कचरा निर्मीती ही आजच्या आधुनिक जीवनशैलीची ने दिलेला शाप आहे. त्यामुळे सर्वदूर पसरलेल्या जल, जंगल, जमीन, जन आणि जनावरांच्या आरोग्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. पण प्रत्येक शापाला उपशाप असतो तसेच कचर्याचेही आहे.
बरेचदा कचरा निर्मीतीमागे नाईलाज व काही चुकीच्या सवयीमुळेही कचर्याचा प्रश्न बिकट झाला आहे. जेथे प्रश्न आहेत.तेथे उत्तर हमखास असतातच. थोडं आपल्याला एक पाऊल उचलावं लागतं एवढचं. कचर्याची सध्या विल्हेवाट लावली जाते. पण हा द्राविडीप्राणायम झाला. कचर्याचे व्यवस्थापन केले की त्यातून आपल्याला बरेच फायदेपण मिळातात. आज सर्वत्र स्वच्छता अभियान चालले आहे. चांगलेच आहे. पण याचा मतितार्थ पाहिला तर काय आपल्या अंगणातला कचरा हा दुसर्याच्या अंगणात जावून टाकणे असा आहे. म्हणजेच डंपीग ग्रांऊड वर जमा करणे होय.
कचर्याचा प्रश्नाला येथूनच सुरवात होते. आपण करतो ती सफाई असे मजेशीर नाव देतो. पण सफाई शब्दाची फोड केली तर सब चिंजोंका फायदेमंद ईस्तेमाल. हे आपण करतो का. तर नाही… कचर्याची दुसरी पायरी आहे त्यांचे केंद्रीकरण करणे होय. म्हणजे कचरा जिथे तयार होतो त्याचे संकलन करायचे व त्यासाठी आपलाच कररूपी पैसा दावणीला बांधून तो कचरा डंपीग ग्रांऊडवर जमा करणे. आता डंपीग ग्रांऊड, सफाई कामगार, तेथील जीवन एकदा अनुभवले की कळते की आधुनिकतेने वेगळ्या सामाजिक, आर्थिक विषमतेंना जन्म दिला आहे. असो… तर मूळ कचरा या प्रश्नांच्या उपायावर आपण बोलूया… कचरा हा विविध प्रकारचा असतो. काहीना पूर्नवापराचे मुल्य असते तर काहीनां नसते. काही कचरा हा विघटनशील, जैविक, नैसर्गिक असतो तर काही विघटनशील नसतो. सर्वात भयंकर प्रश्न निर्माण होतो तो नैसर्गिक कचर्याचे म्हणजेच घरातील व घर परिसरातील कचरा. किचनवेस्ट(यात प्रकार पडतात १. ग्रीन किचन वेस्ट व २.वेस्ट कूकड् फूड ३. खरकटे पाणी ४. पालापाचोळा)
आता याची विल्हेवाट लावणे सोपे आहे. पण त्याचा डंपीग ग्रांऊड पर्यंतचा प्रवास किळसवाणा असतो. पण त्याचे व्यवस्थापण हे आनंददायी, सृजनशील, पर्यावरण जपणारे आहे. विल्हेवाटीत जबाबदारी दुसर्याची व वेळ वाचवणारी ठरते तर व्यवस्थापनात जबाबदारी आपली स्वतःची व वेळ खर्च करणारी ठरते.
तर लेखात आपण व्यवस्थापनाचा मुद्दा कसा आनंददायी, आरोग्यदायी, पर्यावरण जपणारा आहे ते आपण पाहूया…
पहिल्यापासूनच स्वच्छतेची आवड होती. आंगण ओटा स्वच्छ करून कचरा जाळण्यापेक्षा त्याच खत करायचे. तेथे असंख्य मुंग्या जमा व्हायच्या .. आपल्या कचर्यात आफ्रीकन अंन्टस सारख्या मुंग्या जमा होतात, कोणकोणते किडे जमा होतात याचा अभ्यास मला खूप आवडायचा. त्यांच्या शिस्तबध्द रांगा, त्यांच्या एकमेंकाना भेटून होणारा संवाद या बद्दल बरीच कुतुहलता होती. हा माझ्या लहाणपणीचा छंदच होता. मोठा होत गेलो तसा शहरीकरणाचे काय काय प्रश्न असतात याची मला ओढ लागली. त्यात मला कचरा या प्रश्नाने अधिक आर्कषीत केले. त्याबद्दल विचार सुरू झाला. या शहरातल्या कचर्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे व तो असा पाहिजे की त्यात प्रत्येकाचा सहभाग तयार व्हावा…असा ठाम निश्चय झाला. मध्यतंरी जागतीकीकरणामुळे समाज जीवनावर काय काय परिणाम होतील याचा अभ्यास सुरू झाला. अभ्यासांती असं लक्षात आलं की सर्वात जास्त शेतकरी वर्ग भरडला जाणार. एका दाण्यांच हजार दाण्यांच दान करणार्या जमीनीत बाहेरच (खत, फवारणी, बियाणं असं सार काही) विकत आणून शेती करणार, पिकवणार व बाजारात गेलं की मातीमोल (हं माती सुध्दा काही तरी उगवून परत करते) नव्हे कवडीच्या मोलात ते विकलं जाणार तर शेती परवडणार कशी… आपले पूर्वज शेती कशी करायची… असाही विचार मनात कुठेतरी सुरू झाला..
