टोमॅटो हे खालील बाजूने काळपट वा सडतात ?


बागेत फळभाज्या घेणे खूप काही अवघड नाही. पण ते तंत्रशुध्द पध्दतीने केले तरच. भाजीला चव आणणारा, सलाड मधे वापरला जाणार टोमॅटो हा आंबट गोड फळ सर्वांचेच आवडते. आम्ही तर लहाणपणी त्यावर साखर टाकून खायचो. ऊर्जेचा डबल डोस मिळायचा. घरी पिकवलेले टोमॅटो हे चवदार व पातळ सालीचे असतात. बाजारातील टोमॅटो बहूदा जाड सालीचेच असतात. बेचव, पाणचट पण असतात.
टोमॅटो हे भरपूर प्रमाणात येणारे पिक आहे. वाफे पध्दतीत याची वाढ व उत्पादन ही भरपूर प्रमाणात येते. बियाणे चांगले असल्यास टोमॅटोचे घड लागतात.पण बहुतेकदा ते झाडावरच पिकण्यापूर्वी सडतात. काळे पडतात. याची काही कारणं पुढील प्रमाणे आहेत. ही प्राधान्यक्रमाने त्याची कारण शोधून त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे असते. याचे कारण म्हणजे टोमॅटो सडण्याची जी काही विविध कारणे आहेत त्यातील कारणे शोधले नाही तर हाताशी आलेले टोमॅटो वाया जातात.


१) टोमॅटोचे रोपास पाणी निचरा होणारी जागा लागते. अधिकच्या पाणी देण्याने किंवा सततच्या पावसाने घडाने लगडलेली फळे सडू लागतात. अशा वेळेस रोपाभोवतालची मातीस वरचेवर उकरी करणे फार गरजेचे असते. या रोपास पाण्याचा ताण दिला तरी चालतो.
२) ज्याबागेत हवा खेळती राहत नाही त्याठिकाणी फळे सडल्याची लक्षात आले आहे. त्यामुळे आपल्या बागेत हवा खेळती कशी राहिल याची उपाय योजना करणे फार गरजेचे आहे.
३) टोमॅटोला योग्य ठिकाणी, योग्य वेळेस आधाराची फार गरज असते. ज्या ठिकाणी रोपास टोमॅटो येतात. त्या ठिकाणी वेळीच झाडाच्या खोडास इजा न करता भक्कम आधार द्यावा म्हणजे टोमॅटो आकाराने वाढतात. तसेच सडून गळत नाहीत.
४) टोमॅटो सडताहेत असे लक्षात आल्यास त्वरीत मोठ्या कच्च्या टोमॅटोची तोडणी करून भाजी करावी. म्हणजे पिकण्याची वाट पाहू नये.

५ ) Calcium Deficiency म्हणजे कॅल्शीयमच्या अभावामुळे सुध्दा टोमॅटो सडतात. कारण पावसात मातीतील घटक वाहून जातात. अशा वेळेस पानटपरीवर मिळणारी एक चुना पुडी (१रू) तीन लिटर पाण्यात मिक्स करावी व  गरजेप्रमाणे तीन चार दिवस द्यावे.

६) सततच्या पावासामुळे जमीन कडक, घट्ट झाली असल्यास त्यात हवा खेळती करण्यासाठी उकरी करून घ्यावी म्हणजे तळाशी असलेला अतिरिक्त ओलावा कमी होईल व पाण्यामुळे सडणारे टोमॅटो सडणार नाहीत. 


आपल्याला लेख आवडल्यास नक्की कळवा. आमचे संकेतस्थळ Follow करा. आपल्यास उपयुक्त वाटल्यास आपण लेखा प्रती आपले आर्थिक सहाय्य करू शकता. Phone Pay 9850569644
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

घरपरिसरात, घरच्या छतावर पपया कशा पिकवाव्यात ?


पपई लागवड

पपई ही फळझाड आहे. फळझाड असले तरी हंगामी आहे. म्हणजे त्याचे वय दीड –दोन वर्ष असते. तसेच जगवली तर ती उंच उंच होत तीचे फळे लहान लहान होत जातात. या झाडांची मुळे ही दुधाळ असतात. वड पिपंळासारखी आक्रमक नसतात. तसेच आंबे व नारळासारखी पसारा वाढवणारी नसतात. त्याचे खोड हे मऊ असल्यामुळे त्यास कधीही काढून टाकणेही सोपे असते. पण शक्यतो पपई उपयोगाची नसली तरी त्यास आपणहून कधीही काढू नये. कारण तिच्या दुधाळ गुणधर्मामुळे जमानीतील विशिष्ट घटक विलगीकरणास मदत करतात. व ती इतर झाडांना पोषकतेस मदत करतात. बरेचदा नर पपई असल्यास लोक त्यास निरुपयोगी समजून ती काढून टाकतात. पण तसे करू नये कारण नर पपई मुळे मादी पपईच्या फुंलासोबत परागीभवन झाल्यातरच पपया येतात म्हणजे आपल्याकडे नर पपई असल्यास परिसरातल्या पपईस फळे येतात नर पपईस प्रत्येक पानाच्या देठाजवळ फुलांचा गुच्छ येतो तर मादी पपई ही एकच कळी येते.

