Beyond Corona virus disease (COVID-19)
कोरोना … जसे जसे दिवस पुढे सरकाताहेत तसे तशी अनामिक भिती वाढत चाललीय. कुठे तोंड काढायची (दाखवायची) सोय राहिली नाही. कुणाच्या संपर्कात न येणे हाच एक खबरदारीचा उपाय आहे. पण ज्याची प्रतिकार शक्ती (जो बलवान असणार तोच जगेल हा तर निसर्गाचा नव्हे जंगलाचा नियम आहे) तो जगेल हे मात्र नक्की.
कोरोना विषाणू बदद्ल विचार करतो तेव्हा.. त्या विषयीचे अनेक पदर डोळ्यासमोर उलगडतात. प्रगतशील, वैज्ञानिक पध्दतीने व गतीने वेगाने बदल घडवून आणलेला माणूस प्राण्यासमोर केवळ ईश्वराला, निसर्ग देवतेला आर्त प्रार्थना करण्याशिवाय काही हातात उरलेले नाही. असे मला प्रकर्षाने जाणवते. इतकी हताश वेळ आपल्या सर्वावर आली आहे. युध्दस्थिती भासावी असे वातावरण तयार झाले आहे. आहे त्या परिस्थीतीला निपटून काढण्याची, त्याला सामोरे जायावयाची आपले शाश्त्रज्ञ, डॉक्टर मंडळी, लष्कर, समाजसेवक तयार आहेतच. पण ही वेळ माणसावर का यावी हाच खरा प्रश्न आहे.
सारा खेळ हा जिवाणू विषाणूंचा आहे. माणसाने सुरक्षीत वाटावे म्हणून अगदी उत्क्रांतीपासून त्याने पृथ्वीतलावरचे डोळ्यांना दिसेल ते हिंस्त्र प्राणी संपवत आणली. अगदी सुरक्षेचे टोक म्हणून त्याने माणसांच्या आक्रमक टोळ्यांचा नाश करत आला आहे. करत चालला आहे. पण हे सारे करतांना त्याने जिवाणू विषाणूंच्या जगताला कुठेही धक्का लावला नव्हता. या आधी महामारी, प्लेग सारखे साथीचे आजार आलेत, ते नंतर ओळखीचे होते,त्याची कारण सापडलीत. पण ती फक्त पुनर्रावृत्ती होती. त्यामुळे त्यावर मात करता आली. पण तो जसा प्रगत होत गेला, यांत्रीक होत गेला तेव्हा अनेक नवे आजार सामोरे येवू लागले आहे. कारण मानव प्राण्याने विकासाच्या, उपभोगाच्या, सुख, सुविधाच्या नावाखाली जिवाणू व विषाणूंच्या परिसंस्थेला लावलेला धक्का आहे. कारण जिवाणू व विषाणू हे अल्पायुषी असतात. प्राप्त प्रतिकुल अनुकुल परिस्थितीत स्वतःला ते सुप्तावस्थेत अथवा प्रगत बनवू शकतात. तसेच ते एकमेंकाना पुरक व नियंत्रीत करत असतात. तसेच हवेतील शुध्दता, त्यातील प्राणवायू, निसर्ग, या नुसार ते केवळ जन्म मृत्यू होत नसतो तर त्यात उत्क्रांत अवस्थे सोबत नव जिवाची निर्मीतीही असते. आत मूळ प्रश्न उरतो अशा विषाणूंना मारक, नियंत्रण करणारे असे जिवाणू नाहीतच का… नक्कीच असावेत. पण आपण ज्या पध्दतीने आजचे जीवन जगत आहोत त्यात आपण अगदी निरंक, अगदी निर्जंतूकपणे राहण्याचा, स्वच्छतेचा फोबीया घेवून जे जगत आहोत, वेगवेगळी रसायने वापरत आहोत. अगदी मातीतले गांडूळे संपवून टाकली. ज्या हाड नसलेल्या कोवळा जिवाला निसर्गाने स्टोन क्रशरची यंत्रणा बहाल केली आहे. तो जे जे खातो त्याची माती होते. त्यांच्या