एक टांग की मूर्गी | Brinjal | वांगी कशी लागवड करावी, कशी काळजी घ्यावी | नवीन ३ टिप्स पहा ज्या कधी


वांग्यााला एक टांग की मूर्गी का म्हणतात. त्याची लागवड कशी करावी, वांग्याचे झाड अचानक का वाळतं.. कोणती खते वापरावी, कीड नियंत्रण कसे करावे., नवीन तीन टीप्स ज्या कधी ऐकल्या नाहीत एक टांग की मूर्गी | Brinjal | वांगी कशी लागवड करावी, कशी काळजी घ्यावी

परसबागेतील वांग्यांची लागवड व निगा…


वांगी हे आवडत्या भाज्यामधील एक भाजी आहे. वांगी या फळभाजीत अनेक प्रकार असतात. काटेरी हिरवी व जांभळी वांगी, लांब निळी व पांढरी वांगी, भरताची जळगावची वांगी, असे एक ना अनेक प्रकार आहेत. वांगी हे रोजच्या आहारात वापरली जाणारी भाजी. खाणावळीत वापरली जाणारी भाजी, थोडक्यात कांदे, बटाटे खालोखाल वांगी या  भाजीचा लोकप्रियतेत क्रमांक लागतो. म्हणूनच आंतराष्ट्रीय बिज निर्मात्या कंपन्या वांगी या वाणात जणूकीय बदल करत वांगीचे उत्पादन वाढू इच्छितात. वनस्पतीतील जणूकिय बदल हे मानवी, प्राण्यांच्या आरोग्यासाठी दिर्घकालीन दुष्परिणाम करणारी ठरू शकते. त्यामुळे त्याला बराच विरोध होत आहे. वांगी हे रासायनिक पध्दतीने पिकवले जातात. त्यामुळे त्याची मूळ चवीचा आनंद हा दूरच राहतो. वांगी हे पचनास जड असतात.पण त्यातून ऊर्जा प्रदान होत असते. मांसाहारातून जे काही मिळते ते वांगाच्या भाजीतून, 

वांगी हे भाजून छान लागतात. चुल्हीत भाजलेले वांगे व त्यावर नुसते तेल मिठ टाकले तर त्याची चव अप्रतिम, व्हेज पुलावमधे सुध्दा वांगी चविष्ठ लागतात. वांगी बटाटे भाजी, भरीत व भाकरी असे जेवणातील पदार्थ महाराष्ट्रात प्रसिध्द आहेतच.  त्याचे काप करून त्याची भजी सुध्दा चविष्ठ लागते. थायलंडला मी एक महिना वास्तव्यास होतो तेव्हा तेथे सलाड म्हणून वांग्याचे काप दिले जायचे. हे खातात असं म्हणून खाऊन तर पाहूया… आणि खरचं मिठाबरोबर त्याची चव अप्रतिम लागली. घरचे एकच वांगे असली तरी त्यात बटाटे टाकून रस्सा भाजी करता येते. असे हे वांग्याचे महात्म. 

बाजारातील रासायनिक खत व औषधांवर पिकवलेली वांगी टाळणेच योग्य. एक तर बेचव लागतातच शिवाय रसायनांच्या मार्यामुळे त्यातून योग्य ते पोषण मिळत नाही. बाजारातील वांगी हे एसीडीटी वाढवण्याचे काम करतात. तर घरची वांगीपासून कोणताही त्रास होत नाही. वांगी हे घरी सुध्दा कुंड्या, बॅग्जस, एरो ब्रिक्स बेडमधे उत्तम प्रकारे पिकवता येतात. 

वांगीला फळमाशी लागण्याची शक्यता असते. गोमुत्र, दशपर्णी, निमार्क यांची फवारणी केल्यास अळीपासून पिकाचे संरक्षण करता येते. वांगी या झुडुप वर्गीय वनस्पतीवर काळा, सफेद मावा पडण्याची शक्यता असते. अशा वेळेस पाण्याची मात्रा कमी करावी. उन सावलीत वाढणारी ही फळभाजी वर्षभर फळ देत असते. यास खत म्हणून शेणखत, जिवामृत, खरकटे पाणी दिल्यास भरपूर प्रमाणात वांगी मिळत राहतात. वांगी हे दोन फळाच्या बहारात आराम करतात. त्याकाळात त्यांना योग्य पोषण दिल्यास उत्तम प्रकारे वांगी देतात. हे झुडूप हे तीन तीन वर्ष जगतात. त्याचा उंची व पसारा १ किवा २ मिटर होऊ शकतो. दरवर्षी आरामाच्या काळात त्याची छाटणी केल्यास उत्तम प्रकारे फुटवा येतो. 

बरेचदा उन्हाळात वांगीची चांगली वाढ असलेली झाडं अचानक वाळून जातात. याचे मुख्य कारण म्हणजे कुंडीला आपण दिलेले पाणी व उष्ण वारा, तापमान याच्या विषम प्रमाणामुळे वांग्याची मुळे मातीतच शिजतात व पर्यायाने अन्नपूरवठाच बंद झाल्यामुळे ते अचानक गळालेली, वाळलेली दिसतात. त्यामुळे त्यांना उन्हाळ्यात कडक उन्हात ठेवू नये.

बागेत गोगलगायी असल्यास वांग्याची खोड हे चारही बाजूने खातात व त्यामुळेही ही झाडं वाळतात.

आपल्याकडे चांगल्या वाणाचे वांग्याचे रोप असल्यास त्याचे बिज संवर्धन हे घरच्या घऱी करता येते. 

बिज संवर्धनासाठी दोन प्रकार आहेत. एक तर तुमच्याकडे जे वांग्याचे झाड आहे व त्याचे बिज संवर्धन करावयाचे असल्यास झाडावरच वांगी पिकू द्यावीत. पिकल्यानंतर हे वांगी वाळू किंवा आक्रसू लागली किंवा त्याचे देठ झाडावरच वाळले की ते वांगे झाडापासून वेगळे करावे, अशा वांग्याला उभ्या चिरा माराव्यात. व ते सावलीत टांगून द्यावेत. म्हणजे कालांतराने वांगाच्या फळाच्या सालीपासून बियाणे मोकळे स्वच्छ करावे.

तर दुसरा प्रकार प्रकारात पिकलेलेल वांगे मिळाल्यास त्यास वांग्याला उभ्या चिरा द्यावात. व सावलीत टांगून ठेवावेत. लक्षात घ्या बियाणांसाठी वांगी हे हिरवट, अपरिपक्व नसावे. नाहीतर पोचट बियाणे हाती येते व त्याची फळधारण क्षमता, उतारा हा कमी होतो. महाराष्ट्रातील लोकभाषेत वांग्याला एक टांग की मूर्गी असे म्हणातत. कारण त्याची चवच कोंबडीसाऱखी असते. 

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

अधिक माहितीसाठी www.gacchivarchibaug.in