घराच्या, बंगल्याच्या, शाळेच्या, आवारात किंबहूना गच्चीवरसुध्दा नऊ इंच वाफेच्या उंचीत ही झाडे जगवू शकतात. त्यास फळेही मिळतात. पपईच्या फळांतून मिळणारे जिवनसत्व ही डोळ्यांसाठी फार महत्वाची असतात. कमी श्रमात व कमी देखभाल केल्यास आपल्याला भरपूर पपया मिळतात.

बाजारातून आणलेल्या पपईमधे भरपूर बिया असल्यास त्या बियापांसून पपईची लागवड केल्यास त्यास हमखास पपया येतात. तर ज्या पपई मधे कमी बियाणं असतं. त्यापासून पपयांच्या झाडांन पपया येणे जर अवघड असते.

तर अशा भरपूर आलेल्या बिया.. सावलीत वाळवाव्यात. त्यानंतर त्याची रोपे तयार करावीत.  त्यास पूर्नलागवड करता येते. किंवा बिया फेकून जागेवरच उगललेली पपईला पण पपया येतात.

पपईला आजार होतात. उदाः पपईची पाने ही आखडतात. किंवा चिरल्यासारखी होतात. पपईच्या झाडाला पांढरा मावा हा जास्त लागतो. याची कारणे म्हणजे पपईच्या मुळांना अधिक पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे हे आजार होतात. पपईचे झाडं हे तीन चार महिण्याचे होईपर्यंत अगदी कमी पाणी द्यावे. त्याचा बुंधा हा मनगटाएवढा जाड झाला की त्यास पाणी देणे बंद करावे. नैसर्गिक पाण्यापासून तसे फार आजार होत नाही. बरेचदा ईमारतीचे डेब्रिजची भर टाकलेल्या जागेवर पपई वाढत नाही. वाढली तरी तिला पाण्याचा संसर्ग होऊन झाड संपून जाते.

पपईच्या झाडांना दूरवर पाणी द्यावे. जिवामृताचा वापर केल्यास पपया हा पाच पाच किलोच्या होतात.

नैसर्गिक पध्दतीने वाढवलेली पपईच्या पानांचा रस हा शरिरातील पांढर्या पेशी वाढीसाठी सेवन केला जातो.पपईला पाण्याचा निचरा होणारी मुरमाड जमीन चालते. तसेच काळी जमीन पण चालते पण पाण्याचे योग्य नियोजन करावे लागते.

लेख ःवाचा उंच पपईच्या पपई काढण्याची सोपी पधद्त..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग,नाशिक.

Fruits in terrace Garden


OLYMPUS DIGITAL CAMERA
अंजीराचे झाड

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Fruits फळझाडे… 

गच्चीवर कमी जागेत फळझाडे लागवड करता येतात. त्यामधे पपई, आंबा, पेरू, सफेद जांभूळ, लिंबू, शेवगा, हादगा, लोणीफळ ( अव्हाकॅडो) ऊस, अंजीर यासारखी फळझाडांची लागवड करता येते. आम्ही प्लास्टिक ड्रम पेक्षा विटांचा हौद करून त्त्यात कमी मातीत लागवड करतो. ही झाडे डोक्याएवढीच वाढतात. योग्य ति काळजी घेतली तर भरपूर विषमुक्त फळे मिळतात. ज्याने आपले आरोग्य चांगले राहते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 

 

How to Harvest Almonds seeds

Almonds seeds

1060836_750758694956677_1130507999_nबदाम हे वेगाने वाढणारे झाडं आहे. त्याला तसे कमी पाणी लागते. तसेच त्यांचा पर्णसंभार हा अधिक असतो. त्यामुळे त्याची सावली उन्हाळ्यात खूप अल्हादायक असते. रस्त्याच्या कडेला, शेतात, घराभोवती,  मुख्यतः बंगल्या भोवती ही झाडे आवर्जून लावली जातात. हेतू हाच असतो.की त्यापासून सावली व बदाम मिळतील.

