And Jasmine Bloomed


मोगऱ्याची कटिंग मला धडा शिकवून गेली.

मोगऱ्याची कटिंग मला धडा शिकवून गेली.

मोगऱ्याची कुंडी १० इंच ऊंच, १४ इंच रुंद, आमच्या काचेच्या खिडकी बाहेर ठेवली होती. त्या पाळीवर तीन गावरान गुलाबाचे वेल, मोगरा, जरा दाट मोगरा आणि रातरानी वसली आहे. कुंड्यांची थोडी हलवाहलव करायचा मुहूर्त येत नव्हता. तोपर्यंत रोज़ सगळ्या झाडांना तिथेच पाणी द्यायचे काम असत. ह्या झाडांपर्यंत जायला एक छोटा दीड फूट उंचीचा कठडा पार करून जावे लागे आणि पाणी द्यायला पाईप नव्हता. एक दोन दिवस झाले असावेत की काय कुणास ठाऊक, नोकरीघरकाम या गडबडीत या पाळीवरच्या सगळ्या वनस्पतींना पाणी द्यायचे राहून गेले. नजर पडली

तेव्हा मोगऱ्याची पाने फिकट हिरवी, कागदा सारखी कडक झाली होती. त्यातील आर्द्रता नष्ट झाली होती. एक विचार आला की आता मोगरा गेला. एक पान चोळून पाहिलं तर ते ताठ झाल होतं पण चुरगळण्याएवढं सुकलं नव्हतं. म्हणजे रोपट्यात कार्यक्षमता मंदावली होती पण ठिणगीएवढी का होईना, कार्यरत होती. झाडाच्या बुंध्यावरचा भार कमी करावं म्हटलं अन काही पाने काढून टाकावीत. तेवढाच मोगऱ्याला कमी अंगांचा सांभाळ करावा लागेल. त्वरित त्याच्या, पाने गळून गेलेल्या, सुकलेल्या काठ्या कापल्या. काही पाने असलेल्या फांद्या पण कापल्या. शेंड्याशी असणाऱ्या पानांना धक्का लागू दिला नाही. मोगऱ्याची अवस्था नाजूक होती. या छोट्या काटक्यांचे छोटे छोटे काप करून त्याच्या बुंध्याशी ठेवले. मातीत पुरले नाहीत कारण मुळांना देखील त्रास झाला असता. काढलेली पाने पण काटक्यांसोबत रचली जेणेकरून त्याच्या मातीतल्या पाण्याचे सहजपणे बाष्पीभवन होऊ नये. हेतू एकच की या पुढे मोगऱ्यानी आहे त्या पानांचा पूर्ण उपयोग करून नवीन उत्पत्ती करण्यासाठी आपली प्राणशक्ती केंद्रित करावी.

आमच्या कात्रजला भर उन्हाळ्यात सुद्धा एप्रिलमध्ये एक दोन वेळेस तरी निदान बेभान वारा येऊन मुसळधार पाऊस पडतो. असं म्हणतात, पावसाचं पाणी वृक्षवेलींसाठी अमृत असते. मी कुंडी पाळीच्या टोकाला ठेवली, जिथे ऊन दुपार नंतर येत असे, वारा जास्त सोसाट्याने पळत नसे आणि गच्चीच्या शेड वरून पावसाचे पाणी थेंबे थेंबे मोगऱ्याला मिळत. थेट पाऊस त्यावर थैमान घालणार नाही याचीही खात्री केली.

४-५ दिवस आभाळी वातावरण होते. पाऊसही पडला. मोगऱ्याने पापणी हलवली.

त्याला रोज सकाळ संध्याकाळ, एक ग्लास पाणी दिले. कधी डाळ तांदूळ धुतल्याचे पाणी, कधी भाज्या चिरल्यानंतर लाकडी पाट धुतल्याचे पाणी, असे आठवडा भर श्रुजन केले. मोगरा हसला. पाणी देतांना मी त्याला खूप न्याहाळायचे. तग धरली होतीच त्याने, शिवाय आता त्याच्या मनात स्वप्ने दाटली होती आणि माझ्याही. मी न चुकता “मोगरा फुलला, मोगरा फुलला” असे गाणे आपोआपच गुणगुणायचे. रातराणी, गुलाब, हे दोन त्याचे सवंगडी त्याला धीर देत होते. आपापल्या जागेवरूनच त्याची वाट पाहत होते. एका जमिनीत असते तर त्यांनी असं मुळीच होऊ दिल नसतं!

काळे मेघ आपल्या गावी निघून गेले आणि मला मोगऱ्याची पालवी देऊन गेले. प्रत्येक काठीला! जिथे जिथे माझी कातर स्पर्श करून गेली, कठोरतेने घात करून गेली, तिथे तिथे सुंदर, कोवळी, फक्त उत्स्फुर्ततेने वाढणारी पालवी! दर दिवशी पाने जोमाने वाढत होती. बघता बघता आठवडा भरात प्रत्येक शेंड्याला कळ्या धरल्या.

तान्ह्या – बान्ह्या. जणू बाळाच्या गालावर काळा गोजिरवाणा टिळा लावला.

पुढे ४,५ दिवस आम्ही सगळे कौतुकाने नवीन बाळाचे निरीक्षण करीत. कळ्या, लिंबाच्या बिया एवढ्या मोठ्या झाल्या, तेव्हा मोजायचे धाडस केले. तब्बल २००! खरंच! आणि आम्ही त्या उमलण्याची वाट पाहू लागलो.

