Treasure of the heart & soul

मला आठवतयं…मी दहावी बारावीला असेन. तेव्हा गंगापूरस्थित निम्रल ग्राम निर्माण केंद्रांची ओळख झाली होती. तेथील शेती, मातीचे घर, शहराच्या जवळ असूनही निर्सगाची साथ संगत, कचर्याचे व्यवस्थापन, अहिसांत्मक मुल्य, त्यामागील शाश्वत, ठाम त्तत्वबैठक इ. मूर्त, अमूर्त सारे अनुभवयास मिळाले. जीवन जगतांना तयार होणारा विविध तर्हेचा कचरा त्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन करणे सोपे आहे हे उमजले. अगदी मानवी मलमूत्रापासून, कागदापासून, काडी कचर्यापासून  विविध तर्हेच्या कलात्मक, पर्यावरणपुरक वस्तू कशा तयार कराव्यात, त्या केवळ शोभेच्या वस्तू न राहता त्या रोजच्या वापरात कशा आणता येतील याचा मूळ विचार नि.ग्रा.नि.केंद्रातून मिळाला. मला आठवतय त्यांनी पुस्तकाचे खोली माझ्यासाठी खुली ठेवली होती. केव्हांही जावून वाचत असे. तेथील कामाचे खूप कौतुक व आपल्यापणा वाटायचा… त्यांचे हेच विचार आपल्याही जीवनाचा अविभाज्य भाग होतील असं कधी वाटलं नव्हंत. अवघड आहे असे वाटण्यापेक्षा मला नेहमीच त्याचे आकर्षण वाटायच. आज त्यांनी रूजवलेले विचार माझ्याही जीवनाचा एक अविभाज्य भाग झालयं. असं मला ठाम वाटतयं.

कचरा निर्माणच होवू नये असे अशी जीवनशैली जगणं हे खूप महत्वाचं आहे. म. गांधीजीचं स्वराज नावाचं पुस्तक वाचनात आलं. भाऊ नारवेकराचं जीवनगाथा वाचण्यात आली. विनोबा भावेची पुस्तक वाचली. म. गांधीनी किती जणानां प्रेरणा दिली आहे. खर स्वराज्य हे राजसत्तेच्या हस्तांतरणातून नव्हे तर स्वःच्या सम्यक वर्तनातून येणार आहे हा म. गांधीचीच्या जगण्याचा मतितार्थाने माझे जगणं सार्थक केलं आहे असे मला वाटतय. (मोहनचंद गांधी अनेक अर्थानी जगणं जगला. त्याचं सर्वच जगण हे प्रत्येकालाच भावेल असं नाही. पण प्रत्येकाला काहीतरी भावावं असं त्यात नक्कीच आहे.)

शहरी जीवनशैली ही जीवाला वीट आणणारी व्यवस्था आहे. अनेक समस्यांना जन्माला घालणारी आहे. पण आता शहरात जन्मलो. मला लाख वाटत असले तरी खेड्यात घरची मंडळी येणार नाही. आणि मलाही एकट्याला जाता येणार ही अपरिहार्यता जेंव्हा लक्षात आली तेव्हा नाशिक मध्येच राहयचे ठरवले. शहरातील कचर्याची समस्या व  शेतीची अनामिक ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती. नाशिकस्थित एका माध्यम संस्थेत काम करतांना जगण्याच्या काही मर्यादा लक्षात येत होत्या.. आपलं मातीतलं मूळ शोधण्याच्या ओढीने एक दिवस राजीनामा दिला.  शहरातील कचर्याची समस्या व शेती यांच्या समन्वयातून शहरी शेतीचा अर्थातच गच्चीवरची बागेचा जन्म झाला. या विषयावरच काम करण्याचे ठरवले. अर्थात याची बिज पेरणी नि.ग्रा.नि. केंद्रातून खूप पूर्वी झाली असली तरी त्यास अकुंरण्यास बराच काळ गेला. आपल्याही असं काही करायचं आहे. ठोस, शाश्वत, निरतंर, जे मला व इतरांनाही नेहमी प्रेरणादायी ठरेल. आणि या विचारातूनच गच्चीवरची बाग हा कार्यक्रम सर्वदूर फूलत चाललाय. बघता बघता त्यास विविध माध्यमांची जोड व साथ मिळत गेली. आता हा विचार महाराष्ट्रात पोहचलाय. हौशी लोकांना सोशल मीडियाव्दारे निशुल्क मार्गदर्शन करू लागलोय.