झाड हे उत्तम वाणाचे असेल तर तीन वर्षात त्याची पूर्ण वाढ होऊन त्यास बदाम लागतात. त्याच्या वाणानुसार बदाम हे भरीव, पोचट  मिळतात. बाजारात मिळणारे बदामबी व घरच्या झाडाच्या बदाम बी मधे खूप फरक असतो. बाजारातील बदाम आकाराने मोठे असतात. पण घरचे बदाम बी हे आकाराने लहान असले तर चवीला अप्रतिम असते. बदामाचे बीला टणक कवच असते. म्हणून बदाम हे बी हा मनुष्यच फोडून खाऊ शकतो. कोणताही पक्षी, माकड अजून फोडून खालेले ऐकीवात नाही. माकडांनी प्रयत्न केला तरी दोन बोटांच्या चिमटीत पकडून दगडाने फोडणे म्हणजे दिव्य कर्म… हे माणसालाच फार जपून करावे लागते. तर मर्कटाची काय मजाल…

तर बदाम बी कसे मिळावावे हे मी पुढे सांगणार आहेच. त्या आधी. बदाम बी मिळो ना मिळो पण ही फळे पिकल्यावर आबंट गोड लागतात. पिकलेली फळे पक्षी खातात. तसेच स्वच्छ करून शक्यतो माणूस प्राण्याने फांदीवरील फळे तोडून, स्वच्छ करून खावेत. बदाम फळाला व बी ला कधीही कीड लागत नाही.

छाटणीः  हे झाडांची वाढ मर्यादीत ठेवणे गरजेचे असते. कारण झपाट्याने वाढणारे, फांद्याचा पसारा वाढवणारे हे झाडं असते. तसेच ठिसूळ असते. त्यावर झोका बांधणे, चढणे हे जोखमीचे काम असते. तर त्याला वर्षातून एकदा नक्कीच त्याची छाटणी करावी.

रोगः बदामावर पांढरी माशी, व्हाईट फ्लाय या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा दाट संभव असतो. बदामाची सावली ही दाट असते. त्याची पाणी दाटीवाटीने वाढतात त्यामुळे हवा खेळती राहत नाही. तसेच त्याला अधिक पाणी दिले गेले तर  या तीन कारणामुळे पांढर्या माशीचा प्रार्दुभाव वाढतो. त्यातून चिकट, तेलकट द्रव्य पसरून मृत कीडीच्या सडण्याचा दुर्गंध पसरतो. पण घाबरून जावू नका. वर्षातून एकदा योग्य छाटणी, झाड वाढीस लागल्यावर पाणी न देणं, पाण्याने अंगोळ घातल्यास ही कीड निंयत्रणात ठेवता येते.

पानगळः पानगळीच्या दिवसात खूप पाने गळतात. बरं ही पानं मोठ मोठी लाल, हिरव्या रंगाची आकर्षक असतात. मुलायम असतात. अशा पानांचा कचरा पाहून काही लोकं कचर्याला घाबरतात. पण याचे कंपोस्ट छान व लवकर तयार होते.

बदाम कसे मिळवावेतः बरेचदा मानव प्राणी दोन बोटाच्या चिमंटीत पकडून नेमकेपणाने त्यावर हातोडी किंवा दगडाने बदाम फोडतो. असे ठेसलेले लालबुंद बदाम बरेचदा झाडांखाली पहायला मिळतात. पण यात बोटांना ईजा होण्याची शक्यता तर असतेच. तसेच बदाम बी सुध्दा आपल्या हाती येत नाही. बरेचदा त्याचा चुरा झालेला असतो.

काय करावे… पिकलेले बदाम फोडण्याचा प्रयत्न करू नये. कारण ओली बी आपल्या हाती लागत नाही. लागलीच तर तिला माती लागते. म्हणजे डोंगर फोडून उंदीर मिळणे असे होते. त्यासाठी बदाम हे एका कापडी पिशवीत महिनाभर वाळवावेत. जसे मिळतील तसे त्यात टाकत गेला तरी चालेल. एकदा बदाम वाळले की बागकामासाठी वापरली जाणारी धारदार कैची घ्यावी. बदामाच्या बरोबर मधे त्यास जोर देवून बदामाला तिरपा काप द्यावा. दोन तुकडे होतात. बरेचदा आतील बी सुकलेली असेल तर सहज बाहेर येते. काही निमओली असेल तर दाभण वा सुईने ते बाहेर काढता येतात. फक्त एक काळजी घ्यावी… बदाम कैची ने कापतांना खूप जोर द्यावा लागतो. त्यामुळे आपली बोट सांभाळावीत. पापणी लागण्याच्या आत अपघात होण्याचा दाट शक्यता असते.  मुलांना हे तंत्र शिकवू नये. मी हा प्रयोग गेल्या सातवर्षापासून आहे. नेहमी जपून करतो त्यामुळे अपघात झालेला नाही..

