sparrow

चिमणीचे घर असावे अंगणी...

रसायन मुक्त भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे कीड ही आलीच. आणि त्या मागोमाग त्यांचे नियंत्रण हे आलेच. मुळातच कोणतीही रासायनिक फवारणी न करता म्हणजे जैविक औषधींची फवारणी करणे म्हणजे जैवविवधतेला आपण आमंत्रित करतो. किंबहुना किड येणे हे खरं तर रसायनमुक्त बागेचे लक्षण आहे. अशा बागेतून पिकलेला भाजीपाला हाच खर्या अर्थाने आरोग्यदायी असतो. अशा बागेचे काटेकोर पणे फवारणी, खत, पाणी यांचे नियोजन केले तर कीड ही दूरच राहते. तरी सुध्दा कीड आलीच तर काही उपाय हे करावे लागतात. अनेक उपाय आहेत. हे उपाय म्हणजे रामबाण नसले तरी त्यातून बर्याचं अंशी कीड नियंत्रण साधता येते. यातील एक महत्वाचा उपाय म्हणजे चिमणीचे घरटे…

बाग फुलवतांना आपल्या बागेत चिमणीचे घरटे असणे फार आवश्यक आहे. कारण चिमणी हा पक्षी इतर पक्षांपेक्षा मानव वस्तीला राहणारा किंबहुना माणसाळलेला आहे. एकदा का चिमणी आपल्या बागेत नांदू लागली की ती इतर पक्षांनाही आंमत्रीत करते. उदाः शिंपी पक्षी, बुलबुल.

हे पक्षी आपले मित्रच असतात. पण बागेचेही मित्र असतात. पक्षाचे मुख्य अन्न म्हणजे अळ्या. बागेत अळ्या झाल्यातर त्या टिपणे हे त्यांचे मुख्य अन्न…. थोडक्यात त्यांचेसाठी मासांहरी व प्रोटीन्सयुक्त चविष्ठ भोजन…

बघा ना.. पावसाळ्यात अन्नाची मुबलकता असते. म्हणजे पावसाळा हा सर्वच जिवांसाठी प्रजननाचा काळ, कारण त्या काळातच सर्वत्र व मुबलक निसर्ग अन्न तयार करतो. झाड, वनस्पतीनां बहार येतो. त्यातील कवळी पाने हे अळ्याचे अन्न. अळ्या हे पक्षाचे अन्न म्हणून पक्षांच्या प्रजननाचा सुध्दा हाच काळ असतो.

सिमेंटच्या जंगलात चिमण्याची संख्या कमी होत चाललीय. कारण सिमेंट काही अन्न नाही, ना निवारा. पण याच सिमेंटच्या भिंती, आसरा हा त्यांच्यासाठी अधिवास, निवारा होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला प्लायवूडची, पृष्ठ्याची घरे तयार करता येतात. बरीच मंडळी प्लास्टिकची घरटी तयार करतात. कृपया प्लास्टिकची घरटी तयार करू नका. त्यात उकडते. शिवाय तो रंग त्यांना आवडत नाही. त्यांना मातीचा, लाकडाचा रंग आवडतो. म्हणून रंगीत, छापिल पृष्ठ्याची खोकी वापरू नयेत.

बरेचदा लोक प्लायवूडची घरे तयार करतात पण चिमणी आतमधे जाण्याचा दरवाजा हा मोठा ठेवतात. लक्षात घ्या मोठा दरवाजा हा इतर पक्षांनाही प्रवेश देवू शकतो त्यामुळे अशी घरे चिमण्या नाकारतात. त्यामुळे त्यांचे प्रवेशव्दार हे दीड बाय दीड इंचाचे असावे.

चिमणीचे घर टांगतांना हे पावसाचे पाणी लागणार नाही अशा ठिकाणी टांगावे तसेच त्याच्या समोरील बाजू मोकळी असावी. तेथे कोणताही टप्पा नसावा. नाहीतर इतर पक्षी, मांजर तेथे जावून त्यांना असुरक्षीतता निर्माण करू शकतात. नव्याने घरटे लावतांना त्याच्या आजूबाजूला सुतळीचे तोडे ठेवावेत. त्याचे धागे पिंजून ते पिल्लांसाठी उब मिळावी म्हणून गादीसाठी वापरतता.  शक्य झाल्यास बागेत, घराभोवती पाळणे तयार करावेत. बोटाएवढ्या जाडीच्या सहा इंच लांब काठीला केवळ दोन दोर्या बांधाव्यात, त्या भक्कमपण टांगून द्यावात. यावर छान पणे ते झोके घेत संसाराची गाणी म्हणतात.

एक लक्षात आपल्या बागेत चिमण्यांना, पक्ष्यांना बोलावयाचे असेल तर त्यांच्यासाठी फेब्रवारी पासून पाण्याची व्यवस्था करावी. आणि मे महिना व जूनच्या शेवाटपर्यंत त्यांना दाण्याची व्यवस्था करावी. कारण या दिवसात त्यांना बाहेर कुठेही अन्न मिळत नाही. त्यांनतर पावासाळ्यात बाग फुलतेच. शक्य झाल्यास बागेत बाजरी, ज्वारीची दाणे पेरावीत. त्याला आलेल्या कणसांवर त्यांना नाचत गात ताव मारता येतो.

टांगले घरटे आणि आल्या चिमण्या असे होत नाही. चिमणी हा पक्षी जोडीने नव्या घराभोवती पाच ते बारा महिणे या निरिक्षण करतात. कोण येते कोण जाते. हे तपासून पाहतात. मगच त्याची जोडी पिल्लांना जन्म देण्याचे ठरवते.

आपल्या बागेत, घराभोवती पक्षांची बाळंतपण होतांना व त्यांचे संगोपन करतांना खूप आनंद वाटतो. हा घास चिऊचा, हा घास कावूचा.. ही आठवण आपल्या बालपणाची स्मृती ताज्या करतात.

आमच्या कडे चिमणीचे प्लायवूडची घरटी विकत मिळतात. आपण पूर्व नोंदणी केल्यास अधिक प्रमाणात तयार करू ठेवता येतील.

टीपः लेख आवडल्यास लेखा प्रती आपण एच्छिक आर्थिक योगदान करू शकता. phone pay 9850569644

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.