नाशिक |Nashik
करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रे वाढत आहेत. लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, भाजीपाला सारखा हाताळू नये, भाजी घ्यायला एकदम गर्दी करू नये असे आवाहन यंत्रणा वारंवार करत आहे. आपल्या कुटुंबापुरता भाजीपाला घराच्या गच्चीत उगवण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे, असे मत ‘गच्चीवरची बाग’चे संचालक संदीप चव्हाण यांनी केले आहे.
सहज पिकवा भाज्या !
आता राज्यात ‘ अनलॉक महाराष्ट्र’ मोहीम सुरु झाली आहे. पण करोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा काळात संसर्गित भाज्या आपल्या घरी आल्या तर? किंवा आपण संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलो तर? त्यापॆक्षा भाज्या घरीच उगवल्या तर? घरी भाज्या पिकवणे अवघड नाही. त्यासाठी माती, पालापाचोळा, कंपोस्ट खत अशी थोडीशी पूर्वतयारी करावी लागते. पावसाळा सुरु आहे. त्यामुळे पालापाचोळा मिळणे अवघड आहे. त्यामुळे सध्याच्या काळापुरते आवश्यक कंपोस्ट खत नर्सरीतून आणले तरी चालेल.
घराच्या बाल्कनी, खिडकी, गॅलरी, उपलब्ध वस्तू उदाहरणार्थ प्लास्टिक कापड, बादल्या, टब, गोणपाट, तेलाचे डबे, शीतपेयाच्या किंवा पाण्याच्या बाटल्या असल्या तरी त्यात तुम्ही भाज्या पिकवू शकता. तुमच्याकडे ४ इंच खोली असलेल्या सव्वा लिटर पाण्याच्या बाटल्या असली तरी त्यात सुद्धा अंबाडी, पालक, आंबटचुका अशा पालेभाज्या लावू शकता. चार बाटल्यांमध्ये पालेभाज्यांची रोपे लावली तर दोन जणांपुरती पालेभाजी सहज मिळते. १ फूट लांबीरुंदीच्या आणि ४ इंच खोल असलेल्या कुंडीत देखील दोन माणसांची पालेभाजी सहज उगवते असेहीते म्हणाले.
अशी करा कुंडी तयार !
तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनाच्या तळाशी नारळाच्या शेंड्या, त्यावर किचनवेस्ट/ पालापाचोळा दाबून भरा. थोडी माती टाका. झाली कुंडी तयार. एखाद्या कुंडीत झाडं नसेल तर त्यातील माती वापरा. बियाणे पेरा आणि साधारणतः महिनाभरात आपण उगवलेल्या भाज्या खायचा आनंद घ्या. लॉकडाऊनमुळे जो वेळ मिळाला आहे तो अधिकाधिक या आपल्या गच्चीवरच्या बागेसाठी द्या.
आपण गच्चीतल्या बागेत सर्वच भाज्या पिकवू शकतो. पालेभाज्या साधारणतः सव्वा महिन्यात तर कांदापात महिनाभरात येते. या रोपांना सतत उन्हाची गरज नसते. थोडे ऊन, थोडी सावली अशी जागा चालते. सकाळचे उब मिळाले तरी पुरते. खूप जास्त पाणी घातलेले चालत नाही. कीड दिसते आहे का याचे वारंवार निरीक्षण करावे लागते. तिचे नियंत्रण घरच्या घरी करता येते. देशी गायीचे गोमूत्र थोडेसे सौम्य करून, ते नसेल तर आंबट किंवा खराब ताक, हिंगाचे पाणी यांची पंधरा दिवसातून एकदा फवारणी केली तरी किडीचे नियंत्रण होते.
घरचे बियाणे !
बियाणे किंवा रोपे विकत मिळतात. पण तेव्ढ्यासाठीही बाहेर जायचे नसेल तर महिनाभरात भाज्या येतील अशा घरच्या बियाणांचा वापर करता येतो. मेथी, धने , मोहरी पेरा. थोडेफार पालकांचे बिज असेल तर पेरा. किंवा बाजारातून पालक जूडी मिळाल्यास पाने काढून त्याची खोडासहित लागवड करा. महिनाभरात पालक तयार होईल. कांदा, लसून लागवड करा. महिनाभरात कांद्यांची पात मिळेल.
तांदुळका, लाल माठ ही सहज येणारी वनस्पती आहे. थोडं बियाणं मिळालं, किंवा एकादे रोपे मिळाले तर ते वाढवा. गाजर, मुळा, बिट याचें खोड पुन्हा मातीत लावा. त्याच्या पानांपासून पराठे तयार करता येतात. मिरची, टोमॅटो, वांगी, बटाटे, वेलवर्गीय ( वाल, भोपळा, गिलके, दोडके, तोंडलीचा वेल ) यांची लागवड करा. घरच्या घरी भाज्या पिकवण्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा असे मला वाटते.
You must be logged in to post a comment.