आणी बंडू जन्माला आला…

गच्चीवरची बाग या विषयात पूर्णवेळ काम करण्याचे ठरवले. त्यावेळेस आपले काम हे गारबेज टू गार्डन व विषमुक्त असेन हे त्तत्व व सत्य पहिल्या दिवासापासूनच स्विकारले होते. त्यामुळे रसायनांच्या कोणत्याही अभ्यासात पडायचे नाही अशी शेंडीला जणू गाठच मारली होती. (अजूनही ती गाठ तशीच आहे म्हणा किंबहूना ती घट्ट झाली अगदी शेंडी तुटली चालेल पण शेंडीची गाठ सुटता कामा नये अशी) तर आपले पूर्वज कशी शेती करायचे हा विचार व अभ्यास केला तेव्हां लक्षात आले की गायीचे शेण व गोमुत्र या शिवाय खत काय वापरली असणार…

झालं..प्रयोग करणे सुरू झाले. (आजच्या एवढी भरमसाठ माहिती तेव्हा मोबाईलला येत नव्हती.. तसले टचकन दाबलं की माहिती देणारं यंत्र खरेदी करणचं दूर होत..) गायीचे गोमुत्र हे संजीवक व कीडनियंत्रण म्हणून वापरावयास सुरवात झाली. अर्थातच एका गोशाळेतून ते विकत आणू लागलो. त्यांना माझा उद्देश आवडला. पण मी येथून गोमूत्र नेवून तेथे कुठेतरी (नक्कीच जास्त पैशात) विकत असणार असा त्यांचा ग्रह झाला. फेरी वाया जावू लागली. नकार मिळू लागला. मग काय…

1 (1).png

देशी गायच पाळायचं ठरवलं.. गायीचा शोध घेतला.. गावातलीच हवी म्हणून खेड्यातील गाय आणली.. मला त्यावेळी सैराटसारखं भरून आलं. तिच नाव आर्ची (आरची) ठेवलं. फेसबूकवर नावाचं बारसं झालं. माझ व गायीच जाम कौतुक झालं. गाय गाभण होती म्हणून तिच्या पिल्लाची वाट पाहत होतो. तिच बाळंत झालं, कालवड झाली (नाव प्राचू ठेवलं) पण आईला काही प्राचू नि ब्रिचू तिनं तिच घरचं नाव मोन्टीं ठेवलं. (तिच्या भाचीचं नाव) मी काही तिला कोणत्याच नावानं हाक मारली नाही… सारं दूध तिलाच पिवू दिल.. प्राचू अशी तगडी झाली की वर्षभरातच ति आई पेक्षा पहिलवान वाटू लागली.

मला आता तिची चिंता वाटू लागली.. तसं याला दोन अडीच वर्षाची होईपर्यंत तिआता प्राचू उर्फ मोंन्टीला उपवर शहरात कसा शोधायचा.. इंजेक्शन देवून तिला इतक्या कमी वयात दिवस जावू देणं मला पटतं नव्हत… दिवस सरत होते. प्राचू आता हाडामासाने मोठी दिसू लागली. आम्हाला ही कौतुक वाटू लागलं. कधी पातळ शेण दिल तरी मला हादरायला व्हायचं. आपल्याला म्हणजे मोठ्यांना काही झालं तर सांगता येतं पण लहान बाळ व जनावर हे काही सांगू शकत नाही. त्यात आपल्याला गाय पाळण्याचा कवडीचा अनुभव नाही. त्यामुळे डाक्टर मित्राला फोन करून औषधं मागवून घ्यायची…

तर प्राचूसाठी उपवर शोध चालू होता. त्याला इकडे आणायचे किंवा हिला काही महिने त्याच्याकडे सोडायचे असा सगळा पैशाचा, वेळेचा, विश्वासाचा ताळमेळ बघणं, अंदाज बांधण चालू होता. ( video पहा)

आक्टोबर महिण्याची पाच तारीख उगवली. प्राचूचं मायागं व कास बरीच सुजली. डॉक्टरांना बोलावतो तर कुणीच येईना. असे चार दिवस गेले. गोठा तर स्वच्छ ठेवत होतो. विषाणूंची बाधा होणं दूरच होत.

