बागेत फळभाज्या घेणे खूप काही अवघड नाही. पण ते तंत्रशुध्द पध्दतीने केले तरच. भाजीला चव आणणारा, सलाड मधे वापरला जाणार टोमॅटो हा आंबट गोड फळ सर्वांचेच आवडते. आम्ही तर लहाणपणी त्यावर साखर टाकून खायचो. ऊर्जेचा डबल डोस मिळायचा. घरी पिकवलेले टोमॅटो हे चवदार व पातळ सालीचे असतात. बाजारातील टोमॅटो बहूदा जाड सालीचेच असतात. बेचव, पाणचट पण असतात.
टोमॅटो हे भरपूर प्रमाणात येणारे पिक आहे. वाफे पध्दतीत याची वाढ व उत्पादन ही भरपूर प्रमाणात येते. बियाणे चांगले असल्यास टोमॅटोचे घड लागतात.पण बहुतेकदा ते झाडावरच पिकण्यापूर्वी सडतात. काळे पडतात. याची काही कारणं पुढील प्रमाणे आहेत. ही प्राधान्यक्रमाने त्याची कारण शोधून त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे असते. याचे कारण म्हणजे टोमॅटो सडण्याची जी काही विविध कारणे आहेत त्यातील कारणे शोधले नाही तर हाताशी आलेले टोमॅटो वाया जातात.


१) टोमॅटोचे रोपास पाणी निचरा होणारी जागा लागते. अधिकच्या पाणी देण्याने किंवा सततच्या पावसाने घडाने लगडलेली फळे सडू लागतात. अशा वेळेस रोपाभोवतालची मातीस वरचेवर उकरी करणे फार गरजेचे असते. या रोपास पाण्याचा ताण दिला तरी चालतो.
२) ज्याबागेत हवा खेळती राहत नाही त्याठिकाणी फळे सडल्याची लक्षात आले आहे. त्यामुळे आपल्या बागेत हवा खेळती कशी राहिल याची उपाय योजना करणे फार गरजेचे आहे.
३) टोमॅटोला योग्य ठिकाणी, योग्य वेळेस आधाराची फार गरज असते. ज्या ठिकाणी रोपास टोमॅटो येतात. त्या ठिकाणी वेळीच झाडाच्या खोडास इजा न करता भक्कम आधार द्यावा म्हणजे टोमॅटो आकाराने वाढतात. तसेच सडून गळत नाहीत.
४) टोमॅटो सडताहेत असे लक्षात आल्यास त्वरीत मोठ्या कच्च्या टोमॅटोची तोडणी करून भाजी करावी. म्हणजे पिकण्याची वाट पाहू नये.

५ ) Calcium Deficiency म्हणजे कॅल्शीयमच्या अभावामुळे सुध्दा टोमॅटो सडतात. कारण पावसात मातीतील घटक वाहून जातात. अशा वेळेस पानटपरीवर मिळणारी एक चुना पुडी (१रू) तीन लिटर पाण्यात मिक्स करावी व  गरजेप्रमाणे तीन चार दिवस द्यावे.

६) सततच्या पावासामुळे जमीन कडक, घट्ट झाली असल्यास त्यात हवा खेळती करण्यासाठी उकरी करून घ्यावी म्हणजे तळाशी असलेला अतिरिक्त ओलावा कमी होईल व पाण्यामुळे सडणारे टोमॅटो सडणार नाहीत. 


आपल्याला लेख आवडल्यास नक्की कळवा. आमचे संकेतस्थळ Follow करा. आपल्यास उपयुक्त वाटल्यास आपण लेखा प्रती आपले आर्थिक सहाय्य करू शकता. Phone Pay 9850569644
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक