प्रथम तुमचे अभिनंदन, कोरोनाच्या संसंर्गापासू वाचण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात आपण घऱीच भाज्या उगवण्याचा प्रयत्न करत आहात. आपण सुरावत केली नसेल तर कालच्या लेखातून आपणास कळवले आहेच की सुरवात कशी करावी. तर आजच्या लेखात जे पूर्वीपासून बाग तयार केली आहे पण आता खतांची गरज आहे. अशा दोघांसाठी हा लेख गरजेचा आहे. आपण रासायनिक खताऐवजी नैसर्गिक खत वापरावयास प्राधान्य देत असतो. पण त्याची उपलब्धता सध्या होऊ शकत नाही. खत नाहीत म्हणून हातावर हात ठेवून बसू नका… आपल्या हाती अनेक पर्याय आहेत जे सहज घरच्या घरी सहज तयार करता येतात.
आपल्याकडे खत म्हणून वापरता येईल असे बरीच साधने उपलब्ध आहेत.
- हिरवा कचरा (Pre cooked) सुरीने बारिक करून त्यास वाळवून घ्या… कुंडीतील, वाफ्यातील फळभाज्यांच्या, फुलांच्या झाडाभोवती त्याचे अच्छादन करा. पाण्याचे बाष्फीभवन कमी होईल. तसेच त्याचे झिरपून द्रव्य स्वरूपातले खत होमोपॅथीक स्वरूपात मिळत राहिल.
- हिरवा कचरा बारिक तुकडे करून (वाळलेला किंवा ओला) प्रसादासारखा प्रत्येक कुंडीच्या मातीखाली दाबा. त्याने खत तयार होण्याची प्रक्रिया सुरू होईल.
- खरकटे अन्न असल्यास त्यास सात दिवस आंबवा. त्यात पाच पट पाणी टाकून प्रत्येक झाडांना खोडापासून दूर म्हणजेच कुंडीच्या बाहेरील कडेस द्यावे.
- घरातील हिरवा कचरा मिक्सर मधे बारिक करून त्यात दुप्पट पाणी टाकून ते झाडांना द्यावे.
- ताक, नासलेले दूध, तांदुळाचे पाणी, गुळांचे पाणी सुध्दा आपण खत म्हणून वापरू शकता.
- घरातला कचरा एका हवा बंद पिशवीत, डब्बा, पाण्याच्या बाटलीत पाणी न टाकता पॅक करा. ति सावलीत ठेवा. महिनाभरात त्याचे अनएरोबिक पधद्तीने खत तयार होईल. लक्षात ठेवा. पिशवीला, डब्याला, बाटलीला छोटे सुध्दा छिद्र नको. हवा, प्रकाश जायला नको.
- कुंडीतील झाडांचा पिवळा झालेला पालापाचोळा, फुले त्याच कुंडीत कैचीने बारिक करून मातीत दाबा. उदाः गुलाबाचा पाला, वाळलेली फुले गुलाबाच्याच कुंडीत टाका. खताचा एक स्त्रोत तयार होईल.
- मल्टीलेअर लागवड करा. उदाः गुलाबाच्या कुंडीत कांदा लावा, मोगर्यात मिरची लागवड करा. जास्वंदीच्या कुंडीत पालक लावा. एकमेंकांना ते मातीत व मातीच्या वर सहकार्य करतात.
- अग्नी होत्राची राख, अगरबत्तीची राख खत म्हणून वापरता येईल. त्याचा प्रत्येक कुंडीत चमचा भर वापर करावा.
- द्राव्य खत व विद्राव्य खत ही सात –सात दिवसाच्या अंतराने द्यावीत. हे एकाच वेळेस देवू नये. त्याचा आराखडा तयार करून त्याच्या नोंदी ठेवाव्यात .
- https://youtu.be/i6xs1WSNF1w
टीपः १) काही महाशय (फेसबूक व व्हॉट्सअप वरील एडमीन) लेख आवडला तर स्वतःच्या नावाने कट पेस्ट करून पुढे पाठवतात. तर कधी लेखा खालील नावं, व संकेतस्थळ गायब करतात. कृपया लेख आहे तसा पाठवा. आम्ही आमच्या संकेतस्थळाव्दारे महत्वाची माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतो. जी त्यांना पुढील आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणार आहे.
२) सध्या सकाळ या वृत्तपत्रात हिरवे स्वप्न नावाने लेख माला प्रकाशीत होत आहे. ( दर मंगळवारी) आवश्यक वाचा. व कळवा…
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.
[…] पुरवण्यात येईल. ( घरच्या कचर्यापासून खत कसे तयार करावे, बिज कसे लागवड करावे, कीड नियंत्रण कशी […]