गोमुत्र नव्हे गोईत्र
Go mutra Nave Go Etra
गोमुत्र नव्हे गोईत्र
विषमुक्त भाजीपाला पिकवायचा म्हणजे भाज्या उत्पादनासाठी खत, औषध फवारणी हे वापरावेच लागते. मग त्यासाठी काय वापरायचे (झाड पाल्यापासून बनणारे औषधं आणि कंपोस्ट खत कि जनावरांचे मुत्र व शेण वापरायचे हा यक्ष प्रश्न होता.) आपले पूर्वज शेतीसाठी काय वापरत होते?. तेव्हा त्यातून गोधनाचा मार्ग समोर आला. आपण तर शहरात राहतो. तिचा चारा, पाणी, औषधे याचा विचार करून मोठ्या हिमतीने गावरान गाय पाळायचे ठरवले. आमच्या घराला गोलक्ष्मीचे पाय लागले.
तिला छोटेशे घर, गव्हाण तयार केली. तिच्यापासून दूध दह्याची अपेक्षा नव्हतीच. आम्ही तिला चारापाणी द्यायचा व तिने त्याबदल्यात गोमय (शेण) गोमुत्र द्यायचे. कारण दूधानंतर यालाही महत्व आहे. तिच्यापासून मिळणारे गोमुत्र हे गोठ्यात जमा करण्याचे ठरवले. गोठा हवेशीर करण्यात आला. त्याला य़ोग्य तो उतार देवून एका ठिकाणी गोमुत्र जमा होईल असा खड्डा तय़ार करून त्यात बादली बसवली. उत्साहाने तिचे गोमुत्र संकलन करू लागलो. गोठा झाल्यानंतर मिळणारे गोमुत्र हे बाटल्यामधे भरून घरी आलो. सुजल लहानच होता. नेहमी प्रमाणे जवळ आल्याबरोबर त्याला माझ्या हातांना गोमुत्राचा गंध आला. “छि कसला घाण वास येतो” म्हणून दूर पळाला. दुसर्या दिवशी ही गोमुत्र बाट्ल्यामधे भरून घरी परतलो. तर त्याने आपणहून पुढे येवून हाताचा वास घेतला. एक खोल श्वास घेतला. आणि पुन्हा पुन्हा त्याचा वास घेवू लागला. तो त्याला आवडला होता. त्यांनतर बरेच दिवस हा खेळ चालू होता.
आमच्याकडे हंबा आहे, तिचे पिल्लू आहे म्हणून जवळचे कच्चे बच्चे पहायला येतात. तर परवा एका आजीसोबत लहान मुलगा आला होता. गायीला चारा भरवता भरवता “देख हंबा हमे क्या क्या देती है” असे आजीने विचारल्यावर तो सांगू लागला. “हंबा हssमे दूssध देती है। गोबर देती है। हं और हमे गोssईत्र भी देती है।“ “अरे गोईत्र नही बेटा, गोमुत्र देती है”।. मी त्यांचे हे बोलणे ऐकत होतो. खरंच किती सुंदर शब्द या मुलाच्या मुखातून बाहेर पडला होता. गोईत्र. ईत्र म्हणजे अत्तर… त्या लहान मुलाच्या बोलण्यातूच यावर लेखन करण्याचे सुचल.. तर ईत्र म्हणजे अत्तर, अत्तर म्हणजे सुंगधी द्राव्य. ज्याचा दरवळ हा काही अंतरापर्यंत तर येतोच पण तो बराच काळ टिकतो सुध्दा व तो हवा हवासाही वाटतो.
खरं तर बर्याच दिवासापासून गोमुत्राला पर्यायी शब्द शोधत होतो. मुत्र हा शब्द थोडा अवघडल्या सारखे, संकोचल्यासारखे व्हायचे. मानवी मुत्राला शिवांबू म्हटले जाते. त्यातून मानवी रोग बरे होतात. तर गायीचे गोमुत्र तर त्याहून सरस. मग त्याला गोमुत्र का म्हणावे ? हा बर्याच वर्षापासून सतावणारा प्रश्नांचे उत्तर मला या प्रसंगातून मिळाले होते.