या सार्यां प्रश्नांच्या गुंत्यात अडकून काही होणार नाही. काही तरी सुरवात करूया.. असं म्हणून घरचा कचर्यावर विविध प्रयोग सुरू केले. खत करून पाहिलं. लोकांना सांगीतले तर कचर्याचे खत करून झाडांना टाकण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हतं. मग दुसरा काही तरी शोधलं पाहिजे. असा विचार सुरू झाला. एका बाजूला शेती करायची मनाने उचल खाल्ली. शेती करूया.. पण शेती काही कोणी देईना.. शेतात मोठ मोठी अवजारे, रासायनिक खते फवारणी न वापरता शेती करणार असं म्हटलं की वेड्यात काढलं जायचं. तोही मार्ग खुंटला..
करायचं काय... रो हाऊस घेतलं. छतावरचं शेती करूया.. बघू जमत का.. आणि योगायोग शेतीची आवड, कचर्याच्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. अनेक अनुभव घेतले. शहरात शेती व ति पण गच्चीवर करता येते याचे अनेक अनुभव घेतले. प्रयोग केले. व अनुभवांच पुस्तक तयार केलं… नि सुरू झाला. गच्चीवरची बाग या संकल्पेनेचा प्रवास.. अडीशे स्व्केअर फूटा पासून सुरू झालेला माझा प्रवास आता सर्विहस व्हॅन पर्यंत आला. पूर्णवेळ काम करून रोजगाराचं एक साधन तर झालंच पण इतरांच्या घरात कचर्यातून भाज्या पिकू लागल्या.. पिकवून देवू लागलो… अगदी सुरवातीला विस टक्के माती व एंशी टक्के नैसर्गिक कचर्याचा वापर करून घरच्या घरी उपलब्ध जागेत( टेरेस, बाल्कनी, विंडो ग्रील, घराभोवतालची जागा व उपलब्ध साधनात ( दुधाच्या पिशवी पासून ते लेडीज पर्स पर्यंत, नारळाच्या करवटी पासून ते टायर पर्यंत) व उपलब्ध नैसर्गिक संसाधनात ( नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा, वाळवलेला किचन वेस्ट,) आपल्याला भाजीपाल्याची बाग फुलवता येते. लोकांना खत तयार करा हे सांगण पटत नाही. पण आजच्या रासायनिक उत्पादनामुळे होणारे विविध आजारांचे प्रमाण पाहता कचर्यातून विषमुक्त नैसर्गिक पध्दतीने भाजीपाला पिकवता येतो.
तर कचरा व्यवस्थापन किती सोप्प आहे हे मी सांगणार आहे. कचरा फेकायचा नाही असं आपण म्हटलं की त्याचं खत करायचं असा पहिला सरळ धोपट मार्ग आपल्याला सुचतो. पण खरचं कचर्याचे खत करायची गरज आहे का असं कधी आपण स्वतःला विचारलं … नसेलच.. मी विचारलं व त्यातून अनेक सुत्र लक्षात येत गेली. झाडांना खताची गरज ही फक्त आपल्या जेवणात तेल, मीठ, मिरची, लोणंच जेवढं असते तेवढंच खताची गरज आहे मग खंडीने तयार का करायचे. हाही प्रश्न आहे. असो ..
