How to Care all time of Mango tree?
घर, बंगला असो वा अपार्टमेंट येथे जागा उपलब्ध असेल तर हमखास आंब्याचे व नारळाचे झाड हे लागवड केले जाते. आंबा व नारळ हे झाड हे स्वतःच्या बळावर सुरवातीला छान फळे देतात. रोग प्रतिकार शक्ती असल्यामुळे रोग, किडीपासून दूर सुध्दा राहते. जसा जसा आंबा व नारळाचे झाड वयस्कर होऊ लागते तसे तसे तो विविध रोगांना, किडींना, आजारांना बळी पडतो. याची काळजी कशी घ्यावयाची या बद्दलचा लेख प्रपंच…
आंबा हा कलमी असेल तर त्याचे सुरवातीला चार वर्ष मोहोर आला तरी त्याचे फळ काढून टाकावे. फळ धरल्यास झाडाचे खोड हे मजबूत होत नाही. झाडांचे खोड हे अन्न संग्रहीत करण्याचे काम करत असते. त्यामुळे त्याची वाढ, आकार कसा वाढेल याची काळजी घेणे हे सर्वात महत्वाचे असते. त्यामुळे आंब्याची दरवर्षी कंटीग करावी म्हणजे त्याचा फांद्याचा पसारा, वाढ ही नियंत्रीत होते पर्यायाने त्याचे अन्नसाठा करण्यासाठी खोडाचा आकार वाढू लागतो. (पुढे वाचा)
नारळाचा झाडात विविध प्रकार आहेत. सध्या सिंगापूरी जातीचे बुटके झाड असते. यास पाच सहा वर्षात नारळे येतात. योग्य वयात यास मोहर येतो पण नारळ पकडेले जात नाही. नारळ पकडले तरी विविध अवस्थेत ते गळू लागतात.
एकदा का आंबे व नारळा या झाडांना फळे येऊ लागली की त्यांना पुढील प्रमाणे खते व फवारणी करावी. पावसाळ्यात केवळ लेंडी खत, शेणखत टाकावे. लेंडी खत हे उष्ण असते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे त्याचा अर्क हा मुळा पर्यंत सर्वदूर पोहचतो. व त्याचा खाद्यान्न म्हणून त्यास पोषण मिळते.
नारळाला व आंब्याला कधीही उकीरड्यावरचे शेणखत वापरू नये. शेणखत वापरावयाचे असल्यास पुढील दुव्यावरील माहितीप्रमाणे तयार झालेलेच शेणखत वापरावे. शेणखता बद्द्लचा लेख सविस्तर लेख या दुव्यावर वाचा.. कारण उकीरडयावरील शेणखतात हुमणी अळीचे अस्तित्व असते. ही अळी खोडकीडा म्हणूनही ओळखली जाते. ती भल्या मोठ्या झाडांच्या खोडाला लागली तर झाड सात दिवसात सुकवू शकते. त्यामुळे नेहमी लेंडीखत वापरावे. (पुढे वाचा)
तसेच दर महिण्याला आंब्याला व नारळाला निबोंळी पेंड, तंबाखू डस्ट वापरावी. खोड कीडा असल्यास नियंत्रीत होते. इतर वेळेस द्रव्य खत म्हणून जिवामृताचा वापर करावा. दरमहिण्यास ५ लिटर वापरावे. जिवामृतात पोषणमुल्य असल्यामुळे झाडांची वाढ, फुटवा, पर्यायाने फळांची संख्या, आकार व गोडी वाढण्यास मदत होते.
आंबा कितीही जूना असला व त्यास फळधारणा होत असल्यास कधीही १०० टक्के छाटणी करू नये. छाटणी ही दरवर्षी २५ टक्केच करावी. कारण जेथे छाटणी होते तेथे आंबा एक वर्ष लागत नाही. त्यामुळे २५ टक्के छाटणी केल्यास किमान ७५ टक्के तरी फळ दरवर्षी मिळते. असे २५-२५ टक्के प्रमाणे छाटणीचे वर्तुळ चालू ठेवावे. छाटणी ही पावसाच्या पंधरा दिवस आधी करावी. आंबा नारळ ही झाडे चार वर्षाच्या पुढे असेल तर नारळ व आंब्याला जून पासून ते फेब्रुवारी पर्यंत पाणी देवू नये. निसर्गतः मिळाले तर हरकत नाही. कैरी सुपारी एवढी झाली की त्यास पोषणासाठी पाणी सुरू करावे. त्यानंतर आंबा उतरवल्यानंतर पाणी देवू नये.
