वैशाली राऊत/ नाशिक
मी गेल्या वर्षापासून राहत्या घरी भाजीपाल्याची बाग फुलवली आहे.

20150328_074844_143828051

 

मी गेल्या वर्षापासून राहत्या घरी भाजीपाल्याची बाग फुलवली आहे. या वर्षी बागेतून आम्ही रताळी, वांगी, टोमॅटो, मिरच्या, पुदिना, ओवा, मोहरी, मोहरीची पाने, गवती चहा, बोरमिरची अशा अनेक भाज्या घेतल्या. मला बागेच्या कामात माझे पती व मुलगा मदत करतात.
आम्ही बाजारातून कोणतेही खत, औषध विकत आणत नाही. खत म्हणून घरातीलच सुक्या व ओल्या कच-याचे व्यवस्थापन करतो. आमच्या गच्चीवरील या बागेमुळे उन्हाळ्यात गारवा राहतो. पक्षीही घरटी बांधतात व त्यांच्या मुलांना जन्म देण्यासाठी येतात, याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. आपण माणसांनी त्यांच्या राहत्या जागेत आक्रमण केले त्यांचे उतराई होण्यासाठी ही गच्चीवर फुलवलेली बाग समाधान देते. आमची बाग पाहून शेजारच्या मुलांनीही बाग फुलवण्याची प्रेरणा घेतली आहे. आजूबाजूचेही लोक ती पाहायला येतात. आमची बाग फुलवण्यासाठी गच्चीवरची बाग या संदीप चव्हाण लिखित पुस्तकाची खूप मदत झाली. हे छोटेखानी पुस्तक वाचून त्याची अंमलबजावणी करणे खूप सोपे आहे. हे पुस्तक आम्ही आमच्या नातेवाइकांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देतो व त्यांनाही रसायनमुक्त भाजीपाला पिकवण्याचा आग्रह करतो. तसेच इंटरनेटवर व फेसबुकवर ही असे काम करणारी खूप हौशी मंडळी आहेत. वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शनही घेतो. ब-याचदा कुंड्यांतील सुकी पाने कुंडीतच जिरवतो, त्याचा छान परिणाम दिसून आला आहे.

आम्ही आमची माती पालापाचोळ्याचे कंपोस्टिंग करून घरीच तयार केली आहे. तिला छान सुगंध येतो. शिवाय त्यातून उत्पादकताही वाढली आहे. बियाणे व रोपे, त्यांला मिळणारे मातीतील घटक यांचा छान संयोग जुळून आला तर एका झाडाला भरपूर भाज्या येतात. त्या आम्ही आमच्या शेजा-यांनाही देतो. तेही आमच्या आनंदात सहभागी होतात. अर्थात त्या बदल्यात ते आम्हाला त्यांच्या घरचा नैसर्गिक ओला सुका कचराही देतात.
बरेचदा चांगले फळे देणा-या झाडांची फळे बियाण्यासाठी साठवतो. ते बियाणे इतरांनाही देतो. गावाकडून गावरान बियाणे संकलित करतो. त्यांचे जतन व संवर्धनही करतो. आम्ही रोज सकाळ- संध्याकाळ मोजके पाणी देतो त्यामुळे गच्चीवर पाणी साठून राहात नाही. घरच्या घरी किंवा इतरांना देण्यासाठी टोमॅटो, मिरचीची रोपवाटिकाही तयार केली आहे. आमच्या बागेत फुलं व काही शोभेची झाडे आहेत. तसे लक्ष वेधून घेणारे काही निवडुंग आहेत. कुठून कुठून जमा करून आलेले वाण आम्ही जतन केले आहेत. आता नव्याने बागेत लेट्यूस या परदेशी भाजीची लागवड केली आहे. त्याची छान वाढ होत आहे.
बाग ही आमची निवांत बसण्याची जागा आहे. रखरखत्या उन्हातही तेथे गारवा व हिरवाई डोळ्यांना सुखावते. अशी ही बाग आमच्या जीवनाची अविभाज्य भाग झाली आहे. एखाद दिवशी पाणी दिले नाही तर चुकल्या चुकल्यासारखे वाटते. अशी ही बाग प्रत्येकाने आपल्या घरी फुलवावी व आनंदाचे प्रवासी बनावे या सदिच्छेसह.

http://www.gacchivarchibaug.in 9850569644