ग्रीन किचन वेस्टः घरातील निघणारा ग्रीन किचन वेस्ट जो विघटनशील, ओला, नैसर्गिक, जैविक असतो असा कचरा वाळवून घेणं ही सर्वात महत्वाची नैसर्गिक पहिली पायरी आहे. हा कचरा वाळवून तो कुंड्या, वाफ्यात भरायचा. तळाशी नारळाच्या शेंड्या व सर्वात वरती माती टाकायची, बी लावायचे. एकाद्या रोपांची हुंडी लावयची… बस… झाडं उत्साहाने वाढतात. म्हणजेच सुक्या कचर्याची एक घडी बसवून दिली की पुढचे काम निसर्ग आपोआप करतो. म्हणजेच सुक्या कचर्याच्या कंपोस्टीग ( कुजण्याच्या) प्रक्रियेत झाडं चांगली वाढतात.
ग्रीन किचन वेस्ट लवकरात लवकर सुकावायचा असेल तर त्याचे बारिक काम करून घ्या.. उन्हात टाका. त्याचे तासा दोन तासात निर्जलीकरण होते. या प्रक्रियेत कुठेही कचर्याला दुंर्गध येत नाही. कचरा हा प्लास्टिक बॅग, डस्ट बिन या मध्ये डांबून ठेवला तदर कचर्याला वास येतो. वाळलेल्या ग्रीन किचन वेस्ट हे माठात, डस्ट बीन, रांजन, सच्छिद्र बॅग, गोणीत टाकून त्यावर थोडे थोडे पाणी, ताक पाणी, गोमुत्र पाणी, असे शिपंडत राहिले की त्याचे ४०-४५ दिवसात छान खत तयार होते.
वेस्ट कुकड्ड फूडः य़ाचे व्यवस्थापन हे कौशल्यपूर्ण भाग आहे. हा तो हळू हळू आत्मसात होत जातो. तर कूकड फूड हे ग्रीन वेस्ट पेक्षा अधिक काळ पाणी धरून ठेवते. ते ही वाळवले तर त्याचा परिणाम हा शेणखतापेक्षाही उत्तम येतो. तर कूकड फूडचा सोप्पा उपाय म्हणजे त्यास आबंवणे व त्या आबंवलेल्या द्रावणात पुन्हा पाणी टाकून त्याच वापर कुंड्याना, झाडांना करायचा. खरकटे अन्न, पाणी आंबवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. भांडे धुतो तेथे डस्टबिन मध्ये साबण विहरहीत पाणी संकलन करायचे ते आठवड्या भरात भरते. ते नैसर्गिक रित्याच आंबण्याची प्रक्रीया होते. बरीच मंडळीना एवढ्या द्रावणाची गरज लागणार नाही. त्यांनी आपल्याला लागेल तेवढे खरकटे अन्न पाणी हे आबंवायचे व ते महिना पंधरा दिवसातून एकदा झाडांना टाकायचे.
पालापापाचोळाः घर परिसरात, बंगला, शाळा, कंपनी परिसारात बरीच पानगळती होते. ही पाने कचरा म्हणून सर्रास जाळली जातात. व त्यापासून प्रदुर्षनात भर टाकली जाते. सकाळी स्वच्छ हवा घेण्यासाठी फिरायला गेले की हमखास धुर आपण नाका तोंडात भरून येतो. असा हा पालापोचोळयाचा विविध तर्हेने बागेत उपयोग करता येतो. त्याचे उत्तम खत बनवता येते. सुका पालापाचोळा हा कुंड्या व वाफे भरण्यासाठी करता येतो. तसेच एकादा ड्रमला तळाशी छिद्र पाडावे. त्यात नारळाच्या शेंड्या टाकाव्यात व त्यावर सुकापालापाचोळा भरावा. त्यावर रोज थोडे थोडे पाणी शिपडांवे. तळाशी बाहेर येणारे पाणी झाडांना टाकावे. त्याचे परिणाम छान येतात. तसेच चार- सहा महिण्यात ड्रम मध्ये छान कंपोस्ट तयार होते त्याच वापर आपण बागेत करू शकतो.
असा हा सुका पालापाचोळा हा जमीनीवरील, शेतातील झाडांच्या बुंध्याशी व कुंड्या, वाफ्याच्या पृष्ठभागावर पसरवला तर त्यात गांडूळे हे वाढू लागतात. त्यामुळे झाडे, कुंड्यातील रोपे हे टवटवीत होतात.
असा हा कचरा व्यवस्थापनाचा अध्याय. त्याचे प्रयोग आपल्या घरी नक्की करून पाहावेत. व घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवावा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
निशुल्क मार्गदर्शनासाठी संपर्कः ९८५०५६९६४४
You must be logged in to post a comment.