आंब्याच्या खोडाला दिवाळीत चूना व गेरूचे पट्टे द्यावेत. त्यामुळे कीड नियंत्रणास मदत होते. खोडाचे आयुष्य वाढते. तसेच रंग देतांना पिस्त्याच्या टरफलासारखे किडीचे सुरक्षा कवच असते. ते विळ्याने खरडून काढावे. त्यात हिरव्या रंगाची काटेरी गुल्या (अळी) असते. त्यास स्पर्श झाल्यास प्रचंड खाज येते. त्यामुळे हे काम सावकाश व सावधानतेने करावे. तसेच या किडी पानावर पसरल्या असल्यास त्यास वेचून चेचून टाकाव्यात. उंचावर असल्यास लसूण, मिरची, तंबाखूचे पाणी फवारावे. म्हणजे कीडीचा नायनाट होतो. (पुढे वाचा)
बरेचदा गेरू चूना न लावल्यामुळे किंवा आंब्याकडे दुर्लक्ष झाल्यास आंब्याला भूरूड ही कीड लागण्याची शक्यता असते. ही कीड खोड, फांद्याच्या आतील गाभा पोखरण्याचे काम करते. बरेचदा वरच्या सालीला तडे, चिरे गेलेले काळपट, तेलकट चिरा दिसतात. व एकाद्या जागेवर शेणासारखा चुरा पडलेला दिसतो. अशा वेळेस विळ्याने सालीचा भाग खरडून काढावा. जिथे फांदीच्या वा खोडाच्या गाभ्याला खोल खड्डा दिसल्यास अशा वेळेस सायकलच्या स्पोकने त्यास मधे वारंवार टोचावे. म्हणजे त्याने आतील किड ही मरून जाते. पण बरेचदा कीड जिवंत राहण्याची शक्यता असते. अशा वेळेस खोल खड्डयातील भूसा काढू घ्यावा त्यात इंजेक्शने पेट्रोलने भरावे व त्यावर मातीचा लेप द्यावा. पेट्रोलच्या वासाने कीड मरून जाते. कीडचा भूसा टाकण्याचे प्रमाण बंद झाल्यास कीड मेली आहे असे समजावे.
नारळ व आंब्याच्या आवतीभोवती पावसाच्या अगोदर छान खोदून घ्यावे. म्हणजे मुळाना प्राणवायू मिळतो. हवा खेळती असल्यामुळे कीड नियंत्रण होण्यास मदत होते व खोडाचे आयुष्य वाढते. झाडांना पाणी हे आळ करून कधीच देवू नये. ते दोन झाडांच्या मधे द्यावे. कारण अन्न मुळ्या या खोडापासून दूर असतात. (पुढे वाचा)
शक्य झाल्यास आंब्यांना ०.५ एच पी मोटरने फवारणी करावी.ही फवारणी जिवामृताची असल्यास उत्तम… त्यामुळे आंब्यावर येणारी फंगल कीड नियंत्रीत होते. तसेच अन्न बनण्याची प्रक्रिया जलद होते. आंब्याचे आरोग्य उत्तम राखता येते फवारणी ही आंबा उतरवल्यानंतर तसेच छाटणी झाल्यानंतर सुरू करावी व ती मोहोर येईपर्यंत करावी. मोहोर लागला की फवारणी बंद करावी. नारळाच्या झाडाला इंजेक्शन देऊ नये. हे फसवे असतात. त्याचा काहीही उपयोग होत नाही.
वरील Practices या गेल्या तीन वर्षापासून आम्ही एका बंगल्यातील पाच आंब्यासाठी करत आहोत. आता त्याचा सकारात्मक परिणाम येवू लागला आहे. फळांचा आकार, संख्या वाढते आहे.
नारळाच्या झाडाला इंजेक्शन देऊ नये. हे फसवे असतात. त्याचा काहीही उपयोग होत नाही.
लेख आवडल्यास लेखाखाली कंमेंटस, लाईक व follow-up, Share करायला विसरू नका.
संदीप चव्हाण, नाशिक.
9850569644/ 8087475242
http://www.gacchivarchibaug.in
*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644
[…] […]