लेख आवडला तर नक्की शेअर, लाईक व पुढे पाठवा..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

 

 

How to Grow Banana in Garden


How to Grow Banana in Garden

शहरी परसबागेत केळी लागवड करणे सहज शक्य आहे. पुरेसे ऊन व चांगले वाण शक्यतो वेलची केळी असल्यास त्यास भरभरून केळी येतात. आज काल बाजारातील केळी ही कार्बाईडच्या रसायनात भिजवून येतात. त्यामुळे कच्ची केळी ईच्छीत शहरात पोहचली की ते अर्ध्या रात्रीत पिकतात. आधीच रसायनांचा मारा करून उत्पादित केळी रसायनात बुडवून पिकलेल्या केळ्याच्या सेवनाने कफ होण्याची दाट शक्यता असते. आम्ही गच्चीवरची बाग, नाशिक म्हणून काम करतांना परसबागेत केळीलागवड करून देतो. त्यास भरभरून फळे आल्याची लक्षात आली आहेत. तिही संपूर्णतः रसायन मुक्त पध्दतीने…

केळास पूर्णवेळ उन्हाची गरज असते पण पुरेसे असेल तरी केळी छान येतात. उदाः केळी या रोपास पूर्व पश्चिम या दिशेत.. म्हणजे दक्षीण उत्तर यातील दोन मजली ईमारती किंवा बंगल्याच्या मधल्या भागात लावली तरी केळी छान येतात. केळास नारळाची, किंवा इतर झाडांची सावली नको.

एकदा रोप रूजले की त्यास खालून फुटवे येतात. केळ फळांची चांगली वाढ व्हावी म्हणून फक्त आजूबाजूच्या इतर खूंट काढून टाकले जातात. हे चुकीचे आहे. जितके फूटवे येत आहेत तितके नैसर्गिक रित्या येवू द्यावेत. ते नैसर्गिक रित्या केळीच्या फळधारणा केलेल्या खांबास आधार देतात. तुम्ही निरीक्षण करा… ज्या खांबाला केळी लागली आहेत. व ते ज्या बाजूला झूकणार आहे किंवा तोल जावू शकतो अशा बाजूने केळीचे खुंट येण्यास सुरवात होते. ते भविष्यात त्याचा आधार होणार असतात. त्यामुळे आजूबाजूचे केळीचे खूंट आजीबात काढू नये…

योग्य ते पोषण झाल्यास किंवा मिळाल्यास केळीचा खांब जाड होतो. टोकाची पाने नेहमीपेक्षा पण लक्षात येतील एवढी मोठी झाल्यास त्यास केळफूल येणार आहे असे समजावे.  केळफूल जसे जसे फूलत जाते तसे तसे केळीचा खांबांचा तोल एकाबाजूला झुकू लागतो. अशा वेळेस त्यास केळफुलाजवळ व एक फूट खाली असा तारेचा, दोरीचा विरूध्द दिशेला ताण देवून आधार देवू शकतो. किंवा दोन बांबूची, बल्ल्यांची कैची करून त्यास आधार देता येतो. तसेच तार वापरतांना तिथे जूने जिन्स कापडाच्या बोळा  किंवा जून्या गार्डन पाईपमधे तार टाकावी. तार तशीच बांधल्यास केळ्याच्या खांबात जावून केळ खांब कापण्याची शक्यता असते.

केळीच्या खूटांची चांगली वाढ झाली व त्यास केळी लागत नसल्यास पाण्याचा ताण दयावा. पण एकदा का केळीच्या बेटातील एकाद्या केळीला केळी लागलीत कि भरपूर पाणी द्यावे. त्यामुळे केळ खुंटांची व केळांची चांगली वाढ होते.

केळीला निमपेंड व जिवामृताचा वापर करावा. महिण्यातून एकदा करावा. थंडीच्या दिवसात शेणखताचा वापर करावा.

आफ्रिकेत एक महिना वास्तव्यास होतो तेव्हा तिथे लोक केळीच्या सालासहित केळी खात होती. आपल्याकडेही खात होती. पण मुबलकतेमुळे किंवा अज्ञानामुळे म्हना आपल्याकडेही ति प्रथा बंद झाली असावी. आता तर कळाले तरी बाजारातील केळी सालासहित खावू नये… कारण त्यावर रसायनांचा मारा असतो. घरची केळी असल्यास सालासहित खाण्यास हरकत नाही.

