बदाम हे वेगाने वाढणारे झाडं आहे. त्याला तसे कमी पाणी लागते. तसेच त्यांचा पर्णसंभार हा अधिक असतो. त्यामुळे त्याची सावली उन्हाळ्यात खूप अल्हादायक असते. रस्त्याच्या कडेला, शेतात, घराभोवती, मुख्यतः बंगल्या भोवती ही झाडे आवर्जून लावली जातात. हेतू हाच असतो.की त्यापासून सावली व बदाम मिळतील.
झाड हे उत्तम वाणाचे असेल तर तीन वर्षात त्याची पूर्ण वाढ होऊन त्यास बदाम लागतात. त्याच्या वाणानुसार बदाम हे भरीव, पोचट मिळतात. बाजारात मिळणारे बदामबी व घरच्या झाडाच्या बदाम बी मधे खूप फरक असतो. बाजारातील बदाम आकाराने मोठे असतात. पण घरचे बदाम बी हे आकाराने लहान असले तर चवीला अप्रतिम असते. बदामाचे बीला टणक कवच असते. म्हणून बदाम हे बी हा मनुष्यच फोडून खाऊ शकतो. कोणताही पक्षी, माकड अजून फोडून खालेले ऐकीवात नाही. माकडांनी प्रयत्न केला तरी दोन बोटांच्या चिमटीत पकडून दगडाने फोडणे म्हणजे दिव्य कर्म… हे माणसालाच फार जपून करावे लागते. तर मर्कटाची काय मजाल…
तर बदाम बी कसे मिळावावे हे मी पुढे सांगणार आहेच. त्या आधी. बदाम बी मिळो ना मिळो पण ही फळे पिकल्यावर आबंट गोड लागतात. पिकलेली फळे पक्षी खातात. तसेच स्वच्छ करून शक्यतो माणूस प्राण्याने फांदीवरील फळे तोडून, स्वच्छ करून खावेत. बदाम फळाला व बी ला कधीही कीड लागत नाही.
छाटणीः हे झाडांची वाढ मर्यादीत ठेवणे गरजेचे असते. कारण झपाट्याने वाढणारे, फांद्याचा पसारा वाढवणारे हे झाडं असते. तसेच ठिसूळ असते. त्यावर झोका बांधणे, चढणे हे जोखमीचे काम असते. तर त्याला वर्षातून एकदा नक्कीच त्याची छाटणी करावी.
रोगः बदामावर पांढरी माशी, व्हाईट फ्लाय या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा दाट संभव असतो. बदामाची सावली ही दाट असते. त्याची पाणी दाटीवाटीने वाढतात त्यामुळे हवा खेळती राहत नाही. तसेच त्याला अधिक पाणी दिले गेले तर या तीन कारणामुळे पांढर्या माशीचा प्रार्दुभाव वाढतो. त्यातून चिकट, तेलकट द्रव्य पसरून मृत कीडीच्या सडण्याचा दुर्गंध पसरतो. पण घाबरून जावू नका. वर्षातून एकदा योग्य छाटणी, झाड वाढीस लागल्यावर पाणी न देणं, पाण्याने अंगोळ घातल्यास ही कीड निंयत्रणात ठेवता येते.
पानगळः पानगळीच्या दिवसात खूप पाने गळतात. बरं ही पानं मोठ मोठी लाल, हिरव्या रंगाची आकर्षक असतात. मुलायम असतात. अशा पानांचा कचरा पाहून काही लोकं कचर्याला घाबरतात. पण याचे कंपोस्ट छान व लवकर तयार होते.
बदाम कसे मिळवावेतः बरेचदा मानव प्राणी दोन बोटाच्या चिमंटीत पकडून नेमकेपणाने त्यावर हातोडी किंवा दगडाने बदाम फोडतो. असे ठेसलेले लालबुंद बदाम बरेचदा झाडांखाली पहायला मिळतात. पण यात बोटांना ईजा होण्याची शक्यता तर असतेच. तसेच बदाम बी सुध्दा आपल्या हाती येत नाही. बरेचदा त्याचा चुरा झालेला असतो.
काय करावे… पिकलेले बदाम फोडण्याचा प्रयत्न करू नये. कारण ओली बी आपल्या हाती लागत नाही. लागलीच तर तिला माती लागते. म्हणजे डोंगर फोडून उंदीर मिळणे असे होते. त्यासाठी बदाम हे एका कापडी पिशवीत महिनाभर वाळवावेत. जसे मिळतील तसे त्यात टाकत गेला तरी चालेल. एकदा बदाम वाळले की बागकामासाठी वापरली जाणारी धारदार कैची घ्यावी. बदामाच्या बरोबर मधे त्यास जोर देवून बदामाला तिरपा काप द्यावा. दोन तुकडे होतात. बरेचदा आतील बी सुकलेली असेल तर सहज बाहेर येते. काही निमओली असेल तर दाभण वा सुईने ते बाहेर काढता येतात. फक्त एक काळजी घ्यावी… बदाम कैची ने कापतांना खूप जोर द्यावा लागतो. त्यामुळे आपली बोट सांभाळावीत. पापणी लागण्याच्या आत अपघात होण्याचा दाट शक्यता असते. मुलांना हे तंत्र शिकवू नये. मी हा प्रयोग गेल्या सातवर्षापासून आहे. नेहमी जपून करतो त्यामुळे अपघात झालेला नाही..
लेख आवडला तर नक्की शेअर, लाईक व पुढे पाठवा..
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.