वैशालीच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला. कोणतीही चुक नसतांना दुचाकीला मागून येणार्या चालकाने कार ठोकली. व रस्त्यावरील या अपघातात मागील मेंदूला जबर मार लागून रक्तश्राव झाला. व तेथे श्वासाची माळ तुटली. ( २१ जाने. २०२२) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिने आणि मी जोडलेल्या मित्र मंडळींकडून सांत्वनाचे शब्द माझ्यापर्यंत पोहोचले. खरं म्हणजे आम्हा दोघांचे आयुष्य संघर्षमय होते. पण तिची आणि माझी भेट झाली आणि आमच्या समाधानी आयुष्याला सुरुवात झाली. माझ्या उमेदीच्या काळात माझ्या जवळ शिक्षण, घर, शिल्लक यातील काहीही नसताना केवळ हिम्मत, उमेद व व सामाजिक मूल्यांच्या या जोरावर तिने मला पसंत केले. एकमेकांसोबत जगताना फार साधेपणाने जगलो. साध्या पध्दतीने कोर्ट मॅरेज केले. ति जशी आयुष्यात अचानक आली तशीच निघून गेली. काही बोलणं नाही. निरोप घेण नाही. पहाणं सुध्दा झालं नाही. असं दुख्य वैराच्याही वाटेला कधी येवू नये.

आमच्या वयात फक्त १३ मह्णिण्यांचे अतंर होते. तिची सोबत की पंधरा वर्षाची होती पण आम्ही एकमेकांना समृद्ध करत होतो. ती पत्नी जरी असली तरी तिला मित्रासारखे स्वातंत्र्य होते. आमचे गुणदोष, कमतरता आम्ही एकमेकांना दाखवत असलो तरी प्रेम मात्र नितांत होते. आम्हा दोघांची सामाजिक व कौटुंबिक पार्श्वभूमी, स्वभाव, आवडी निवडी, सवयी, कौशल्य, जगण्याकडे, आरोग्यकडे पाहण्याचा दृष्टिकोनात आम्ही विरुद्ध टोक होतो. पण आम्ही एकमेकांना जपत होतो. गच्चीवरची बाग एका स्थिर टप्प्यावर आल्यानंतर तिने तिच्या पूर्वीच्या आवडीच्या महिला संघटन या कामाला सुरुवात केली होती.

तिच्या सोबती मुळेच मी या सिमेंटच्या जंगलात गच्चीवरची बाग फुलवता आली. तिनेच माझ्या आयुष्याच्या उजाड माळरानाचे हिरव्यागार सृष्टीत रूपांतर केलं. शून्यातून ही संकल्पना उभी करतांना आर्थिक अडचणींना फार तोंड द्यावे लागले. आदल्या रात्री ती मला म्हणाली की आपल्याकडे खूप पैसे येईल चिंता करू नको. आपल्याकडे काहीच नसताना खूप सारे उभे केले. असा ती धीर द्यायची.
आयुष्याच्या वाटेवर कधीतरी सोडून जाणारच आहोत. फक्त हे जाणं मागेपुढे असतं एवढाच काय तो फरक असतो. पण तिचे जाणे काळजाला चिरून गेलं. तिला विसरणं शक्यच नाही पण प्रयत्न करतोय. तिची जागा जगातील कोणतीही स्त्री घेऊ शकणार नाही. पुनर्जन्म असेनच तर तिने माझीच निवड करावी. अशी तिला विनंती करतो.
अपघातानंतरही ती ज्या अवस्थेत असती त्या अवस्थेत तिला सांभाळण्याची माझी तयारी होती. पण नियतीने तिला शेवटचे हातात हात घेउन बोलण्याची संधी पण दिली नाही. तिच्या नसण्याने आयुष्याची हिरवळ व गच्चीवरची बाग ही करपून गेलीय. न्याय तरी कुणाकडे मागायचा… असे बरच काही आहे पण तूर्तास एवढेच.
या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जेव्हां केव्हां नाशिक हुन संगमनेर/पुण्याला जाल तेव्हा कर्ह घाटात काही अंकुरित होणाऱ्या बिया नक्की तिथे टाकाव्यात. जेणेकरून तिथे हिरवळ राहील. पक्षांना कीटकांना त्यातून आनंद व अन्न मिळेल. वैशालीला इतरांना करून घालण्यात फार आनंद वाटायचा. बियाण्यात तृणधान्य, तेलबियांचा बिया यांचा समावेश करावा. ही तिच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल.
गच्चीवरची बागेच्या संघर्षमय प्रवासात तिने मांडलेले विचार या फिल्म लिंक देत आहे.
-संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक