गच्चीवची बाग मार्च २०२२ मधे दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. केवळ एक संकल्पना डोक्यात आली. त्यावर कलेकलेने काम करत गेलो. आज गच्चीवरची भाजीपाल्याची बाग ही पाच विभागात जोमाने काम करत आहे. Grow, Guide, Build, Products Sale N Services… हे आमच्या कामाची पाच बोटे आहेत. ज्याने आम्ही निसर्गाच्या संवर्धनासोबत लोकांच्या, जमीनीच्या आरोग्याचं काम करत आहोत.

Videos

पण याची सुरूवात ही दैवाने आमच्या हातून खूप आधीच करून घेतली याचे फार मोठे अप्रुप वाटते. अर्थात त्याची सुरूवात ही २००१ पासूनच झाली होती. २००१ ते २०१३ पर्यंत शेती, शहरी शेती, कचरा व्यवस्थापन या विषयात माहिती, ज्ञान, अनुभव मिळत गेले व २०१३ या वर्षा गच्चीवरची बागेचा जन्म झाला.

२००१ ते २०१३ या एक बारा वर्षाच्या साधनेत अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. त्यातीलच एक देश म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील झिम्बाब्वे. २००५ या वर्षी या देशात परसबाग प्रकल्पासाठी एक महिना राहिलो. तेथील अनुभव तुम्हाला या लेखात सांगणार आहे.

अखंड दक्षिण आफ्रिका खंडाचे सार्वभौमत्व संपवून ब्रिटीशांनी या देशाचे तुकडे केले. अंत्यत गरीब देश. आपल्याकडे सेनसेक्सचा आलेख वर खाली होतो तेव्हां सोन्यांचे भाव कमी जास्त होतात. पण तिकडे पावाच्या लादीचे भाव कमी जास्त होतात. एवढा अर्थव्यवस्था ढासळेली आहे. काळा पैसा बोकाळलेला, भष्ट्राचार वाढलेला. तेथे २००५ पूर्वी खिशात पैसे घेवून गेले तर पिशवी भर साखर यायची. नि आता पिशवीभर पैसे घेवून गेले तर खिशात मावेल एवढी साखर येत नाही.  असो.

तेथे पैसा अर्थव्यवस्थेत फिरत नाही. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे ते घरीच ठेवतात. बॅंकेत ठेवत नाही. तेथे भारतीय व्यापारांबद्दल विशेष राग होता. कारण ही मंडळी तेथे गादीमधे पैसा भरून ठेवत असत.

तेथे परकीय चलन बदलवण्याचा अनूभव तर फारच सिनेस्टाईल आहे. आपल्याकडे परकीय चलन बदलावयाचे म्हणजे काही सुरक्षीत व मान्यता प्राप्त ठिकाणे असतात. तेथे मला एका गाडीत बसवून नेण्यात आले. गाडी एका गल्लीच्या कोपर्यात उभी केली. काचा बंद असलेल्या गाडीत एक माणूस आला. किती चेंज हवय म्हणून विचारले. पैसे बदलवण्यात आहे. कोणतीही पावती नाही, नोंद नाही. असा हा कारभार..

तेथे कुफुंडा नावाची सामाजिक संस्था होती. तेथेच राहण्याची व्यवस्था होती. झिम्बाब्वे या देशाची राजधानी हरारे. (जेथे क्रिकेटचे स्टेडियम आहे) या हरारे पासून ३५ कि.मी. अतंरावर हे ठिकाण होते.

आपल्याकडे पोलीओ निर्मुलनाची मोहीम चालवली जाते त्याप्रमाणे या देशात राष्ट्रीय स्तरावर कुपोषण निर्मलनासाठी परसबाग हा कार्यक्रम राबवला जातो. सध्या आपल्याकडे कागदोपत्री का होईना शालेय स्तरावर

तेथे पहाल तिकडे गवताळ प्रदेश. म्हणजे जंगल नष्ट झालेली. झाडंच नसल्यामुळे उपजिविकेचे कोणतेच साधन नाही. त्याच ब्रिटीशांची सत्ता. स्थानिक लोक गुलाम म्हणून तेथे राबत असत. कोणतेही शिक्षण नाही. पारंपरिक ज्ञानाचे कोणतेही वहन पुढच्या पिढीत झाले नाही. शेती कशी करायची याची माहिती नाही. जेव्हां. ब्रिटीश देश सोडून गेले तेव्हा तेथील स्थानिकांनी शेतीतील साधने विकून टाकली. नि कंगाल झाले. मका तिकडे पिकतो पण मक्याचा फक्त फॅक्टरीत पाव बनतो एवढेच माहित. आपल्याकडे मक्याचे किती पदार्थ होतात.