अशातच एका ओळखीतून डॉक्टर घरी आले. म्हणाले गायीला दिवस गेले आहेत. पोटात हात घालून तपासावे लागेल. आईनं डॉक्टरांनावे ड्यात काढलं, गाय कुठं गेलीच नाही तर दिवस जातीलच कसे. गाय मागील बंधीस्त कंपाऊंड मधेच मुक्त फिरू देतो. पण. मी पण आईच्या मताशी सहमत होतो. तिला दिवस जाणं शक्यच नव्हतं. प्राचूला काही तरी भयंकर झालं आहे या चिंतेने आई हळवी झाली नि माझी झोप उडाली.. गुगलवर माहिती शोधली पण काही तपास लागत नव्हता.. जेमतेम २६ महिण्याची गाय आता जिवाशी जाणार, माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. तसाच सकाळी कामासाठी बाहेर गेलो. कामावरून येतांना सहा वाजत होते. रस्त्याने गायी विषयी चिंता होतीच. आईन फोन केला. लवकर ये… आपली गाय… पुढचं काही ऐकू आलं नाही.( नो आयडीयची कमाल .. अवघं आयुष्य बदलून नाही बुकलून काढलयं …. ल्यांनी) गाडीची स्टेंअरिंग हाताच्या घामानं ओली झाली होती. कपाळावर दरदरून घाम फूटला.. घरी अंगणात गाडी कशी तरी पार्क केली. मला तर श्वास घेता येत नव्हता. गाय गोठ्यात आडवी पडली होती. अशातच आई मागच्या दारून पुढ येऊन थोडं हसू संमिश्त्र भितीच्या भावाने सांगीतल गायीला पिल्लू होतय…मी गायीच्या मायांगाकडे पाहिलं खरचं तिथे पिल्लाचे खूर बाहेर येतं होतं.

अरे… कसे शक्य आहे.. गाय कुठे सोडलीच नाही… (कुठे शेणं खाल्लं असं असं कौतुक डोक्यात आल.. पण आता त्यावर विचार करण्याची वेळ नव्हतीच. आता खरी वेळ होती प्राचूचं पहिलं बाळतंपण स्वच्छ जागेत करण्याची, मी पुढे सरसावलो. आई भितीने थरथरली. तिचा जिव खाली वर होत होता. कारण गाय अडली तर काय करायचं. कारण पिल्लू बाहेर येतच नव्हतं. मी तिला धिर देत होतो. तिनं बाजरी शिजवायला टाकली. त्यातच गॅस संपला. पुढील दारून तो मागील दारी नेला तर ठेवतांना कचकन पायांच्या अंगठ्यावर पडला. डोक्यात सणक गेली. चक्कर आली. पण सावरलो. गायीकडे पाहणं गरजेचं होतं. जून्या साड्या कपडे, पोती गोळा केली. . डॉक्टर मित्राला फोन केला पण तो येण्याची आशा माळवली होती. पिल्लू जसे जसे बाहेर येतं होते तसे तसे चिकट द्राव्य बाहेर येत होते. मी त्याला पुसू लागलो. कारण गाय कोरड्या जागेवर व्याली पाहिजे. उभी राहिली तर पाय घसरायला नको. चार पाच पोती ओली झाली. ति दुसर्या पोत्यात भरली. जून्या साड्या फाडून फाडून गोठा पूसू लागलो. आता पूर्ण घामाने ओला झालो होतों. दोन मोठी पोती भरलं… अंधारात जावून ते ओझं दूरवर ओसाड जागी फेकून आलो. आता पिल्लू बर्यापैकी बाहेर आले होते. पण गाय निपचीतच पडून होती. पिल्लू जसं बाहेर आलं तसं त्याभोवतीची गायीचे गर्भ पिशवीचे लाल रंगाचे आवरण बाहेर आले. ते आवरणे गरजेचे असते. रक्त मिश्त्रीत असते म्हणू त्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून ते पून्हा नव्या जोमाने पूसू लागलो. ते सारं एका बादलीत भरलं ते कुत्र्याच्या तोंडी लागू नये म्हणू वेगळं बादलीत भरलं. झाकूण ठेवलं. पिल्लू पूर्ण बाहेर आलं. त्याला चाटून पुसण्याची ताकद गायी मधे नव्हतीच. तिला कंठच फूटत नव्हता. तिच हे पहिलच बाळतंपण होत. पिल्लू कपड्याने पुसून काढलं. पिल्लू उठण्यासाठी धडपडू लागलं. गायं तर एका कोपर्यात होती. पिल्लूला मी दिसलो ते माझ्याकडे, माझ्या अवती भवती फिरू लागलो. त्याला बोट चाखायला दिला.. पण ते जोरातचं दाबून चोखू लागले. बोटाला गुदगुदल्या होत होत्या. गाय उठून उभी राहणं शक्यच नव्हत. कारण तिन- चार तासांची ही प्रक्रिया पहिल्यादांच तिन बिना औषधा व खुराकाशिवाय निभावली होती. पिल्लाच तोंड गायीच्या सडाशी लावू लागलो. पण त्याला ते काही उमजेना. गायीला उभं केलं पण पिल्लू तिच्या सडाकडे जाईचना… हाताने त्याचे तोंड धरून सडाकडे नेले तरी त्याला कसे प्यायचं हे कळत नव्हत. ते माझ्याच पायाखाली घुसू लागले. त्याला मी त्याची आई वाटतं होतो. तासाभराने त्याला दूध कसं प्यायचं हे कळू लागलं. सार्या गडबडीत ते वासरू मादी आहे की नर हे पाहिलंच नव्हतं. पाहिलं तर कळंतच नव्हतं. शेवटी आई व मी चर्चा केल्यानंतर तो नर आहे. यावर निदान झालं. नि त्याचं नाव बंडू ठेवलं. बंडू, बंड्या अशा नावाने तो कान हलवतो. ह्या उगाच काय… असे म्हणूत मान विशिष्ठ तर्हेने हलवून दाखवतो. तो आता बंडोपंत होण्याच्या मार्गावर आहे. तो चार महिण्यातच (एक वर्षाचा दिसू लागलाय) तो प्राचूच्या कमरेला लागू लागलाय. तर असा बंड्याचा जन्म झालाय..