नैसर्गिक व सेंद्रीय पध्दतीने वाढवलेली वेलची केळात बिया तयार होतात. त्याची पूर्नलागवड होते. केळीला राखेचा वापर करू नये. केळ जळते. तर केळीला महिण्यातून एकदा १ रू. चूना पुडी व पाच लिटर पाणी दिल्यास केळी लागण्यास सुरवात होते. घरची केळी असतील तर त्या पानांचा जेवणासाठी वापर करावा. काऱण नसतांना पूजा पाठेसाठी देवून झाडांचे नुकसान करून घेवू नये.

केळीचे पाने मोठी असल्यामुळे शहरात केळीच्या पानावर धुळ जास्त साचते. त्यामुळे अन्न तयार होण्यास पर्यायाने फळ लागवडीस उशीर होतो. अशा वेळेस केळीचे झाड स्वच्छ पाण्याने महिण्यातून स्वच्छ धुवावे.

महिण्यातून एकदा जिवामृत पाण्याची फवारणी जरूर करावी.

केळीचा लंगोर काढल्यानंतर केळीच्या खांबाचे अवशेषाचे बारिक तुकडे करून ते केळी भोवतीच टाकावे अथवा कंपोस्टीगं करून पुन्हा त्या झाडासं खत द्यावे म्हणजे अतिरिक्त खताची शोधाशोध करावी लागत नाही. शक्य झाल्यास त्याचे केळ फळाचे सालं सुध्दा त्या केळीला द्यावेत.

बरेचदा केळ लागल्यानंतर केळफूल हे लांबत जाते. सुरवातीली केळीच्या फण्या लागतात. नंतर लागत नाही. फक्त केळीचे फुलं पुढे पुढे उमलत व वाढत जाते . अशा वेळेस केळ फूल कापून टाकण्याची प्रथा आहे. कारण काय तर केळी पोसल्या जात नाही. हे चुकीचे आहे. मुळातच केळीला पुरेसे उन मिळत नसल्या कारणाने मोजकेच केळीच्या फणी योग्य रित्या पोसल्या जाव्यात म्हणून केळ पुढील केळीची धारणा करत नाही. व केळफूल लाबंवल्यामुळे केळीच्या आकारावर परिणाम होत नाही. उलट केळफूल तसेच ठेवल्यामुळे केळीचा आकार वाढल्याचे लक्षात आले आहे.

केळीचा पिळवी अथवा वाळलेली पाने खेचून काढून नये. ती बुंद्यापर्यंत चिरत येतात. त्यापेक्षा जेथ पर्यत वाळले आहे तेथे धारदार चाकू विळ्याने कापून घ्यावीत. केळात हवा खेळती असल्यास पांढरा, काळा मावा लागत नाही.

बरेचदा केळीचा कंद लागवड करतांना त्यास कुठे पाण्याचा संसर्ग झाल्यास त्याचा शेंडा हा संकुचित होतो पानं छोटी होतात. अशा वेळेस जमीनीपासून बुंधा एक फुटावर कापावा. लगेचच पाणी देवू नये. छान पाने फुटल्यावर त्याचे खत पाण्याचे लाड करावेत.

बरेचदा केळीचे चांगले वाण मिळाल्यास केळी भरपूर लागतात. अशा वेळेस केळांचे वेफर्स करून ठेवावीत. शिकरण करता येते. ( शिकरणासाठी प्लास्टिक बॅगेतील रासायनिक दूध वापरू नये) आईस्क्रीम तयार करता येते. ( याच्या रेसिपी यू ट्यूबवर मिळतात)

लंगोरातील एकादी केळी जरी पिवळी झाली कि लंगोर पिकण्यास मदत होते. अशा वेळेस त्यास सावधपणे उतरवून त्यास गोणपाटात लंवग ठेवून पिकवावीत. लगेच पिकतात पण आपल्याला सावकाश संपवायची असतील तर लंवग ठेवू नये.

बरेचदा वादळ, वावटळी मुळे केळीचे खांब तुटण्याची शक्यता असते अशा वेळेस वार्याच्या झोतापासून त्यास वाचवावे. अपरिपक्क केळी असतांनाच खांब तुटल्यास कच्ची खेळी फेकून देवू नयेत. तिसुध्दा गोणपाटात पिकतात. चव मात्र थोडी वेगळी लागते एवढेच. पण त्यास सेवन करता येते.

केळ फुलांची भांजी करता येते. वेळखाऊ असली तरी भाजी चविष्ट असते.

गच्चीवरची बाग संदीप चव्हाण, नाशिक.

8087475242