तेथील एका बाजारात गेलो होतो. तेव्हां माझी सुरक्षा व्हावी म्हणून मला एका गाडीतच बसून ठेवण्यात आले. कारण मारहाण करून लुबाडण्याची शक्यता होती. त्यांचा व माझा रंग सारखाच. फक्त चेहरेपट्टीत फरक होता. पण एक फरक विशेष होता. डोक्यावरचे केस. त्यांचे केस कुरळे होते. व माझे केस हे सरळ होते.

मी त्यांच्या डोक्याकडे कौतुकाने पहात असत तर ते माझ्याकडे संशयाने पाहत असत. 

तेथील संस्थेच्या व बाजूच्या गावातील लोकांसाठी पोषण आहराचा कार्यक्रम राबवला जात असे. तेथे परसबागेत भाजीपाला पिकवला जात असे, त्याचे दर आठवड्याला सामूहिक भोजन ठेवले जायचे. त्यांना परसबागा कशा फुलवायच्या याची माहिती व तेथे पिकलेल्या भाज्यांची चव दिली जायची. माझी शेतीतील आवड पाहून मला लग्नासाठी मुलगी व शेतजमीन देण्याची ऑफर आली होती. पण मला माझा देशच प्रिय होता किंवा गच्चीवरची बागच्या रूपात काम उभे रहावे अशी दैवाची ईच्छा असावी.

तेथे ड्राय टॉयलेटची संकल्पना होती. म्हणजे एक मजली उंचीच्या घराववर शौचास जायचे. तेथे मल व मूत्र वेगळे होणारे भांडे असे. तेथील मैला हा तळाशी (खालील खोलीत) पडत असे. कालांतराने त्याचे सोनखत तयार झालेले असे. त्याचा वापर परसबागेत केला जात असे. आपण भारतियांनी जगाला सोनखत शब्द दिला पण तो तेथे प्रत्यक्षात अबलंबला जातोय. भाज्या चवदार व भरभरून येत असे.

तेथील सामुहिक जेवणाच्या वेळेस लोक आपल्यासारखे समोरासमोर बसून खात नसतं. ते आपआपले अन्न ताट ओसंडून वाहून जाईल एवढे वाढून घेत व कुणाला दिसणार नाही अशा प्रकारे पाठ करून बका बका खात असत. गरिबीच तेवढी होती.

तेथे झाडे नसलेल्या गवताळ प्रदेशात एक वास्तू होती. आपल्याकडे पूर्वी गुरांसाठी कोडंवाडे असत. त्या प्रकारे गाव बसेल एवढा परिसरात गोलाकार भिंत बाधलेली होती. जंगली प्राण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून. अर्थात आपले पूर्वज अशा गावातून पुढे जगभर पसरली, येथेच राहत असावीत याची प्रचिती आली. आता तेथे केवळ स्मारक म्हणून घोषीत केले होते. त्याचा आकार, बांधणीची ठेवण प्राचिनच होती. पण दगडी बांधकाम अलिकडचे होते. त्यातील काही ताडाची झाडे तशीच संरक्षीत केलेली होती. तेथे मुतारे नावांचे गाव होते. वाचून गंमत वाटली होती.

तेथे लोक पोषण आहाराबद्दलचा राष्ट्रीय कार्यक्रम, तेथील तंत्र समजून घेण्यासाठी गेलो होतो. दैवाने ही संधी दिली. त्याचे संचित हे गच्चीवरच्या बागेच्या रूपात आज नाशिकमधे आकाराला आले.

आता एवढेच.. बाकी अनुभव पुढील लेखात…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.