आता गाय कधी लागली… यावर चर्चा रंगली. आईच्या व माझ्या विचारातून ते लक्षात आलं. आई मामाकडे गावाला गेली होती. त्यावेळेस प्राचू तिन दिवस गायब होती. शोध शोधली पण सापडली नाही. आईला गावावरून बोलावून घेतले. आईनं ती शोधून काढली. अगदी भर दुपारी मस्त पैकी झाडाच्या सावलीत महाराणीसारखी चर्वण करत बसली होती. घरी यायला तयार नव्हती. तिला मुक्तता, स्वंतत्रता, बेफिकीरी अनुभवायची होती. तिला नवीन दोर आणला. छोटा हत्तीत बसून आली.

खरं तर प्राचूनं, निसर्गाने माझी महत्वाची चिंता मिटवली होती. तिनच उपवर शोधून महत्वाचं काम केलं होतं. पण आम्हाला दुखः एवढचं की ति गर्भार आहे याची माहिती नव्हती. मी प्राचूच्या चिंतेत कितीतरी वेळ खर्च केला होता. डॉक्टरांना वेड्यात काढलं होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचे औषध पाणी, विशेष खुराक न दिल्याचं, तिच कौतुक न केल्याचं मला जास्त दुखः होतं. पण आपली इच्छा व त्यामागील हेतू शुध्द असेल तर निसर्गच आपल्याला मदतीला येतो. याचा मला बरेचदा प्रत्यय आला आहे. तो याही वेळेस आला.

तर अशा रितीने मी गायीचे बाळंत करण्याला हातभार लागला. गायीच्या बाळांतपणाची छोटी जाण आली. बरंच काही शिकायला मिळालं.
बंड्याअशा नावाने हाक मारली की बंडू कान हलवतो. ”ह्या उगाच काय… ?असे म्हणून मान विशिष्ठ तर्हेने हलवून दाखवतो. तो आता बंडोपंत होण्याच्या मार्गावर आहे. तो चार महिण्यातच (एक वर्षाचा दिसू लागलाय) तो प्राचूच्या कमरेला लागू लागलाय. तर असा बंड्याचा जन्म झालाय…

आवाहन: शहरात नवख्याने गाय पाळणं हे मोठं आव्हान आहे. वेळेवर डॉक्टर नसणं, चारा पाणी याची व्यवस्था करणं आणि हे सारं करण्यासाठी आर्थिक पाठबळ असणं हे खूप महत्वाचं आहे. आम्हाला किंवा आपल्या पाहण्यातील शहर किंवा खेड्यातील एकल गोपालकाला ऐच्छिक मदत करा. त्याने मोठा धिर मिळेल विशेष म्हणजे आत्मविश्वास मिळतो की आपण एकटे नाही आहोत. कारण गोशाळांचा खर्च मोठा असला तरी तो विभागला जातो किंवा त्यांच्या उत्पादनातून, इतरांच्या निशुल्क सेवेतून ते परवडतं तसे एकल गो पालकाला ते अवघड असतं.

वरील लेख आवडला तर नक्कीच Share & Like करा.

www.gacchivarchibaug.in

संदीप चव्हाण. ९८५०५६९६४४