरासाठी उपयुक्त आहेत. गारबेज टू गार्डेन हा त्याचा आत्मा आहेच. कचरा ही अशी गोष्ट आहे जी सर्वोतोपरी वापरात आणली तर त्याचं सोनं करता येऊ शकतं तर दुर्लेक्ष झालं तर त्याचा राक्षसही होऊ शकतो. फक्त त्याला वापरावयाचे कसे याचे तंत्र, त्याची वैज्ञानिक मांडणी, महत्व लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे. मुळातच एकादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला नेहमीच अनुकुल वातावरण, परिस्थिती असेन असे कधीच नसते. ते तसे असते तर त्या साध्यात आपल्याला मजा, गंमत व शिकायला मिळणारच नाही. जितकी परिस्थतीती प्रतिकुल तितक्या मानवी विचाराच्या, कल्पनेच्या, कृतीच्या कक्षा विस्तारत जातात. निसर्ग तर प्रतिकूल परिस्थीतही फुलण्यास तयार असतो. येथील प्रत्येक गोष्ट मग ती दृष्य असो अदृष्य असो ती पंचमहाभूताशी म्हणजे पृथ्वी (जमीन),आप (पाणी अथवा जल), तेज (अग्नी), वायु, आकाश येथे सातत्याने सुक्ष्म बदल घडताहेत. प्रत्येक कण नव्याने घडतो, बिघडतो. यामागील या महाभूतांच्या अस्तित्वामुळेच तर जीव जगला आहे व जगणार आहे. हे निसर्गाचे नैसर्गिकरित्या अध्यात्म आपल्यात रूजलं तरच मानवी मनोविकास होणार आहे नाहीतर वैज्ञानिक दृष्ट्या प्रगतशील असू मन मनाने आपण अजूनही अप्रगत काळात आहोत असे समजून घेतले पाहिजे.
या सहस्त्रकाची धैये गाठणे हे फक्त सरकारचे काम नाही. ते प्रत्येक नागरिकाचे आहे. बस त्यासाठी रोज आपला थोडासा वेळ देणं गरजेचे आहे. इच्छा तेथे मार्ग असतो. आपल्या स्थानिक प्रयत्नांनी जगाला भेडसवणारे प्रश्न सुटत असतील तर नक्कीच त्यात सहभाग घेतला पाहिजे. परदेशात जागतिक परसबाग दिन साजरा केला जातो. (World Kitchen Garden Day) प्रत्येक वर्षाच्या ऑगस्ट महिण्यातील चोथ्या रविवारी, त्यांच्याकडे परसबाग फुलवणे हा राष्ट्रीय कार्यक्रम असतो. आपल्याकडे पोलीओ डोस हा जसा असतो तसा… प्रत्येक शाळेत, वाडी- वस्तीवर सोनखताव्दारे परसबाग फुलवली जाते. याचा अनुभव झिम्बॉब्वे या देशात प्रत्यक्ष राहून मला अभ्यासण्याची संधी मिळाली होती. आपल्याकडेही प्रत्येक अंगणवाडी, शाळा येथील मोकळ्याजागेत परसबाग तयार कराव्यात असे फक्त म्हटलं आहे. नाशिक मधील आनंद निकेतन शाळा या विषयाकडे गांभीर्याने पाहत असून मुलांना शिकतं करण्याचा प्रयत्न करत आहे. ३६० अंशाच्या व्याप्तीव्दारे सर्वस्पर्शी असलेली ही संकल्पना आपण लक्षात घेतली तर आपण नाशिककर खूप मोठ्या बदलाचे भागीदार व साक्षीदार होऊ यात शंका नाही.
यासाठी गच्चीवरची बाग गेल्या दहा वर्षापासून Grow, Guide, Build, Products, Sale & Services व्दारे काम करत आहे.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
टीप ः सदर लेख सकाळ नाशिक व्दारे हिरवे स्वप्न या सदरात प्रकाशीत झालेल्या लेख मालिकेतील एक लेख आहे.