संपण्यानेही मातीतील विषाणूंचे अस्तित्व वाढले. त्यामुळे जिवाणूंच्या अभावामुळे म्हणा किंवा रसायनांच्या स्वभावामुळे मुळे विषाणूंना मारक असे जिवाणू संपवत चालले आहोत. माणसाची मातीशी नाळ तुटलीय. जंगल व निसर्गाशी नातं तुटलं. पंच महाभूतासोबत सहवास संपलाय. सकाळच्या सुर्योदयाची कोवळी किरण विसरलोत. पानाचा स्पर्श विसरलो, फुलांचा गंध विसरलोत. मातीचा स्वाद विसरलोय. तो शहरातील कुबट खोल्यात निवास करू लागलाय. असो… जगणं व जीवन शैली बदलावयाची गरज निर्माण झाली आहे हे मात्र नक्की…
आपल्याकडे या पूर्वीही महामारी येवून गेलीय. त्यावरही लोकांना मात केलीच होती ना… तेव्हा मात करण्याच्या काय पध्दती वापरल्या होत्या… याचा आपण विचारच करत नाही. जे जे उपाय आहेत ते केलेच पाहिडे. आज गोमुत्रावर टिका होतेय. पण गोमुत्र मासिक पाळीच्या काळात, लांब खोल्याच्या,कोंदट, कुंबट खोल्यात शिपडले जायचे. कारण ते विषाणूमारक होते म्हणूनच ना. मलाही गोमुत्राचा अनुभव आला की, बागेत कीड नियंत्रक म्हणून (नाशक नाही) गोमुत्र फवारणी केली तर आपली श्वसनप्रक्रीयेची खोली (डेप्थ) वाढते. खोल, गंभीर, भरपूर श्वास घ्यावसा वाटणे. यातच सारे काही आले. जिवामृत हे बागेत खत व की नियंत्रक म्हणून वापरतो. पण मेलेल्या उंदारावर, सडलेल्या कचर्यावर टाकली तर त्याचा दुर्गंध नाहीसा होता. एवढेच काय मुतार्यामधील अमोनियाचा गंध ही नाहिसा करण्याची ताकद त्यात आहे. अर्थात सबकुछ गोमुत्र असे मला म्हणावयाचे नाही. ( पूर्वीच्या शुध्दतेत व आजच्या शुध्दतेत प्रचंड फरक आहे. कारण केवळ खाणंच नाही तर त्याचा सहवास, निवास सारंच बदललय)
हजारो वर्षापासून माणूस शिकत आहे. अनुभवाचे ज्ञानात रूपांतर करत आहे. त्याचे अनुभव, ज्ञान हे पिढ्यान पिढ्या पुढे नेत गेले. पण गेल्या ६०-७० वर्षात जी काही शालेय शिक्षणातून विज्ञानाचा बाहू झाला. नव्या पिढीने मागील पिढ्यांच्या अनुभवाना, ज्ञानालाच नव्हे तर शहाणपणाला सरळ सरळ खोटे, चुकीचे ठरवले गेले. येथेच आपल्या (wisdom) शहाणपणाची गोची झालीय. ज्ञान मिळाले पण त्याचं समायोजन, त्याचा समनव्य जो साधला गेला पाहिजे होता ते दूर्दैवाने झाला नाही. गेला साठ सत्तर वर्षाचा काळ आहे मागील पिढ्याचे शहाणपण व नविन शिकलेल्या पिढ्याचे ज्ञान, विज्ञान याची गुफंन, सांगड घालता आली नाही. अर्थात सारेच बरोबर होते व सारेच चुकीचे होते हे दोन टोकांचे म्हणणे चुकीचे आहे. बंद घड्याळ ही दिवासातून दोन वेळेस बरोबर वेळ दाखवते हेही विसरून चालणार नाही. हे सारे नितांत समजून घेत पुढे गेले पाहिजे. सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून भारतीय संस्कृती कडे पाहिले जाते. पण मागील दोन तीन पिढ्यांच्या कालावधीत ते नामशेष झालय.