तर गोईत्र हे बागेसाठी फार महत्वाचे आहे. बिज संस्कारापासून तर वनस्पतीना संजीवक म्हणून देता येते. साधे गोईत्र व पाणी यांचे नियमित बागेवर फवारणी केली तरी त्यातून बरीच कीड दूर राहते. तर मित्र किटकांना हा गंध ओळखीचा वाटतो. बागेत फवारल्या नंतर फुलपाखरे आकर्षीत होतात. गांडुळांना त्याचे अन्न (खारट पणामुळे) चवदार होते. बागेसाठी विविध वनस्पती युक्त घरघुती औषध निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो. फरशी पुसतांना झेलेल्या गोईत्राचा वापर केल्यास झुरळ नाहीशी होतात. विविध विद्यूत घटांमधे गोईत्राचा वापर करून त्यापासून सोनं निर्मितीचे संशोधन झाले आहे. गोठ्यात जमा होणारे गोईत्र हे शेती, बागेसाठी वापरावे, झेलेले गोमुत्र हे पंचामृत करण्यासाठी व प्राशन करण्यासाठी वापरले जाते. तर गोईत्र अर्क हे औषध निर्मितीसाठी वापरले जाते. गोईत्र हे फक्त, गावठी, गावरान, देशीगायीच्या वाणाचेच वापरावे. होस्टीन, जर्सी गायीचे गोमुत्र वापरू नये.
बागेत गोईत्र फवारल्या नंतर आपली श्वसनाची धारण क्षमता वाढते. श्वास हा खोल घेतला जातो. जाणून बूजून श्वास घ्यावा लागतो. ज्याला डेप्थ ब्रिदींग म्हटले जाते. खोलवर घेतलेला श्वास हा मेंदूला प्राणवायू पुरवत असतो. रोजच्या कामात आपण श्वासाकडे लक्षच नसते. शरीराला जेवढा गरजेचा आहे तेवढा श्वास आपोआप घेतला जातो. पण त्यात लक्ष दिले तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात. आपण जाणीव पूर्वक घेतलेला श्वास व त्यासोबत केलेला विचार, निर्णय हा नक्कीच फलद्रुप होतो. जाणीव पूर्वक, अधिकचा, खोलवर घेतलेला श्वास हा मेंदूपर्यंत पोहचवतो. म्हणूनच ध्यानाला महत्व आहे. ध्यान करण्याचे लक्षात कुठे राहते. पण बागेतील गोईत्राचा वापर हा आपला श्वास घेण्यास जागृत करते. पूर्वी मातीच्या घरात अनेक किटक राहयाचे. विषाणू राहायचे. तसेच पूर्वी मासिक पाळीच्या काळात गोईत्राचा वापर (शुध्दता हा हेतू नंतर) हवेतील विषाणू मारण्यासाठी व दुर्गंध मिटवण्यासाठी केला जायचा. आज चकचकीत घरात राहणार्या, वेगवेगळे रासाय़निक द्रव्य वापरणार्या मंडळीना गोईत्राचा गंध कसातरी वाटतो पण सरावाने तो अत्तरासाऱखा वाटायला लागतो. थोडक्यात रसायनापासून दूर जायचे असेल तर गोईत्र व गोमयाशिवाय पर्याय नाही. श्री कृष्णांनी गोवर्धन एका कंरगळीवर उचलला आहे. आज करंगळीची संकेताचा विचार केला तर गोवर्धन, त्यातील गाव, गायीचा कळप व करंगळीचा संकेत एकूण ति प्रतिमा आपल्याला हेच तर सुचवत असेन. कारण शेतीक्षेत्रात गायीच्या शेणाचा वापर श्रीकृष्णांनी प्रथम केला आहे. अशा गोईत्राचा वापर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच करावा.
आयुर्वेदात गोमुत्र, मध,, गाईचे तूप हे जितके जूने तितके उपयोगी मानले जाते. कारण त्यातील सुक्ष्म जिवांची संख्या बर्याच प्रमाणात असते. ताजे गोमुत्र हे पारदर्शिक दिसते तर जूने गोमुत्र गडद व तपकिरी दिसू लागते. ताजे गोमुत्र व जूने गोमुत्र यांचा वापर करतांना त्याचे प्रमाण हे वेगवेगळे ठेवावे लागते.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
सकाळ नाशिक आवृत्तीत मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजी प्रकाशीत झालेला लेख..
संदीप चव्हाण. गच्चीवरची बाग. नाशिक
9850569644 / 8087475242
You must be logged in to post a comment.