आणी मी गाडी शिकलो…
गच्चीवरची बागेची संकल्पना शुन्यापासून सुरू झाली होती. शेतीच करायची म्हणून गावभर फिरलो. पण कुणी शेती करायला देईना.. विनोबा भावे, वर्धा येथील आश्रमाला भेट देवून आल्यामुळे शेती ही नैसर्गिक रित्याच करायाची व ती श्रम आधारीत असेन असेच ठरवले होते. एका ठिकाणी शेती मिळाली सुध्दा.. चर खोदायला, आळे करायला मेहनत सुरू केली. दिवस अखेर मालक म्हणाला अशी कधी शेती होते का… त्यांना टॅक्टर आणून नागंरटी वखरणी करणे अपेक्षीत होते. जागेचा नाद सोडला. पण शेती काही डोक्यातून जात नव्हती.. कचरा व्यवस्थापन व शहरी शेतीचे घरीच प्रयोग सुरू केले होते. त्यातून अनुभवावर आधारीत गच्चीवरची बाग पुस्तक लिहले. पुस्तक प्रकाशीत झाले. दिव्य मराठीतील श्री. हेमंत भोसले व संपादकाच्या सहाय्याने नाशिक येथे काही मोफत कार्यशाळा संपन्न झाल्या. स्पर्धाचे आयोजनातून लोकांपर्यंत पोहच वाढली. आता लोक घरी बोलावू लागले. त्याना सविस्तर सांगून पालापाचोळा, नारळ शेंड्या, उसाचे चिपाट गोळा करून ठेवा. मी सेटअप लावून देतो. पण ते यासाठी राजी असूनही त्यांना गोळा करणे शक्य नव्हते. आणि माझ्याकडे दुचाकी असल्यामुळे ओझे वाहणार किती.. चारचाकी पिकअप गाडी घेण्याचे ठरवले. महेंद्रा कंपनीव्दारे नुकतीच महेंद्रा जितो हे मॉडेल बाजारात आले होते. जावून चौकशी केली. बजेट अव्याक्याच्या बाहेर होते. डाऊन पेंमेंट परवडणारे नव्हते. एवढे पैसेच नव्हते. शेवटी तेथील सेल्स मॅनेजरच्या भरीला भुललो, गाडीची गरजही होतीच. बायकोचे सोने गहान टाकून डाऊन पेंमेंट भरले. गाडी घेतल्याचा आनंद झाला. गाडी त्यांनीच घरी पोहचवली. कारण गाडी चालवताच येत नव्हती. दुचाकी घरी आणली तेव्हाही गॅरेजवरच्या मित्राने ती आणून दिली होती. यात काय महत्वाचे तेच सांग… नि काय करायचे नाही ते सांग दोन गोष्टी समजून घेतल्या दुचाकी चालवायला शिकलो. खरा आत्मविश्वास वाहन परवाना मिळेल हे समजले होते त्यामुळे वाहन परवाना काढला नि दुचाकी चालवायला शिकलो होतो. पण चारचाकीचा आकार मोठा, जबाबदारी, भान मोठे. मागच्या पिढीने सायकलं काय तेवढी अनुभवली होती. तेवढीच काय वाहनाची ओळख होती. सायकल वर एकदा सकाळी सातच्या पाळीला कंपनीत जात होतो. हिवाळ्यातील सकाळच्या धुक्यात डाव्या बाजूने जात होते. चालवता चालवता मी सायकल वरून पडलो. नंतर आवाज आला.. मेल्याला दिसत नाही का… दोघींच्या मधून सायकल घातली.. पण मला लागलेलं पाहून त्यांनी चपला हातात घेतल्या नाही.. एवढंच काय ते नशीब नी हाच काय तो पहिला अपघात..