कोणताही अभ्यास करायचा नाही. इंस्टंट प्रतिक्रीया द्यायची. मत नोदवायचे. मग ते महापुरूष असो की आपले काही सण, रितीरिवाज असो. स्वांतत्र्य, आधुनिकता, प्रागतिक, पुरोगामी, धर्म, जातीच्या नावाखाली सारेच धोपटायचे.इतके उधळ कसे.. माझा मुलगा जेव्हा ईतर धर्माबद्दल, महापुरूषाबद्दल टोकांचे मत व्यक्त करतो. तेव्हा मी त्याला नेहमी सांगतो तू किती अभ्यास केला.. महात्मा गांधी बद्दल, नथुराम गोडसे बद्दल, आंबेडकराबद्दल, बुध्द- ईस्लाम, हिंदू धर्माबद्दल किती माहित आहे. याचा आधी अभ्यास कर, त्याचे दाखले शोध, त्याची कार्यकारण भाव शोध, ईतिहासाचा शोध घे. त्या त्या प्राप्त परीस्थितीत ते ते तेव्हा योग्य होते. असे उथळ बोलून प्रतिक्रीया देणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास होतो. कोणता प्रतंप्रधान चांगला, त्याला आरे कारे म्हणणे ही आपली लायकीच नाही… पहिल्यांदा तिथ पर्यंत पोहचता येते का… पोहचण्याची, बरोबरी करण्याची ताकद असेल तरच त्याबद्दल बोलता येईल. असो… हे फक्त माणूस प्राण्याच्य उथळ स्वरूपाचं उदाहरण आहे. जे आपण स्वतःच्या अनुभवावर थोडक्यात सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत असतो जो जिवनात सर्वत्र लागू पडतो.
देशी गायीला ३३ कोटी देव निवास करतात. देव ही संकल्पना मदत करणारी, उपकार करणारी, प्राण वाचवणारी असे आपण मानतो. तर थोड्या वेळासाठी देव म्हणजे जीव असा आपण लक्षात घेतला तर हे ३३ कोटी जीव (जिवाणू) निवास करतात. जे माणूसच नव्हे तर एकूण जल जंगल, जमीन, पशू, पक्षी यांना जगवणारे आहे.
मागे एक सत्यकथा वाचण्यात आली होती, अमेरिकेतीन कोणत्यातरी बेटावर असाच अनामिक आजार आला होता. त्या बेटावर ति लोक एका पाठोपाठ मरण पावली होती. त्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना फक्त एक बेटावरंच कुटुंब जिवंत राहिल्याचा लक्षात आलं. तपास व अभ्यासाअंती असे लक्षात आले की त्यांच्या किचनमधे कांदा चिरून ठेवला होता. त्यामुळे तेथे आजार पसरला नव्हता. कांदा हा सुक्ष्म जिवांना आकर्षीत करत असतो. त्या चिरलेल्या कांद्यावर त्या विशिष्ट विषाणूं आढळून आले होते.
या जगात कोणतेही सजिव प्राणी नाही राहिला तरी जिवाणू, विषाणूंची दुनिया कायम राहणार आहे. घडणार बिघडणार आहे. फक्त आपल्या हातात हेच आहे की हे किती बिघडवायचे किती घडवायचे.. किती विकासाच्या, आधुनिक, आरामच्या, श्रम शुन्य जगण्याच्या आहारी जायचे.
एक झेन कथा सांगतो. एक शिकला सवरलेला व्यक्ती एका गावात फिरायला जातो. तेथे त्याला एक व्यक्ती दुपारचे जेवण आटोपून मस्त झाडाच्या गार सावलीत निवांत झोपलेला असतो. हा पर्यटक त्याला काही शब्द सुनावतो. अरे झोपलास काय. काहीतरी काम कर, ज्ञान मिळव, उद्योग (उठाठेव) कर, पैसे कमव, विकएंड ला फिरायला जा, मस्त आराम कर. मग तो गावकरी म्हणाला तेच तर करतोय…
हा निवांतपणा आपल्या आयुष्यात आहे का? हा निवांतपणा तोही एकांतात अनुभवावा म्हणून कोरोना आपल्या सर्वाच्याच वाटेल्या आला आहे हे मात्र नक्की… त्या निमित्ताने का होईना… हा या धर्माचा, जातीचा, पक्षाचा. गरीब, श्रीमंत, स्त्री पुरूष, मित्र, शत्रु सारे सारे पाश गळून पडावेत, सर्वांनाच जगण्याच सुख वाटेला याव, नि माणूस म्हणून आपण पुढे जावे, हीच ईश्वर ( ते ही आपण वाटे पाडून घेतलेल्या) चरणी प्रार्थना करू शकतो.
सदर लेखातून कोणत्याही उपचार पध्दतीचा दावा करत नाही.. हे चिंतन आहे. विविधअंगाने विचार करण्याची, त्याची अंमलबजावणी करण्याची प्रत्येकात क्षमता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर पशू, पक्षी यांच्या वर्तनात काही बदल जाणवतोय का.. याचे निरिक्षण गरजेचे आहे. का हे फक्त माणसालाच भोवतय. ते माणासालाच भोवणार असेन तर नक्कीच आपलीच चुक आहे. चुकत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.
You must be logged in to post a comment.