4fd_0
लॉकडाऊनच्या काळात आपल्या हाती बराचसा वेळ असण्याची शक्यता आहे. या काळात काय करायचे हे ठरलेले असेलही व त्या बरहुकुम आपण आपला दिवसाचा उपयोग करत असू या बद्दल शंकाच नाही.

मला या लेखाव्दारे आपले लक्ष विशेष मुद्याकडे वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. तो म्हणजे रोपवाटीका…

कारण पावसाळा जवळ येतो आहे. त्यामुळे वृक्ष लागवड ही दर वर्षाप्रमाणे करावी लागणार आहेत. वृक्षलागवडीचा कार्यक्रम माहे डिसेंबर जानेवारी पर्यंत चालतो. पण पावसाळा हा उत्तम असतो. तर लॉकडाऊनच्या काळात सरकारी व खाजगी सार्याच रोपवाटीका बंद असणार आहेत. त्यामुळे आपल्या प्रत्येकालाच आपल्या गार्डेनचा काही भाग झाडांच्या नवीन रोपांसाठी देणे गरजेचे आहे. आता त्यासाठी काय काय करणे व कोणत्या टप्प्यावर करणे गरजेचे आहे हे लक्षात घेवूया..

 

 • बियाणं किंवा रोपाची यादी
 • हुंडी कशी बनवावी
 • त्याचे संगोपन कसे करावे.
 • पाणी कसे द्यावे.
 • समन्वय

 

 • बियाणं किंवा रोपाची यादीः आवळा, आंबा, सिताफळ, बेहडा, उंबर, पिपंळ, वड, चिंच, बोर, विलायती चिंच, रूद्राक्ष, निंब, कडीपत्ता, अशोक, जांभूळ, बेल, पेरू, लिंबू , पपई , चंदन, बकुळ, पारिजातक. पांगरा, पळस, कंदब, सप्तपर्णी,सोनचाफा अशी अनेक झाडाची यादी करता येईल. काही बियांपासून रूजतात तर दूधाळ झाडे ही फांद्यापासून रूजतात. तसेच आपल्या परिसरात काही झाडे असल्यास त्यांच्या बियाणं गोळा करून त्यांचीही रोपवाटीका तयार करू शकतात.
 • बिज रोपनः आपल्या कडे फळे असल्यास त्याच्या बियाणं काढून, पाण्याने स्वच्छ धुवा, त्यास सावलीत वाळवा. त्यातील सशक्त, जड, आकाराने मोठ्या, भरीव बियांचा निवड करा. त्यांना दिवसभर पाण्यात भिजवा रात्री त्याचे प्लास्टिक पिशवीत (हुंडी) रोपन करा.
 • हुंडी कशी बनवावी. काळ्या रंगाची प्लास्टिक बॅग असल्यास उत्तम. उपलब्ध नसल्यास दुधाच्या पिशव्या पण चालतील हे ही नसेल तर पाणी पिण्याच्या बाटल्या, डब्बे, काहीही चालेल. यास तळाशी छिद्र पाडावेत. त्यात नारळाच्या शेड्या, पालापाचोळा थोडा टाकावा. त्यात माती, खत टाकून भरून घ्यावेत. त्यास थोडे आपटून घ्यावे. म्हणजे माती घट्ट बसेल.
 • त्याचे संगोपन कसे करावेः बिज किती मोठं आहे या नुसार त्यास त्याच्या आकाराच्या ३ पट खाली रूजवा. तर दुधाळ फांद्या असतील तर त्यास ती इंच खोल, फांदीला तिरपा छाट देवून रूजवाव्यात. मातीच्या वर ही ३ इंचच असावी. अधिक उंची असल्यास वाळतात. रोज पाणी द्या. उष्ण वारा लागत असल्यास आडोसा तयार करा. सावली तयार करा.
 • पाणी कसे द्यावेः गरजेनुसार दोन वेळेस पाणी देण्याची गरज असल्यास नक्कीच द्यावी. पाणी हे झारी पध्दतीने द्यावेत. म्हणजे हुंडीतील माती पाण्याच्या वेग व दाबाने बाहेर फेकली जाणार नाही. कारण बरेचदा बिजही माती बरोबर बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते.

 

 • समन्वय आपण रोपवाटीका वाढवाता आहात. त्यात कशा कशाची झाडे आहेत. त्याची संख्या किती आहे. त्याची वाढ किती झाली आहे. याची माहीती आपल्या समाज माध्यमावरील गटात पोहचवा. किंवा आपल्या परिसरातील वृक्षप्रेमी असलेल्या व्यक्तिच्या किंवा गटाच्या संपर्कात रहा. म्हणजे आपण उगवलेली रोपे ही त्यांना उपयोगात येतील. तसेच शाळामधे संपर्क करू शकता.

 

तसेच येणार्या काळात जागा, हवामान उपलब्ध असतील पण रोपे उपलब्ध राहणार नाही असे होऊ नये म्हणून वरील झाडांव्यतिरिक्त ही बागेतील झुडुपांची रोपे तयार करू शकतात. व त्याची देवाण घेवाण करता येऊ शकते. कारण काही काळ तरी हे नर्सरीत उपलब्ध होणार नाहीत किंवा महाग होण्याची शक्यता असेल.  हे सारे काम निसर्गाने आपल्यासाठी सुदृढ आयुष्यासाठी दिलेल्या भेटीची छोटी परतफेड करावयाची आहे. असं हे निसर्ग धन त्याच त्याला परत करूया… कारण आपल्याकडे काहीना काही वेळ आहे.

 

आपल्याला लेख आवडल्यास नक्कीच शेअर करा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

9850569644, 8087475242