तर पिकअप गाडी घरी आली… पण त्या रात्री झोप लागली नाही. अरे गाडी तर घरी आणली पण चालवता कुठे येते. वर्षभराआधी वाहन चालवायचा क्लास पूर्ण केला होता. तेवढाच काय अनुभव… तेथे तर एका वळणार गंमतच झाली. मी फक्त स्टेअरींग धरले होते. प्रशिक्षकांनी हलका हात लावून ती वळवली सुध्दा पण हलकासा ब्रेक लागला.. जो मी दाबलाच नव्हता.. नंतर कळाले की वाहनाचे ABC ( Accelerator, Break, Clutch) त्यांच्या पायाजवळही असतो.. हाय… शिकताना अर्धा टेन्शन गायब… क्लास झाला होता… प्राथमिक ओळख होती.. पण आता सरावाची गरज होती. क्लास संपवून वर्ष झाले होते. ठार विसरलो होतो. पुढील महिण्यात गाडीचा हप्ता चालू होईल पण गाडी काही शिकणं होणार नाही.. चिंताच लागली. यू ट्यूब वर सारे ट्युटोरिअल पाहिले. वारंवार पाहिले. खाताना, झोपतांना गाडी चालवू लागलो. मनात, डोक्यात गाडीतच बसलो आहोत याचा सराव करायचो. पण गिअरची भानगड समजायचीच नाही… तो आता कोणत्या नं. वर आहे ते कसा कळतो… येथेच जाम.. घाम फुटायचा… काय गाडी वाले पण सध्या गिअर च्या हॅंन्डला फक्त रेषा.. असा केला की एक, दोन, तसा की तीन चार.. अरे तो टाकू पण आधीचा कुठे होता ते तर कळायला हव ना.. काहीच सुचत नव्हतं. एका मित्राला आमंत्रण दिले..त्याने चार दिवस येवून एका मैदानावर गोल गोल चकरा मारल्या… आता गाडी माझी होती. पण त्याच्या हातात ABC नव्हंत म्हणजे गाडी मीच चालवली होती. पण एका कोणात स्टेअरीगं धरूण ठेवण्यात काय गंमंत….ह्या पटल नाही. मग एका गाडी चालवता येणार्या व्यक्तींना बरोबर घेवून बागेच्या कामासाठी जावू लागलो. गाडी चालवतांना ते काय करतात.. गाडीचा आवाज कुठे बदलतो. गिअर कसा पाडतात. हे बारकावे शिकलो. नशिबाने मी फास्ट लर्नर असल्यामुळे पटकन शिकतो. त्यामुळे हे सारं जमलं..आणि एक वाक्य महत्वाचे कळाले… आता गाडी रस्त्यावर स्वतः चालवा.. तसे शिकणं होणारं नाही. बापरे… स्वतः चालवयाची… सर्वांगाला घाम फुटला… बघू म्हणून जमली तर जमली नाही तर राहील उभी… छोट्या छोट्या कामासाठी एका वर्ग मित्राला गाडी चालवायला बोलावू लागलो. एक दिवस पर्यावरण दिनाच्या दिवशी येईन म्हणाला आणि आलाच नाही. हिमंत बांधली.
त्या दिवशी जाम पाऊस नाचत होता. तांडव नृत्यासारखा… अरे हीच संधी आहे.. रस्त्यावर कुणीच नसेल… मीच एकटा.. डोळ्यासमोर मोकळा रस्ता नि अगदी जवळ काचेवर पडणारा पाऊस बाजूला सारवणारे वायफर.. मग काय.. निघायचं ठरलं , पण दोन अडचणी होत्या.. रिव्हर्स जमेल का… नि आपण तेथे जातोय तेथे छोटा नाला आहे. एवल्याशा मोरी वरून गाडी जाईल का… नाहीच जमली तर खड्यात, गाळात.. बघू जमत का… गाडी… गेट बाहेर रिव्हर्स गिअर्न बाहेर टाकली. ती सहज जमली.. अरे जमतयं की.. गाडी सरळ केली. पहिला गिअर, दुसरा गिअर गिअरचे काम कळाले. बस.. गाडी चालू लागली… रस्त्यावर चाललेल्या पाण्यावरू चाकं फर्रर्र्ss वाजायची… एकाद्या चित्रपटात हिरो पावसात गाडी चालवयाचा फिल आला… गाडी… गंगापूर रोडने चोपडा लॉन्सकडून मेरी पर्यंत पोहचली होती. जसा विचार केला. तसंच रस्त्यावर कुणी कुत्रं नव्हतं. पोहचलो राव.. येथं पर्यंत.. ती अरूंद मोरी.. तेथ पर्यंत गेलो. ती मोरी पाहिली. अरे बरीच मोठी आहे. पण स्टेअरिंग सरळ धरलेली बरी…मोरी पार झाली. बायकोचा जिव ईकडे टांगणीला. पोहचले का… सुखरूप. इच्छित स्थळी पोहचल्याचा फोन केला. तीलाही आनंद वाटला. सोनं गहान ठेवणं सार्थक लागले होते.
आता पोहचलो… तरी घरी परत सुखरूप जावू का… तेव्हा पाऊस नव्हता.. रस्त्यावर वर्दळ होती. पण ती दुरूनच जात होती. वाहन मोठे असल्यामुळे तेच अंतर राखून चालतात. मला बरे वाटले. गाडी चोपडा लॉन्सजवळ आली.. नि सिग्नल पडला. गाडी उतारावर लागली होती. नि एका हितचिंतकांचा(?) सल्ला डोक्यात आधीच गेला होता. तो आठवला… गाडी उतारावर असेल तर गिअर पटापट बदलावा नाहीतर गाडी रिव्हर्स होते. मागे लोक चिटकून असतात. पब्लीक पडी पडते.( ppp), . हे आठवून कपाळावर घामाचे दवबिंदु तयार झाले. नि झाले तसेच सिग्नल सुटला गाडी चालू करून ABC चा समन्वय साधत असतांना गाडी थोडी मागे गेली. पण किंचीतशी.. मागच्याने पुरेसे अंतर ठेवले होते. वाचलो.. पण गाडी पहिल्या गिअरवर आली.. सिग्नल पार पडला..मी जिकंलो होतो. मी माझ्या भितीवर मात केली होती. आता गच्चीवरची बाग मोठी होतेय. शुन्य संकल्पनेवर काम करतांना बराच मोठा पल्ला गाठला आहे. आता प्रत्येक मित्र, हिंतचिंतक बरं केलं गाडी घेवून या बद्दल आनंद, कौतुक व्यक्त करतात.
आज आम्ही २५ बाय ६० फुटाचे शेड आहे. गाय आहे. गोठा आहे. दोन माणसे मदतीला आहेत. मुख्य म्हणजे आता नाव झालयं.. इच्छुकांच्या घरी विषमुक्त भाज्या उगवणे व त्यांचे आणी त्यांच्या कुटुंबाचे दिर्घायुष्याचे चिंतन करण्याची संधी मला निसर्गाने दिली यातच खूप आनंद वाटतो. यातून उपजिविकेसाठी पैशे कमवणे हे आमच्यासाठी बाय प्रोडक्ट आहे. खर प्रोडक्ट तर निसर्गाचे संवर्धन करत येणार्या पिढीचे शुध्द हवा, पाणी, निसर्गासाठी विशेषतः अन्नसुरक्षेसाठी प्रयत्न राहणे व त्यासाठी लोकांनी आमच्या पर्यंत पोहचणे आहे. ह्यात जो आनंद आहे. ते खरे आमचे प्रोडक्ट आहे…
असो.. आज गार्डेन प्रिन्सेस दारात उभी राहते. डौलाने शहरभर फिरते… जागृती रथ म्हणून मिरवते… पण पाऊस आला की… तिला सोबत घेवून फिरायला गेल्याची धाकधूक आजही आठवते…
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
You must be logged in to post a comment.