गच्चीवरची बाग अर्थातच शहरी शेती करतांना बाजारातून काहीच विकत आणायचे नाही. असा ठाम निश्चय केला होता. आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे त्याचा वापर करत बाग फुलवायची असे ठरवले होते. त्यास आज माझ्याच नव्हे तर अनेकांच्या बागेतून त्यास मूर्त स्वरूप येवू लागले आहे. अर्थातच हाही विचार स्वराज पुस्तकातून मधून मिळाला. अंबर चरख्यावर सूत कताई, गाय पालन, घरातील ओला कचरा व परिसरातील सुक्या कचर्याचे व्यवस्थापन, सायकलचा ऊपयोग करणे, प्लास्टिक, फास्टफूड, प्रोसेस्ड फूड कमीत कमी वापरणे किंवा टाळणे, कचरा होणार नाही याची दक्षता घेणे. असे अनेक भौतिक बदल जरी माझ्यात झाले तरी समोरच्याचे प्रथम ऐकून घेणे हा बदल माझ्या जडणघडणीस खूप महत्वाचा ठरला. प्रत्येक गोष्ट ही काटेकोरपणे समजून घेणे, ती अंमलात आणणे. शंभर टक्के प्रयत्न केले तरच ते कुठेतरी काही टक्यांपर्यंत साध्य करता येते याचा अनुभव घेता आला.

जीवनशैली कशी असावी, त्यासाठी काय करावे , काय करू नये हे शिकवणारा हा जीवनउत्सव खरोखरच जीवनाचा आनंदी उत्सव आहे. गरज ही शोधाची जननी असली तरी आपल्या गरजा मर्यादीत ठेवून जगणं गरजेचं आहे. आपल्याला जसा या पृथ्वीवर जगण्याचा हक्क व अधिकार आहे तसाच निर्सगातील इतर जीवांनाचाही तेवढाचं आहे.  पण दूर्दैवाने हम करे सो कायदा किंवा धरती सिर्फ मेरे बाप की म्हणत मानव स्वतःच शेखचिल्लीप्रमाणे आपली  मानवजात नष्ट करायला निघाली आहे.

गरज, हौस, चैन, हव्यास याला लगाम घातलाच गेला पाहिजे. अर्थात हे बाहेरून होणार नाही. आपण सम्यकविचाराने हे आचरणात आणलं पाहिजे तरच ही बहूप्रसवा धरणीमातेचा विविधांगी ठेवा आपल्याला पुढील पिढीपर्यंत पोहचवता येईल. नाहीतर एकदिवस स्वछंदी, स्वतंत्र विचार करणारी मानवजातही पुस्तकात वाचण्यातील कथा बनेल व आपलं आयुष्य हे कुणीतरी मानव निर्मीत रोबोट हाताळतांना जाणवू लागेल. अर्थात आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने त्याचे पाऊलं ही पाळण्यात दिसू लागले आहेतच. आधुनिक प्रश्नांची निर्मिती ही या यांत्रिकीकरणाने, तंत्रज्ञानाने निर्माण केली आहेत व आपण या आशेवर आहोत की यांची उत्तरे ही तंत्रज्ञानाच्या प्रगतीतच, वापरात लपलेली आहेत. पण हा केवळ भ्रम आहे असे म्हणावेसे वाटते. हे मानवजातीला उमजेपर्यंत बराच उशीर झालेला असेन यात शंकाच नाही.  अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान चूकीचं आहे असं मुळीच नाही. त्याचा मर्यादीत वापर करत सावधपणे पुढे सरकंण गरजेचे आहे. त्याचे सर्रास अंधानुकरण ही धोक्याची घंटा आहे. यासाठी जीवन उत्सव व त्यातील कार्यरत मंडळी ही वाट दाखवण्याचे काम करतेय. अशा या जीवन उत्सवातील विचारांना आचारांना किमान समजून तर घेवू या…नव्हे घेतलंच पाहिजे. मला खात्री आहे हे आचरण सोपं नाही… पण अवघड मात्र नक्कीच नाही. कारण शेवटी हे आपल्या येणार्या पिढीच्या भवितव्याचा विचार त्यात लपलेला आहे. त्याचा साक्षात्कार माझ्याप्रमाणे आपल्याला होवो ही सदिच्छा…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

www.gacchivarchibaug.in