अखेर तो दिवस आला! पहिल्या दिवशी साधारण ३० एक फुले उमलली. माझ्या टेरेस बालकनीत आणि घरात फक्त मोगऱ्याचा सुगंध दरवळत होतं. प्रत्येक वाऱ्याची झुळूक नव्याने भरभरून श्वास घेत होती. मोगऱ्याचेफोटो काढू का मिठी घेऊ, काय करू कळेना. आम्ही तिथेच निजलो. आकाशातल्या चांदण्या माझ्या अंगणात उतरल्या होत्या.

असं पुढच्या आठवडाभर आम्हाला मोगऱ्याची फुले काही तरी सांगत राहिली. व्हाट्सअप स्टेटस वर मोगरा पाहून,

मैत्रिणी विचारू लागल्या, “काय खत घालते गं?”. मीही क्षणभर विचारात पडले. “खत? आपण खत नाही घातले. नक्की काय केले? एवढी फुले मोगऱ्याला कधी नाही आलीत. अगदी उन्हाळ्यात सुद्धा, जेव्हा मोगऱ्याचा बहरण्याचा ऋतू असतो तेव्हा सुद्धा नाही.”

हा विचार तीन चार दिवस मनात घोळत राहिला. मोगरा तसाच, स्मितहास्य प्रदान!

माझे दुर्लक्ष्य झाल्यामुळे मोगरा सुकायला लागला होता. मी वाळलेली पाने, दांड्या कापून त्याचा अनावश्यक भार कमी केला. या कात्रणाच्या वळणाला त्याने आत्मसात केले आणि स्वतःची शक्ती शिस्तबद्ध विकासाकरिता वापरली. त्यानी आमचे जीवन सुगंधित केले.

मोगऱ्याची कटिंग मला धडा शिकवून गेली.

दिप्ती दखणे. नाशिक.

Jasmine मोगर्याची काळजी कशी घ्यावी


671360 copy copy.jpg

How to care Jasmine?

मोगर्याची काळजी कशी घ्याल ?

या वर्षी वाढलेल्या तापमानाचा पारा व लांबलेला उन्हाळा यामुळे प्रत्येकाच्याच दारी मोगरा छानपैकी फुलला. त्यामुळे त्याला पुढील वर्षीपण तशाच कळ्याचा साज यावा असे वाटत असेल तर काय काळजी घ्याला. पण पावसाळयाच्या तोंडावर मोगर्याला कळ्या येत आहेतच. पण या कळ्या आकाराने लहान झाल्या आहेत.

थोडक्यात त्याचा मोसम आता संपला… मोगर्याला फूल येऊन गेली तर आपण त्याला आहे तसा पुढील वर्षासाठी सोडून देतो. पण त्याची टप्प्या- टप्प्यावर काळजी घेणे गरजेचे असते.

 • मोगर्याला फूल येऊन गेलीत की कळ्याचा आकार लहान झाला असेल किंवा या वर्षी फूलंच आली नसतील तर आता त्याची हार्ड कंटीग करणे गरजेचे आहे. हार्ड कंटींग म्हणजे त्यास बुंध्यापासून १ ते दीड फूट उंचीवर झाटणी करून घ्या… म्हणजे पावसाळ्यात त्यास फूटवा फूटून त्यास छान पर्णसंभार तयार होईल.
 • पाऊसात थोडाफार ताण पडला तरी मोगर्याला पाणी देवू नका… साधारण नोव्हेंबर च्या सुमारास त्यास हलकी कंटीग करा… हलकी कंटीग म्हणजे वाढलेला मोगर्याची शेंड्याकडून सहा ते नऊ इंच कापणी करावी.
 • मोगर्याला पावसाळ्यात लेंडीखत, शेणखत पूरवा…

 • शक्य झाल्यास त्यात मिरचीचे रोपे लावा… मोगरा व मिरची ही चांगले वाढतात. म्हणजे मोगर्याला फूल येण्यास अवकाश असल्यामुळे मिरचीली मिरच्या भरपूर लागतात. तर मोगर्याला उन्हाळ्यात भरपूर फूले येतात.
 • मोगर्याचे कंटीग करतांना काळजी घ्या.. पाऊस तास दोन तास थांबेल याचा अंदाज घेवून मोगर्याची कंटीग करा. कंटीग म्हणजे फांदीला तिरपा छाट द्यावा. म्हणजे पावसाचे पाणी त्यावर संग्रह होणार नाही.
 • कुंडी रिपॅटीग करावयाची असल्यास त्यास फेब्रुवारीपर्यंत अनुकुल कालावधी असतो.
 • जुन्या मोगर्यावर पांढरी डाग असलेली, जूनाट झालेली, रट झालेली पाने, काढून टाकावीत. म्हणजे त्यांची जागा नवी पालवी घेते.

 • एखादा वठलेला, वाढ होत नसलेला मोगरा असेन त्यास फेब्रुवारी मधे निपर्ण करावा. निपर्ण म्हणजे त्याची सगळी पाने काढून टाकावी. फक्त काड्या ठेवाव्यात.
 • बाकी पावसाळ्यात वेगवेगळी फवारणी करत राहवी.
 • मोगर्यात मोगरा, बट मोगरा, मदनबाण, वेली मोगरा असे प्रकार असतात.
 • सध्या नर्सरीमधे बारमाही मोगरा येतो. या सर्वांना वर सांगितल्या प्रमाणे काळजी घेता येते.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक. 9850569644 / 8087475242

http://www.gacchivarchibaug.in

पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४

जाहिराती